जेनेरीक औषधे


धकाधकीचे जीवन, खानपानाच्या बदललेेल्या सवयी व दररोजच्या खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ या प्रमुख कारणांमुळे विविध आजारांना घरबसल्या आमंत्रण मिळत आहे.  जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लुएचओ) एका अहवालानुसार, भारतातील रूग्णांची संख्या दरवर्षी वेगाने वाढत असून सन २००३ च्या तुलनेत सन २०१४ मध्ये हे प्रमाण ७.५ टक्क्यांनी वाढले आहे. कोणत्याही आजारपणात उपचारांवर होणार्‍या खर्चात औषधांवर होणारा खर्च अधिक असतो. परंतु स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही आपल्या देशातील लोकसंख्येच्या ६५ टक्के भारतीयांपर्यंत महागडी औषधेतर सोडाच परंतु रोजच्या जीवनात आवश्यक असलेली नियमित औषधेही पोहचत नाहीत, असा गंभीर ठपका डब्लुएचओने ठेवला आहे. हा अहवाल म्हणतो देशातील ४० टक्के लोक असे आहेत की ज्यांना दोन वेळेच्या अन्नासाठी अपार कष्ट करावे लागतात, ते औषधी कसे विकत घेतील? औषधी न मिळाल्यामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या ही भुकंप, सुनामी, जलप्रलय किंवा अन्य कोणत्याही नैर्सर्गिक आपत्ती पेक्षा जास्त असल्याचेही भीषण वास्तव्य समोर आले आहे.

जगात सर्वात जास्त किमती असलेला माणसाचा जीव वाचविणारी औषध खरच इतकी महाग असतात का? या प्रश्‍नाचा शोध घेतल्यास असे लक्षात येते की, कोणतेही औषध तयार केल्यानंतर येणार्‍या खर्चापेक्षा २० ते ३० टक्के नव्हे तर १०० ते १५० पट जास्त पैसा रूग्णांच्या खिश्यातुन उकळण्यात येतो. यामुळे भारतात बेकायदेशीर असणार्‍या लॉबिंगवर फार्मासिटीकल्स कंपन्या दरवर्षी कोट्यावधी रूपये खर्च करतात, हा कडू डोस आपल्याला पचवायलाच लागेल. सर्वसामान्य रूग्णांचा जीव वाचविण्यासाठी संजीवनी ठरणार्‍या जेनेरीक औषधांचे नाव आता आपल्या तोंडात हळूहळू यायला लागले आहे. परंतु मोठ्या व नामांकित फार्मासिटीकल्स कंपन्यांचे शासन दरबारी असलेले वचन लक्षात घेता जेनेरीक औेषधांचा प्रचार व प्रसार अजूनही होत नाही. याला अपवाद आहे तो राजस्थानचा! चित्तोडचे माजी जिल्हाधिकारी डॉ. समीत शर्मा या आयएएस अधिकार्‍याने संपुर्ण राजस्थानमध्ये जेनेरिक औषधांचा केवळ प्रचार व प्रसारच नव्हे तर वापर देखील वाढवून लाखो रूग्णांचे जीव वाचवले आहे. या डॉ. समीत शर्मा यांना आपण गेल्यावर्षी अमीर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमातही पाहिले आहे. जेनेरिक औषधे व आपण वापरत असलेले ब्राण्डेड औषधांच्या गुणधर्मात कोणताच फरक नसतो परंतु किंमतीत जमीन-अस्मानचे अंतर असते. याचे उदाहरण द्यायचे म्हटल्यास ब्लड कॅन्सरवरिल एका औषधांच्या पाकिटाची किंमत एक ते दिड लाखापर्यंत आहे. मात्र तेच औषध जेनेरिक मध्ये १० हजार २००, ८ हजार ८०० व ६ हजार ५०० अशा तिन किमतीत उपलब्ध आहे.

