या व्यवसायात जळगावचे नाव सातासमुद्रापार नेणारे के.के.कॅन्सचे संस्थापक रजनिकांत कोठरी यांचा प्रवास इतरांना मार्गदर्शक असा आहे. त्यांच्या वडिलांचा व काकांचा धान्याचा व्यवसाय होता. यामुळे त्यांनीही धान्य व्यवसायापासून श्रीगणेश: केला. मात्र त्यांचे मन रमत नव्हते. याच काळात मुंबईला सायकल्स्चा व्यवसाय करणारे त्यांच्या मामांनी त्यांना मुंबईत बोलवून घेतले. तेथे त्यांनी हिरो सायकलच्या दुकानात काम सुरू केले. या काळात स्व.ब्रिजमोहनजी मुंजाल, बाबुजी हसंराज, हंसराज भाई, विकोचे अझिज प्रेमजी, स्व.भवरलाल जैन यांचा सहवास लाभला. यामुळे आपणही स्वत:चा व्यवसाय सुरू करावा ही खुणगाठ त्यांनी बांधली. त्याकाळात दुग्धक्र्रांतीचे वारे वाहू लागले होते. याचा अंदाज बांधत त्यांनी काही मित्रांना सोबत घेवून दुधाच्या कॅन्स तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला! सन १९७५ मध्ये जळगाव येथे स्वत:च्या फॅक्टरीचे बांधकाम सुरू केले. १९७७ मध्ये प्रायोगिक तत्वावर उत्पादन सुरू केले व त्यात यश मिळाल्याने १९७८ पासून मार्केटींग करून कॅन्सची झपाट्याने विक्री सुरू केली. सुरूवातीचे दोन-तिन वर्ष प्रचंड संघर्ष होता. तोपर्यंत गुणवत्तेच्या जोरावर के.के.कॅन्सचे नाव सर्वदुर पोहचले होते. (इंटरनेट, व्हाट्सऍप, फेसबुक नसतांनाही) सन १९८१ मध्ये इंडोनेशियामधील एका मोठ्या कंपनीने श्री.कोठारी यांच्याशी संपर्क साधून मोठी ऑर्डरी दिली. हा मोठा टर्निंग पॉइंट ठरला. प्रथमच जळगावच्या कॅन्स सातासमुद्रापार पोहचल्या!
या प्रवासाबद्दल रजनीकांत कोठारी मोठ्या अभिमानाने सांगतात, ज्यांनी-ज्यांनी पहिल्यांदा ऑर्डर दिली ती लोकं कायमची जोडली गेली. गुणवत्ता व प्रामाणिक व्यावहारामुळे आज के.के.कॅन्स ४५ देशांमध्ये निर्यात करते. आपण व्यवसायाला सुरूवात केली मात्र मोठा मुलगा अमित (बीई मेकॅनिकल) व आदर्श (बीई प्रॉडक्शन) तसेच कै.दिलीपभाई यांचा मुलगा प्रशांत या दुसर्या पिढीने व्यावसाय वाढविला व चौफेर विस्तारला. मी ऍल्युमिनीमच्या कॅन्स तयार करायचो त्यांनी स्टेनलेस स्टीलपर्यंत मजल मारली. व एक पाऊल पुढे टाकत बल्क कुलर, मिल्की मशिन, मिल्क पार्लर आदी उत्पादने सुरू केली यातील नव्या तंत्रज्ञानामुळे परदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू झाली आज पाच हजार लिटर्स क्षमतेची ही उत्पादने लवकरच १२ हजार लिटर्स क्षमतेपर्यंत करण्यावर संशोधन सुरू असल्याचेही श्री.कोठारी यांनी नमुद केले.
कानमंत्र
एखादी पदवी घेतल्यानंतर केवळ थेरॉटीकल ज्ञान मिळते. यासाठी प्रॅक्टीकल ज्ञानासाठी त्या क्षेत्रा प्रत्यक्षात काम करावे. गरज पडल्यास नोकरी करावी, परिवाराचा उद्योग असला तर तेथे मालक म्हणून नव्हे तर कर्मचारी म्हणून बारकावे समजून घ्या, तेंव्हाच तुम्ही यशस्वी उद्योजक होवू शकता, असा सल्ला रजनीकांत कोठारी यांनी तरूण पिढीला दिला आहे.
खंत
शिक्षण पुर्ण झाल्यानंतर मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जाणार्या तरूणांचे प्रमाण वाढत आहे. परिणामी आपल्या भागाची प्रगती खुंटत आहे. आपल्या ज्ञानाचा फायदा स्वत:सह आपल्या परिसरालाही व्हायला हवा, असा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे असल्याचेही श्री.कोठरी यांनी नमुद केले.व्यवसायात प्रामाणिकता व नितीमत्ता महत्वाची असते. सर्वोत्तम दर्जाचा माल वेळेवर तयार करून व्यवहारात पारदर्शकता ठेवण्याकडे लक्ष दिल्याने के.के.कॅन्सचे रूपांतर वटवृक्षात होण्यास मदत झाली. ४५ देशात आमची उत्पादने निर्यात होतात यापेक्षा ४५ देशांनी जळगावच्या मातीवर विश्वास दाखविला आहे. व तो सन १९८१ पासून सन २०१६ पर्यंत कायम आहे, याचा आनंद जास्त आहे.
- रजनीकांत कोठारी, संचालक, के.के.कॅन्स,जळगाव
Post a Comment