राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या चिखलफेकीत कॉर्पोरेट जगतावर शिंतोडे उडत असतात. केंद्रातील मोदी सरकारवर सुटाबुटातील उद्योगपतींचे सरकार, अशी टीका केली जाते. मात्र स्वत:वर होणार्या टीकेकडे दुर्लक्ष करत देशातील प्रमुख उद्योगपती कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. कोरोनाच्या संकटकाळात भारतीय उद्योजक फायद्या-तोट्याच्या गणितांपेक्षा देशहिताचा विचार करत एकी दाखवत आहेत. भारतावर ओढवलेल्या ऑक्सिजन संकटावर मात करण्यासाठी टाटा, अंबानी, जिंदाल, महिंद्रा आणि इतर बड्या उद्योगांनी पुढाकार घेत कोरोना रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरु केले आहे. कोरोना विरुध्द सुरु असलेल्या या युध्दात उद्योग जगताने सर्व स्वार्थ बाजूला ठेवत निस्वार्थ सेवेचा नवा पायंडा पाडला आहे. ज्या वेळी देशाला गरज होती त्या वेळी ते देशासाठी एकत्र उभे राहिले. याचे कौतूक करायलाच हवे.
प्रमुख उद्योगपती पुढे सरसावले
गेल्या काही सलग दिवसांपासून देशातील कोरोनाबाधितांची संख्या नवीन उच्चांक गाठताना दिसत आहे. कोरोनामुळे होणार्या मृत्यूंमध्येही वाढ होत आहे. ऑक्सिजन, कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांची कमतरता जाणवू लागली आहे. संपूर्ण देशात बिकट, भयावह आणि गंभीर परिस्थिती कायम आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक उद्योजक ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी पुढे आले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी, टाटा समूहाचे रतन टाटा, जिंदाल स्टीलचे नवीन जिंदाल, महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, वेदांत समूहाचे अनिल अगरवाल, इंडियन ऑइल लिमिटेडचे माधव वैद्य, भारत पेट्रोलियमचे के. पद्माकर, स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या चेअरपर्सन सोमा मोंडल यासारखे अनेक भारतीय उद्योजक मदतीसाठी धावून आले आहेत. देश अडचणीत असताना मदतीला धावून येणारा उद्योग समूह म्हणून ख्याती असलेले टाटा पुन्हा एकदा ऑक्सिजनच्या कमतरतेवर उपाय घेऊन आले आहेत. टाटा समूहाच्या वतीने क्रायोजेनिक ऑक्सिजनचे कंटेनर थेट सिंगापूरहून मागवले. ऑक्सिजनचा तुटवड्यावर मात करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रिजने पुढाकार घेतला असून, कंपनीच्या विविध रिफायनरीमध्ये सध्या प्रतिदिन १ हजार टन वैद्यकीय ऑक्सिजनची निर्मिती केली जात आहे. रिलायन्स द्रवरूप प्राणवायूचे उत्पादन करीत नाही. मात्र, कोरोना काळात वैद्यकीय ऑक्सिजनची गरज वाढल्याने त्याची निर्मिती करण्यात येत असून कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या राज्यांत त्याचे मोफत वितरण केले जात आहे. रिलायन्सने सौदी अरेबिया, जर्मनी, बेल्जियम, नेदरलँड्स आणि थायलंड येथून २४ आयएसओ साठवणूक टाक्यांची हवाईमार्गे वाहतूक केली. या साठवणूक टाक्यांमुळे देशातील वैद्यकीय द्रवरूप प्राणवायूच्या वाहतुकीतील अडथळे कमी होण्यास मोठी मदत होत आहे.