महाग औषधी अन् जीवन स्वस्त हे दृष्टचक्र भेदण्यासाठी जळगावच्या काही स्वयंसेवी संस्था पुढे सरसावल्या आहेत. यात सर्व प्रथम उल्लेख करावा लागेल तो विद्यार्थी सहाय्यक समितीचा. कारण केवळ गरिब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाला मदत करणारी ही निस्वार्थी संस्था आता  त्याच होतकरू व गरिब विद्यार्थ्यांच्या मदतीने रूग्णसेवाही करू लागली आहे. विद्यार्थी सहाय्यक समितीने पुढाकार घेत रामानंद परिसरात लोकहित दवाखाना व जेनेरिक मेडीकल स्टोअर्स सुरू केले आहे. विद्यार्थी सहाय्यक समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.एस.एस.राणे यांच्या पुढकाराने सुरू झालेल्या या प्रकल्पात डॉ.सुरेश राणे (एमबीबीएस), डॉ.प्रमोदिनी ठाकरे (बीएएमएस) व डॉ धनराज पाटील (बीएएमएस) हे रूग्णसेवा बजावत आहेत. येथे ३७५ प्रकारची जेनेरिक औषधी उपलब्ध आहेत. येथे दररोज शेकडो रूग्ण लाभ घेत आहेत. एप्रिल महिन्यात मेहरूण परिसरात दुसरी शाखा सुरू करून नजीकच्या काळात जेनेरीक औषधांच्या १५ शाखा सुर करण्याचा मानस असल्याचे प्राचार्य डॉ.राणे यांनी सांगितले. विद्यार्थी सहाय्यक समितीच्या पावलावर पाऊल टाकत इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जळगाव शाखेनेही ओंकारेश्‍वर मंदिर परिसरात दिर्घायु दवाखाना व जेनेरिक मेडीकल स्टोअर्सला गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर प्रारंभ केला. येथे डॉ.सुमन लोढा हे दररोज तिन तास निशुल्क सेवा बजावित आहेत. जळगावच्या जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉसच्या पदसिध्द अध्यक्षा रूबल अग्रवाल याबाबत माहिती देतांना म्हणाल्या की, सर्व स्तरातील नागरिकांनी जेनेरिक औषधांकरिता आग्रह धरला पाहिजे तरच याबद्दल जनजागृती होईल. दिर्घायुचा  प्रयत्न ही सुरूवात असून लवकरच याची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. तसेच जेनेरिक औषधांच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी विशेष मोहिम हाती घेण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. एकंदरित जळगावला जेनेरिक औषधांच्या वापरासाठी  विशेष पॅटर्न अस्तित्वात येत असून याचे सर्वस्तरातुन स्वागत करण्यात येत आहे.

जेनेरिक औषध म्हणजे काय?
जेनेरिक औषध म्हणजे जे ब्राण्डेड नसते मात्र ब्राण्डेड सारखेच परिणामकारक असते. अमेरिकेच्या फुड ऍण्ड ड्रग ऍडमिनीस्ट्रश (एफडीए) कडील माहितीनुसार, ब्राण्डेड व जेनेरिक औषधी सारखीच असतात. त्यांच्यातील घटक पदार्थ हे देखील सारखेच असतात व त्यामुळे होणार परिणाम देखील जवळपास सारखेच असतात. परंतु त्यांच्या किमतीत प्रचंड तफावत असते. जेनेरिक हे नाव प्रत्येक औषधात असलेल्या केमिकल घटक पदार्थांचे नाव आहे. एखाद्या आजारावर उपचारासाठी तयार करण्यात आलेल्या औषधांमध्ये केमिकल घटक पदार्थ कमी अधिक प्रमाणात सारखेच असतात व त्यांची निर्मितीची किंमतही अत्यंत कमी असते मात्र त्यांच्यावर विशिष्ट कंपनीचे लेबल लागल्यानंतर त्याची किंमत कितीतरी पटीने वाढते. अमेरिका सारख्या देशात रूग्णांना औषध लिहीतांना त्या औषधांमधील घटक पदार्थांची नावे लिहणे बंधनकारक असते मात्र आपल्याकडे थेट कंपनीच्या नावासह औषधे लिहून दिली जातात. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास निरोगी आरोग्यासाठी दररोज एक ग्लास दुध प्यावे असे लिहिण्याएवजी दररोज अमुक-अमुक कंपनीचेच दुध प्यावे असे आपल्याकडे लिहीले जाते. व बाजारात दुध ४० ते ५० रूपये लीटरने विकले जात असले तरी डॉक्टरांनी लिहुन दिलेले दुध ४०० ते ५०० रूपये  लीटरने आपण खरेदी करतो! एफडीएच्या नियमावलीनुसार औषध तयार करतांना त्यात घटक तेच ठेवावे लागतात तसेच पेटन्ट संपल्यानंतर त्याच्या जेनेरिक औषधांचे मार्केटींग करता येवू शकते. आज पेनकिलर, मधुमेहापासून कॅन्सर व एड्ससारख्या महागड्या वैद्यकिय उपचारांसाठी जेनेरिक औषधी उपलब्ध आहेत. यामुळे जेनेरिक औेषधी एक वरदान म्हणून समोर येत आहेत. डॉ. समीत शर्मा यांच्या पुढाकरानंतर केंद्र शासनानेही जन औषधी हा प्रकल्प सुरू केला आहे. या अंतर्गत ३६१ प्रकारची औषधी व त्यांच्या किमती जाहिर करण्यात आल्या आहेत. याची माहिती १८००-१८०-८०८० या टोल फ्रि क्रमांकावर आपणास उपलब्ध होवू शकते. आता सरकारने एक पाऊल पुढे टाकत सामाजिक संस्थांनाही जेनेरिक मेडिकल उघडण्यास परवानगी देण्यास सुरवात केली आहे.

Post a Comment

Designed By Blogger