पंजाबमध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी होत असताना, काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पंजाब काँग्रेस दोन गटात विभागली आहे. एक गट नवज्योत सिद्धू यांचा तर दुसरा कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा आहे. अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्यासाठी पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवोज्योत सिंग सिध्दू यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. याचवेळी अमरिंदर यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची मागणी करणारे पत्र काँग्रेसच्या ५०हून अधिक आमदारांनी सोनिया गांधी यांना लिहिलेे. अखेर कॅप्टन यांची विकेट पडली. निवडणुकीच्या काळात राज्यातील जनतेला काँग्रेसकडून आश्वासने देण्यात आली होती. या आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सवाल करण्यास सुरुवात केली होती. परिणामी मुख्यमंत्री आणि या आमदारांमध्ये तणाव निर्माण झाला होता. या कारणामुळे अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला असल्याचे बोलले जात असले तरी सिध्दूंच्या दबाबतंत्रापुढे काँग्रेसच्या दिल्लीश्वरांना झुकावे लागले, हेच अंतिम सत्य आहे. आता चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे ‘कॅप्टन’ अर्थात मुख्यमंत्री झाले आहेत.
काँग्रेस नेतृत्वापुढे वाद मिटवण्याचे आव्हान
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शनिवारी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे पंजाब काँग्रेसमधील मतभेदांचा एक अध्याय संपला असला तरी चार महिन्यांत तेथे निवडणुका होणार असल्याने पक्षासाठी अनिश्चिततेचा नवा अध्याय सुरू झाला आहे. गत काही महिन्यांपासून कॅप्टन आणि सिध्दू यांच्यातील वादात कॅप्टनची विकेट पडली. कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी सुखजिंदर रंधावा, नवज्योतसिंह सिद्ध, अंबिका सोनी, सुनील जाखड अशी चार ते पाच नावे चर्चेत होती. मात्र, अनेकांना अनपेक्षित असलेले चरणजीत सिंह हे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निवडण्यात आले. विशेष म्हणजे चरणजीत सिंह यांचे नावे चर्चेतही नव्हते. चरणजीत सिंह चन्नी हे पंजाबमधील दलित समाजातून येतात. त्यांच्या रूपाने भारतातील सर्वाधिक दलित लोकसंख्या असलेल्या पंजाबला पहिला दलित मुख्यमंत्री लाभला आहे. अमरिंदर सिंह यांच्या मंत्रिमंडळात चरणजीत सिंह चन्नीहे रोजगार मंत्री होते. रूपनगर जिल्ह्यातील चनकौर साहिब विधानसभा मतदारसंघातून ते काँग्रेसचे आमदार आहेत. २०१६ ते २०१६ या कालावधीत ते विरोधी पक्षनेते सुद्धा होते. चन्नी हे कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या विरोधी गटातले मानले जात. नवज्योतसिंह सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यासाठी प्रयत्न करणार्यांमध्ये चन्नीही होते. भाषेवरील प्रभुत्व आणि खिळवून ठेवणारी वक्तृत्वशैली असणारे लोकप्रिय नेते नवज्योत सिंग सिध्दू आणि देशात ‘मोदी लाट’ असतानाही २०१७ मध्ये स्वबळावर अकाली दल आणि भाजपला नमवून पंजाबमध्ये सत्तापरिवर्तन करणारे कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यातील वाद काँग्रेसची मोठी डोकंदूखी ठरत आहे. पंजाब राज्यात पुढील वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. एके काळी एकत्र संसार करणार्या अकाली दल आणि भाजपचा आता काडीमोड झाला असला, तरी या पक्षांनी या राज्यातील सत्ता मिळवण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करायला सुरुवात केल्याचे दिसते. विशेष म्हणजे, या राज्यात सत्तारूढ असलेल्या काँग्रेसमध्ये मात्र उघडपणे वादनाट्य रंगले आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेसनेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून बेबनाव आहे. काँग्रेसमधील हे दोन्ही बडे नेते एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक करत असून विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटवण्याचे मोठे आव्हान काँग्रेस नेतृत्वापुढे आहे.
अमरिंदर सिंग यांची नाराजी काँग्रेसला परवडणारी नाही
सिध्दू जेवढे लोकप्रिय तेवढेच वादग्रस्त नेते म्हणून परिचित आहेत. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेंव्हा या शपथविधी सोहळ्यात सिद्धू हे सुद्धा उपस्थित होते. सिद्धू शपथविधीसाठी पाकिस्तानात गेल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यातच नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतली. इतकचे नाही तर, पाकव्याप्त काश्मीरच्या अध्यक्षांच्या बाजुला नवज्योत सिंग सिद्धू बसल्याचे पहायला मिळाले. यामुळे मोठा वाद उफाळला होता. आताही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन यांनी नेमके याच मुद्यावर बोट ठेवले होते.नवज्योतसिंह सिद्धू यांना मुख्यमंत्री बनू देणार नाही. कारण ते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्ताचे लष्करप्रमुख जनरल बाजवा यांचे मित्र आहेत. सिद्धूंना मुख्यमंत्री बनवले गेल्यास देशहितासाठी त्यांचा विरोध करेन. काँग्रेसमधील या गटबाजीचा मोठा फटका पक्षाला बसू शकतो. कॅप्टन अमरिंदर सिंह हे मोठे नेते आहेत. शिरोमणी अकाली दलाला सत्तेवरून खाली खेचून आणि ‘आप’च्या सत्तेवर येण्याच्या आशा धुळीस मिळवून चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा सत्तारूढ करण्याचे श्रेय अमरिंदर यांना दिले जाते. दुसरीकडे सिध्दू २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांत अमृतसरमधून भाजपच्या तिकिटावर ते निवडून आले. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारल्याने नाराज सिद्धू आधी आम आदमी पक्षाकडे आणि नंतर काँग्रेसकडे वळले. पंजाबमध्ये २०१७च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झाले तेव्हापासून विविध आमदार, खासदारांचा पाठिंबा मिळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सरकारमध्ये मोठी जबाबदारी, म्हणजेच उपमुख्यमंत्रिपद तरी मिळावे ही सिद्धू यांची मनीषा लपून राहिलेली नाही. आताही कॅप्टनची विकेट पडली असली तरी मुख्यमंत्री पदाची माळ सिध्दूंच्या गळ्यात पडली नाही. सिध्दू एक सेलिब्रिटी व्यक्तीमत्व असल्याने त्यांचा पक्षाला मोठा फायदा होईल, असा कयास बांधला जात आहे. मात्र त्याच वेळी अमरिंदर सिंग यांची ही नाराजी काँग्रेसला परवडणारी नाही. आधी काँग्रेसच्या हाती जेमतेम दोन-तिन राज्य आहे त्यातही अशी परिस्थिती असल्यास पक्ष कसा वाढू शकतो? याचा विचार श्रेष्ठींनी करणे आवश्यक आहे. सिध्दू यांची सरशी झाली असली तरी अमरिंदर यांच्या ऐवढी त्यांची राजकीय ताकद नाही यामुळे श्रेष्ठींनी नेमके कोणते गणित आखले असावे? हे समजण्या पलीकडचे आहे. याचा काँग्रेसला फायदा होतो का नुकसान? या प्रश्नचे उत्तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच मिळेल.
Post a Comment