अमेरिकेतील ४० सीईओंची टास्क फोर्स
महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ‘ऑक्सिजन ऑन व्हिल्स’च्या अभिनव प्रयोगातून आपल्या बोलेरो पिकअप ट्रकच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्सिजन सिलेंडरचा सप्लाय सुरु केला आहे. पहिल्या टप्प्यात ही सुविधा मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूरमध्ये सुरु करण्यात आली आहे. ‘ऑक्सिजन ऑन व्हिल्स’ हा उपक्रम सुरळितपणे चालवण्यासाठी एक कंट्रोल रुम बनवण्यात आली आहे. याशिवाय कंपनीने ऑक्सिजन सिलेंडर ठेवण्यासाठी गोदामही तयार केले आहे, जेथे जवळच्या ऑक्सिजन प्लाँटमधून रिकामा ऑक्सिजन सिलेंडर पुन्हा वापरण्यासाठी रिफिल केला जाईल. केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील उद्योजकही मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. मूळचे पंजाबचे असलेले न्यूयॉर्कमधील उद्योजक जसप्रीत राय यांच्या मालकीची सानराय इंटरनॅशनल ही कंपनी ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्सची निर्मिती करते. जसप्रीत या महिन्याच्या अखेरिस भारतात ३० हजार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स पाठवणार आहेत. शिकागो येथील सुधीर रवी यांनी भारतीय रुग्णालयांसाठी औद्योगिक श्रेणीतील ११ ऑक्सिजन जनरेटर पाठविणार असून त्यामुळे पुढील सहा महिन्यांपर्यंत ५० हजारजणांसाठी ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकणार. ब्रिटनमध्ये राहणारे भारतीय वंशाचे मूळ अब्जाधीश मोहसिन आणि झुबैर इसा यांनी गुजरातमधील चार रुग्णालयांना ३५ लाख डॉलरची मदत दिली आहे. भारताची मदत करण्यासाठी अमेरिकेतील ४० कंपन्यांच्या सीईओने पुढाकार घेतला आहे. या सीईओंनी एका टास्क फोर्सची स्थापना केली आहे.
देशाच्या मदतीसाठी धाव
अलीकडेच गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारतीय वंशाचे उद्योजक सुंदर पिचाई यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर १३५ कोटींच्या मदतीची घोषणा केली. दुसरीकडे मायकोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला यांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यानही कॉर्पोरेट जगताने आपली सामाजिक बांधिलकी दाखवून दिली होती. त्यावेळी टाटांनी सर्वाधिक आर्थिक मदत करत संपूर्ण भारतीयांची मने जिंकली होती. आनंद महिंद्रा यांनी आगामी काही महिन्यांचे आपले १०० टक्के वेतन कंपनीच्या समाजसेवा शाखेला दिले होते. अब्जाधीश उद्योगपती अनिल अगरवाल यांच्या वेदांता समूहाने भारतातील आपल्या खाणीतील रोजंदारी व कंत्राटी कामगारांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला होता. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी स्वदेशी व्हेंटिलेटर संशोधनासाठी ५ कोटी रुपये दिले. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग समुहाने दोन आठवड्यांच्या अत्यंत कमी कालावधीत १०० बेडची क्षमता असलेले देशातील पहिले कोरोना समर्पित रुग्णालय उभारले होते. तर क्वारेंटाईन फॅसिलिटी, चाचणीच्या किट आणि प्रति दिन १० लाख मास्कची निर्मिती रिलायन्सकडून करण्यात येत होती. आताही हेच प्रमुख उद्योगपती कोरोनाशी दोन हात करण्यासाठी बॅटलफिल्डवर केंद्र व राज्य सरकारांसोबत उभे राहिले आहेत. सोईस्कर राजकारणामुळे व फुटक प्रसिध्दी मिळत असल्यामुळे याच उद्योगपतींवर टीका केली जाते, आरोप केले जातात मात्र ही सर्व कटूता विसरुन ही सर्व मंडळ संकटकाळी देशाच्या मदतीसाठी धावून आली आहे. या सर्व उद्योगपतींनी निस्वार्थ सेवेचा जो नवा पायंडा पाडला आहे त्याला देश कधीही विसरणार नाही. त्यांच्या या कामाबद्दल त्यांचे जेवढे कौतूक करावे तितके कमीच आहे.
Post a Comment