पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात काय चाललेयं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज १७ सप्टेंबरला ७१ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने भाजप १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच पुढील तीन आठवड्यांपर्यंत विविध कार्यक्रम राबवणार आहे. याच बरोबर भाजपकडून ‘सेवा आणि समर्पण’ मोहीमही राबवली जाणार आहे. विशेष म्हणजे, ७ ऑक्टोबर २०२१ रोजी मोदींच्या प्रशासकीय जीवनाचे २० वर्षही पूर्ण होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धाडसी निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. पंतप्रधानपदाच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांनी घेतलेल्या नोटाबंदी पासून दुसर्‍या टर्म घेतलेल्या कलम ३७० रद्द करण्यापर्यंत त्यांनी प्रत्येकवेळी धक्कातंत्राचा वापर केला आहे. त्यांचे निर्णय केवळ सर्वसामान्यांसाठीच नव्हे तर त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक सदस्यांसाठी धक्का देणारे ठरले आहेत. प्रत्येकवेळी गोपनीयता हे त्यांचे मोठे शस्त्र ठरले. मात्र प्रत्येकवेळी त्यांनी काही सुचक इशारे दिल्यानंतरही त्यांच्या मनाचा अंदाज कोणालाही घेता आला नाही, हे विशेषत्त्वाने नमूद करावे लागेल. राजकारणाची वेगळी वाट चोखाळणार्‍या आणि कर्मठ वृत्तीच्या नरेंद्र मोदींच्या रुपाने देशाला कणखर असा पंतप्रधान लाभला आहे, हे आता त्यांचे विरोधकही मान्य करु लागले आहेत. मोदी पंतप्रधानपदी आल्यानंतर देशाला ‘अच्छे दिन’ आले की नाही, हा वादाचा व चर्चेचा विषय ठरु शकतो मात्र त्यांच्या इतके धाडसी निर्णय घेणारा पंतप्रधान आजपर्यंत लाभला नव्हता, हे तितकेच खरे आहे. कुठलाही विषय शीघ्र गतीने शिकण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे.



ग्लोबल लीडर म्हणून प्रतिमा

नरेंद्र मोदी भारतीय राजकारणातील तो चेहरा आहे ज्यांनी अवघ्या काही वर्षांमध्ये देशातील राजकारणाची अवघी परिभाषाच बदलून टाकली. त्यांच्या राजकीय रणनीती पुढे सारा विपक्ष धारातीर्थी पडला शिवाय जगापुढे ग्लोबल लीडर म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यात देखील ते यशस्वी झाले. यामुळेच आज जनता मोदींकडे एका नायकाच्या रूपाने पहाते आहे केवळ मोदीच असे राजकीय नेता आहेत ज्यांना विदेशात देखील मोठ्या प्रमाणात सन्मान दिला जातो. वैश्विकस्तरावर नरेंद्र मोदींनी संबंध उत्तम रीतीने जोपासले आहेत आणि मैत्री देखील सांभाळली आहे. त्यामुळे संपूर्ण जग त्यांच्या कुटनीतीची प्रशंसा करते. पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सर्वात आधी त्यांनी घेतलेला मोठा निर्णय म्हणजे नोटाबंदीचा! काळापैसा रोखण्यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे मोदी सरकारवर टिकेची झोड उठली होती. हा निर्णय यशस्वी झाला का फसला? याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतात मात्र हा प्रचंड धाडसी निर्णय होता, यावर सर्वांचे एकमत होईल. यानंतर ज्या निर्णयाने भारतीय सैन्याचे मनोबल उंचावले व भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा निर्माण झाला तो म्हणजे सर्जिकल स्ट्राईकचा. भारतीय लष्कराच्या उरी येथील हवाई तळावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला या हल्ल्यात भारतीय लष्कराचे १८ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी मोदी सरकारने पाकिस्तानमधील पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता. यावेळी भारतीय जवानांनी थेट पाकिस्तान व्याप्त काश्मिरमध्ये घुसून अनेक दहशतवाद्याचा खात्मा केला. यानंतर झालेल्या पुलवामा हल्ल्यांनंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केला. यासह जीएसटी : एक देश, एक कर, तीन तलाक कायदा, काश्मीरमधून ३७० कलम हटविणे, सीएए/एनआरसी लागू करणे, बँकांचे विलीनीकरण हे त्यांचे धाडसी निर्णय मानले जातात. मोदी सरकारच्या काळात अयोध्या राम मंदिर, भारताचे मंगळयान यश असेही काही प्रसंग आले. 

भारताकडे पाहण्याची दृष्टी बदलली

आताही देशातील वाढती महागाई, बेरोजगारीवरुन विरोधक त्यांच्यावर टीकेची झोड उठवत असले तरी प्रतिष्ठित टाइम मॅगझिनने २०२१ मधील सर्वात प्रभावी लोकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा समावेश केला आहे. पंतप्रधान मोदींचा कालखंड अनेक अर्थांनी आणि अनेक घटनांनी आगळावेगळा ठरवला जाऊ शकतो. स्वतंत्र भारतात घेतलेल्या १०० निर्णयांची यादी तयार करावयाच म्हटल्या त्यात पहिल्या दहामध्ये मोंदींच्याच निर्णयांची वर्णी लागेल, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. असे असले तरी कोरोनाकाळात पंतप्रधान मोदींच्या बॅ्रण्ड इमेजला जोरदार धक्का बसला. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील याचे पडसाद जाणवले. याची मोठी राजकीय किंमत येणार्‍या काळात चुकवावी लागू शकते, याची जाणीव मोदींना असल्याने डॅमेज कंट्रोलसाठी आतापासून ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचा पहिला अंक गुजरातमध्ये पहायला मिळला. गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. परंतु तत्पूर्वी भाजपाने त्यांचा मुख्यमंत्री बदलला आहे. कुणालाही काही भनक न लागताच गुजरातमध्ये विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि २४ तासांत भूपेंद्र पटेल हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून पुढे आले. २७ दिवसांपूर्वीच भाजपाने आगामी २०२२ विधानसभा निवडणूक विजय रुपाणी-नितीन पटेल यांच्या जोडीसोबत लढणार असल्याचे जाहीर केले. याआधीही भाजपाने मागील काही दिवसांत कर्नाटक, उत्तराखंड याठिकाणचे मुख्यमंत्री बदलले. तर आसाममध्ये निवडणुकीनंतर नेतृत्वात बदल केला होता. २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोदी कधी काय निर्णय घेतली? याची खात्री त्यांच्याच पक्षातील बड्या नेत्यांसह कुणीच देवू शकत नाही. सध्याची त्यांची कार्यपध्दती पाहता नरेंद्र मोदींच्या मनात काय चाललेयं? हाच प्रश्न सर्वांना पडत आहे. अर्थात त्याचे उत्तर मिळविणे तितसे सोपे नाही. राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा भाग वगळता नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात भारताने केलेली कामगिरीची दखल संपूर्ण जगाने घेतली आहे. आज पाकिस्तानचे तर सोडाच मात्र चीनही भाराताबाबतील निर्णय घेतांना शंभर वेळा विचार करतो. अमेरिका, रशियासह अन्य मोठे देशांची भारताकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताची अशीच घोडदौड सुरु राहो, हीच अपेक्षा... नरेंद्र मोदींसारख्या कणखर नेतृत्वाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Post a Comment

Designed By Blogger