कोरोनाचा आलेख घसरतोय पण लढाई संपलेली नाही

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात थैमान घातले आहे. ऑक्सिजन, रेमडिसिव्हीरच्या तुटवड्यासह वैद्यकीय व्यवस्था कोलमडून पडली आहे. देशात दैंनदिन बाधितांची संख्या चार लाखांवर पोहचली आहे. अशा संकटसमयी एक दिलासादायक माहिती समोर आली असून महाराष्ट्रासह दिल्ली, छत्तीसगढ, पंजाब, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दमण आणि दिव, लक्षद्वीप आणि लडाख या ठिकाणी गेल्या १५ दिवसांमध्ये रुग्णसंख्या घटतांना दिसत आहे. महाराष्ट्रात १२ जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांची संख्या घटतांना दिसत आहे. आलेखानुसार मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, औरंगाबाद, जळगाव, नांदेड, लातूर, नंदूरबार, वाशिम, भंडारा, धुळे आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांची नोंद कमी झाल्याचे दिसत आहे. राज्याच्या दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेखही सपाट झालेला असून त्यात काही दिवसांपासून मोठी वाढ झालेली नाही. हे खूपच चांगले संकेत आहेत. मात्र पहिली लाट ओसरत असतांना आपण जी चुक केली ती पुन्हा होवू नये, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.



देशातील परिस्थिती चिंताजनक 

गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोनाची साथ सुरू आहे. मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्रात पहिला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर संपूर्ण देशांत लॉकडाऊन करण्यात आला. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आरोग्य कर्मचारी व पोलिसांनी कडक उपाययोजना करून कोरोनाला अटकाव केला. ऑगस्टनंतर विशेषत: गणेशोत्सवानंतर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या कोरोनावर सप्टेंबर अखेरनंतर पुन्हा नियंत्रणात मिळवण्यात आले आहे. दिवाळीनंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढतील, अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र दिवाळी होऊन पुढचे दोन महिने कोरोनाची आकडेवारी नियंत्रणातच होती मात्र फेब्रुवारी महिन्यानंतर आलेल्या दुसर्‍या लाटेत कोरोनाचा आलेख पुन्हा वर चढण्यास सुरुवात झाली. दुसर्‍या लाटेत महाराष्ट्रात १८ एप्रिलला ६८ हजार ६३१ नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर २ मे रोजी ५६ हजार ६४७ नवे रुग्ण आढळले होते. यावरुन नव्या रुग्णांमध्ये घट होतांना दिसत आहे. यापैकी बहुतांश जिल्ह्यांमध्ये ४ ते १७ एप्रिल या कालावधी रुग्णसंख्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचल्याचे आढळले. त्यानंतर त्यात घट झालेली आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरीही देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने २ कोटींचा आकडा पार केला आहे. भारत हा जगातील दुसरा देश आहे, जिथे २ कोटीहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोरोना संसर्ग वाढीचा वेग इतका आहे की, अवघ्या १७ दिवसांत रुग्णांची संख्या १ कोटींवरून २ कोटींवर गेली आहे. गेल्या २४ तासात देशभरात कोरोनाचे ३ लाख ५७ हजार २२९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या २४ तासात कोरोनामुळे ३ हजार ४४९ लोकांचा मृत्यू झाला आहे. यावरुन देशातील परिस्थिती किती चिंताजनक आहे, याची कल्पना येते.

१२ राज्यांमध्ये एक लाखांहून अधिक सक्रीय रुग्ण

दुसरीकडे १२ राज्यांमध्ये सद्यस्थितीत एक लाखांहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. त्यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू या राज्यांमध्ये १ लाखांहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. तर सात राज्यांमध्ये सरासरी ५० हजार ते १ लाख सक्रीय रुग्ण आहेत. २२ राज्यांमध्ये पॉझिटीव्हीटी दर हा १५ टक्क्यांहून अधिक आहे. महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये मागील १५ दिवसांमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. हे खूप प्राथमिक संकते आहेत. या आकड्यांच्या आधारे परिस्थितीचं विश्लेषण करणे घाईचे ठरेल. जिल्हा आणि राज्य स्तरावर करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवणे गरजेचे आहे. असे केल्यानेच आपण यावर नियंत्रण मिळवून दैनंदिन संख्या कमी करु शकतो, असे मत आरोग्य मंत्राल्याचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे. याकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाही. जर आपण कोरोनाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास लक्षात येते की, काही राज्यांमध्ये काही प्रमाणात रुग्ण संख्या कमी झाली असली तरी अनेक राज्यांमध्ये ती वाढत असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. विशेषत: अंदमान निकोबार, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, गोवा, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, केरळ, मणिपूर, मिझोरम, नागालॅण्ड, मेघालय, ओदिशा, पुद्दचेरी, राजस्थान, सिक्किम, तामिळनाडू, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमधील दैनंदिन रुग्णसंख्या वाढत आहे. 

...तर तिसरी लाट आल्याशिवाय राहणार नाही

लसीकरणाचा वेग मंदावला तर अनेक ठिकाणी तिसरी लाट येईल अशी भीतीही व्यक्त केली जातेय. पहिली लाट ओसरत असतांना लोकांनी मुक्त वातावरणात आपली कामे करण्यास सुरुवात केली. लोक काहींसे निर्धास्त झाल्यासारखे वागत होते. त्यांना मास्क वापरणे नकोसे वाटू लागले होते. आताही कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली असली तरी कोरोनाचा धोका संपलेला नाही. उलट आपण जेवढे बेफिकिरपणे वागू तेवढा कोरोना आपल्या जास्त जवळ येणार आहे. कोरोनावरील लस जरुर आलेली असली तरीही आपण शंभर टक्के सुरक्षित झालो असे नाही. कारण संपूर्ण जगात लसीकरण होत नाही तोपर्यंत कोरोना आटोक्यात येणार नाही. त्यामुळे कोरोनाची ही लढाई अजून किमान वर्ष-दोन वर्षे तरी लढावी लागणार आहे. त्यासाठी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे व सतत हात धुणे हे खबरदारीचे उपाय आपल्याला सुरुच ठेवावे लागणार आहेत. कोरोनाचा लढा अजून संपलेला नाही. ही लढाई दिर्घकालीन निश्‍चितच आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. आजही बाजारात विनाकारण होणारी गर्दी, रस्त्यांवर फिरणारे रिकामटेकडे यांना वेळीच रोखले नाही तर परिस्थिती अजून खराब होवू शकते. महाराष्ट्रात खरोखरच कोरानाचा आलेख खाली येत असेल तर हे निश्‍चितच चांगले संकेत असून रुग्णसंख्या घटविण्यासाठी या स्थितीत जिल्हा आणि राज्य पातळीवर सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. तरच कोरोनाला अटकाव करता येईल, आताही आपण गाफिल राहिलो तर तिसरी लाट आल्याशिवाय राहणार नाही.

Post a Comment

Designed By Blogger