धक्क्याला बुक्का!

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्याचे सत्र भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सुरू केल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकार वारंवार अडचणीत येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री सोमय्यांच्या रडारवर आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढत आहेत. अशातच सोमवारी किरीट सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यासाठी रोखण्याच्या कारवाईवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये राजकीय तणातणी सुरू झाली आहे. भाजपाकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांना प्रतिउत्तर देण्यासाठी आघाडी सरकारने फडणवीस सरकारच्या काळातील कथित भ्रष्टाचार उघड करण्याची रणणीती आखली आहे. त्यादृष्टीने काही जण कामाला देखील लागले आहेत. भ्रष्टाचाराचे समर्थन कुणीच करणार नाही मात्र राज्यात आघाडी सरकार स्थापन होवून आता जवळपास दोन वर्ष होत आली, मग आताच फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील भ्रष्टाचार कसा आठवला? अर्थात याचे उत्तर संपूर्ण महाराष्ट्राला ठावूकच आहे!


 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज

महाराष्ट्रातील राजकारण हे सुसंस्कृत राजकारण म्हणून ओळखले जाते. मात्र गत दीड-दोन वर्षांपासून राजकारणाची पातळी घसरली आहे असे म्हणण्यापेक्षा राज्यात राजकारणाची ग्रेड कॉमेडी सर्कस सुरु झाली आहे, असे म्हटलेलेच योग्य ठरेल. त्यातच शिवसेना व भाजपमधील काही वाचाळवीर नेत्यांनी पार कहरच केला आहे. पत्रकार अर्णब गोस्वामी व बॉलीवूड अभिनेत्री कंगणा राणावत यांच्या प्रकरणापासून सुरु झालेले सुडाचे राजकारण आता भलत्याच वळणावर येवून ठेपले आहे. भाजपाने केंद्रीय तपास संस्थाच्या माध्यमांचा वापर करुन दबावतंत्राचा वापर करायचा आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने कारवाई करत प्रतिउत्तर द्यायचे, असा खेळ संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. शिवसेनेकडून खासदार संजय राऊत प्रत्येक गोष्टीत मत नोंदवत जणू एकाप्रकारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाच अडचणीत आणण्यात कोणतीच कसर सोडतांना दिसत नाही. शिवसेनाला प्रतिउत्तर देण्यासाठी भाजपाने मैदानात उतरवलेल्या किरीट सोमय्या या राखीव खेळाडूने तर अनेकांना सळो की पळो करुन सोडले आहे. पेशाने सीए असलेले किरीट सोमय्या विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. त्यामुळे विरोधकांच्या अडचणी वाढतात. शिवसेना नेते प्रताप सरनाईक, अनिल परब, रविंद्र वायकर, भावना गवळी, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, अनिल देशमुख, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेकांवर सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यापैकी अनेक नेत्यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी झाली आहे. विरोधकांवर थेट अंगावर घेणारे नेते अशी सोमय्यांची ओळख आहे. आता सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून रोखल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीने भाजपावर प्रतिवार करण्याची घोषणा केली असली तरी याचवेळी आघाडी सरकारमध्येच नाराजीचे फटाके फुटू लागले आहेत. सोमय्या प्रकरणात गृहखात्याने चक्क मुख्यमंत्र्यांनाच अंधारत ठेवल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाच्या खुलाशानंतर समोर आले. या सर्व प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

कोणता झेंडा घेवू हाती?

हे तीन पक्षांचे सरकार असल्याने समन्वयाने आणि चर्चेने प्रश्न सोडविले पाहिजेत. परस्पर निर्णय होत असतील आणि त्याचा परिणाम सरकारच्या स्थिरतेवर होत असेल तर हे अत्यंत धोकादायक आहे, अशी तीव्र भावनाही त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर, ‘वरिष्ठ अधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांना ब्रीफिंग केले की नाही माहिती नाही,’ असे म्हणत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी गृहविभागावर घेतली. ज्या गोष्टींचा परिणाम सरकारच्या स्थिरतेवर होऊ शकतो असे विषय मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे यांच्याशी बोलूनच सोडविले गेले पाहिजेत. सोमय्या प्रकरणात तसे झाले नाही. परिणामी, विरोधकांना निष्कारण सरकारला बोल लावण्याची संधी मिळाली. मात्र राणे यांच्यावरील कारवाईची कसलीही माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना नव्हती, असे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. जर सोमय्या प्रकरणात चर्चा झाली असती, तर आज सरकारला खुलासे करण्याची वेळ आली नसती. औरंगाबाद येथील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी भाजप-शिवसेना युती संदर्भात सुचक वकव्य केल्यानंतर आघाडी सरकारमधील नाराजीनाट्य वाढतांना दिसत आहे. रायगड जिल्ह्यातही याचीच प्रचिती पहायला मिळाली. श्रीवर्धनमध्ये सोमवारी शिवसेनेच्या एका कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टिका केली. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच असे सांगत गिते राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली आहे. यानिमित्ताने रायगडमधील शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस खास करुन अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे असा जुना वाद, राजकीय वैर पुन्हा एकदा डोके वर काढू लागल्याचे दिसत आहे. या नाट्याला भाजप-सेना युतीपेक्षा मुंबई महापालिका निवडणुकीसह फेब्रुवारीमध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांची किनार लाभली आहे. या निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या आहेत महाविकास आघाडीमधील स्थानिक पातळीवरील मतभेद समोर येऊ लागले आहेत. राज्यात जरी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस मतभेद बाजूला ठेवत एकत्र जरी आले असले तरी एकमेकांप्रती असलेली कटुता अजूनही मिटायचे नाव घेत नाही. अनंत गीते यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेवरून महाविकास आघाडीमध्ये वादळ उठण्याची चिन्हे आहेत. भाजपने ही संधी साधत महाविकास आघाडीला डिवचले आहे. ‘कुठल्याही शिवसैनिकाची, नेत्याची किंवा मंत्र्यांची नार्को टेस्ट करा. त्याच्या तोंडून, ‘काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी नको’ हेच शब्द बाहेर पडतील,’ असे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. राज्य पातळीवर होत असलेल्या या धक्क्याला बुक्का या राजकारणामुळे स्थानिक पातळीवर जास्त गोंधळ निर्माण होतांना दिसत आहे. जर हे असेच सुरु राहिल तर कोणता झेंडा घेवू हाती? हा प्रश्न कार्यकर्त्यांच्या डोक्याचा भुगा केल्याशिवाय राहणार नाही.Post a Comment

Designed By Blogger