१९९३, २००६ आणि २६/११ची पुनरावृत्ती नको

नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या काळात देशात घातपात घडवण्याचा कट रचणार्‍या सहा दहशतवाद्यांना दिल्लीच्या विशेष पोलीस पथकाने मंगळवारी अटक केली. दिल्ली आणि मुंबईसह आणखी काही भागांत स्फोट व दहशतवादी कारवाया करण्याचा पाकिस्तान समर्थक दहशतवाद्यांचा कट होता या सहा दहशतवाद्यांचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे. विशेष म्हणजे, दहशतवाद्यांनी मुंबई लोकलची रेकी देखील केल्याचे उघड झाल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. कारण या घटनेमुळे १९९३ साली घडलेले मुंबईतील साखळी बॉम्बस्पोट, मुंबईत ११ जुलै २००६ रोजी अवघ्या ११ मिनिटांच्या अंतरात उपनगरी गाड्यांमध्ये झालेल्या अर्ध्या डझनाहून अधिक स्फोट व २६/११चा दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी दोघांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले असल्याचेही तपासात उघड झाल्याने हा विषय अधिकच गंभीर झाला आहे. आधीच अफगणिस्तानातील बिघडलेली स्थिती, त्यात पाकिस्तानचा वाढता हस्तक्षेप या बाबी भारतासाठी डोकंदूखी ठरणार्‍या आहेत. यामुळे तपास यंत्रणांना येणार्‍या काळात डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे.



सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ला करण्याची तयारी

कोणत्याही देशाला हादारा द्यायचा असेल तर त्याच्या राजधानीला लक्ष केले जाते. यामुळे देशाची राजधानी दिल्ली व देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही दोन महत्वाचे शहरे नेहमीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिली आहेत. अफगणिस्तानात तालीबानी राजवट आल्यानंतर भारतासह अन्य देशांमध्ये दहशतवादी कारवाया वाढू शकतात, अशा कयास आधीच बांधण्यात आला होता. त्यातच पाकिस्तन पुन्हा एकदा कुरापती काढू शकतो, असा इशाराही भारतीय गुप्तचर संघटनांनी दिला होता. याच गुप्त माहितीच्या आधारे राजधानी दिल्लीसह महाराष्ट्र तसेच उत्तर प्रदेश या राज्यांतील महानगरात ऐन सणासुदीच्या हंगामात दहशतवादी कारवायांचा कट दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. दिल्ली पोलिसांनी महाराष्ट्र आणि प्रामुख्याने उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी दोघांना पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयने प्रशिक्षण दिल्याचे स्पष्ट झाले आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी दोघांनी पाकिस्तानात प्रशिक्षण घेतले आहे. त्यानंतर भारतात विविध ठिकाणी दहशतवाद्यांनी रेकी केली होती. ऐन सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ला करण्याची तयारी या दहशतवाद्यांनी केली होती. याशिवाय देशात विविध ठिकाणी याआधीच स्फोटकं पाठविण्यात आलेली असल्याची शक्यताही चौकशीतून व्यक्त करण्यात आली आहे. एका दहशतवाद्याला मुंबई-दिल्ली रेल्वेचे तिकीट काढून देणार्‍यालाही एटीएसने ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिसांनी पकलेल्या दहशतवाद्यांकडून दिल्लीसह मेट्रो शहरात बॉम्बस्फोट करण्यात येणार होते. ओसामा व जीशन बॉम्ब बनविण्याची तयारी करत होते. या दोघांनी दोन आयईईडीही बनवल्याचे तपासात समोर आले आहे.  पोलिसांनी आधी दोघांना दिल्लीतून तर समीर नावाच्या इसमाला उत्तर प्रदेशातील कोटामधून आणि तिघांना राजस्थान येथून ताब्यात घेण्यात आले. झीशान आणि ओसामा या दोघांना मस्कतमार्गे पाकिस्तानात पाठवण्यात आले होते. तिथे त्यांना स्फोट घडवणे आणि शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. एके ४७ रायफल कशी चालवावी, हेही शिकविले होते. हे प्रशिक्षण १५ दिवसांचे होते. 

आयएसआय व दाऊद गँग या दोघांचाही संबंध 

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया (४७) हा मुंबईतील सायन भागातील रहिवासी असून टॅक्सीचालक आहे. जान मोहम्मद शेख हा हवाला रॅकेट पाहत होता आणि तो अंगाडीयांच्या संपर्कात होता. स्लिपर सेलला पैसे देणे, दहशतवादी कृत्याकरता लागणार्‍या सामुग्री करता पैसे देणे याकरता हा या पैशांचा वापर केला जायचा. यामुळे आता मुंबई आणि दिल्ली येथील अंगाडीया दहशतवादविरोधी पथकाच्या रडारवर आहेत. टेरर फंडिगकरिता दाऊद गँगने अंगडियांना अ‍ॅक्टिव्हेट केले आहे. जान शेख याच्यामार्फत पैशांचा व्यवहार केले जात होता. १९९३ चे साखळी बॉम्बस्फोट घडवण्यासाठी मुंबईतील स्थानिक स्लीपर सेलची मदत पाकिस्तानातील सूत्रधारांकडून घेण्यात आली होती. तपासात हे उघडकीस आले होते. त्यानंतर २६/११ च्या मुंबई हल्ल्यातही कसाब आणि त्याच्या साथीदारांनी जो उच्छाद मांडला होता, त्यांनाही पाकिस्तानमध्ये बसून सुचना देण्यात येत होत्या. भारताविरोधातील दहशतवादाचा वणवा पेटता ठेवण्यासाठी मुंबईवर २००८ मध्ये २६/११ रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा सूत्रधार दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याकडेच यावेळच्या हल्ल्याचेही सूत्रसंचालन आयएसआयने सोपवले होते. या दहशतवादी कारवायांसाठीची शक्तिशाली स्फोटके आणि ग्रेनेड्ससारखी सामग्री भारतात आणण्याची जबाबदारीही दाऊदच्या ‘डी गँग’वर होती. त्यामुळे पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणा भारतात अशांतता माजवण्यासाठी कशा सरसावल्या आहेत, तेच उघड झाले आहे. आताही पोलिसांच्या तपासात आयएसआय व दाऊद गँग या दोघांचाही संबंध समोर आला आहे. आधीच्या दहशतवादी हल्ल्यांमध्येही स्थानिक तरुणांचे व स्लिपर सेलचे कनेक्शन होते. तसेच कनेक्शन येथेही दिसते. स्थानिक युवकांना विश्वासात घेऊन त्यांना या दृष्कृत्यांमध्ये सहभागी करुन घेतले जाते. स्लिपर सेलच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया होत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. त्यांना रसद पुरवणार्‍या संघटनांची पाळेमुळे उखडायला हवीत. येणार्‍या काळात नवरात्रोत्सव, दिवाळीसह काही राज्यांच्या निवडणुका देखील येत आहेत. याकाळात जर काही अनुचित घटना घडली तर त्याचे मोठे परिणाम होवू शकतात. यासाठी याविषयावरुन केवळ राजकारण करत बसण्यापेक्षा देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो तेव्हा सर्वांनी आपली वज्रमूठ आवळली पाहिजे. यासह दहशतवाद्याच्या मुकाबल्यासाठी सातत्याने दक्ष राहावे लागणार आहे. सीमेपलीकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि फूस, त्यांच्या कारवायांसाठीची रसद यावर करडी नजर ठेवावी लागेल. 


Post a Comment

Designed By Blogger