ममतादीदी ‘खेला होबे’

बंगालची विधानसभा निवडणूक भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते मैदानात उतरले होते. पंतप्रधान मोदींनी कोरोना काळातही अनेक सभा घेत भाजपच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तसेच आम्ही २०० हून अधिक जागांवर विजय मिळवू, असा दावा अमित शहा यांच्याकडून केला जात होता. मात्र बंगालच्या मतदारांवर अजूनही ममतादीदींचीच जादू कायम असल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. भाजपाच्या पुर्ण फौजेला एकट्या ममतादीदी उरुन पुरुन निघाल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे दीदींचे अभिनंदन करायलाच हवे. या निकालाचे दुसरे वैशिष्ट म्हणजे, भाजपाला सत्ता मिळवता आली नसली तरी गतपंचवार्षिकच्या तुलनेत खूप मोठ्या प्रमाणात जागा मिळविल्या आहेत. या निवडणुकीत ममतादीदींनी भाजपाचा पराभव केला असला तरी जणू आपणच भाजपाला छोबीपछाड दिली अशा आर्विभावात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनासहीत अन्य विरोधी पक्षांचे सेलिब्रेशन म्हणजे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाने सारखा प्रकार म्हणावा लागेल.



मुस्लिम मतदार ठामपणे ममतांच्या पाठिशी

बंगाल विधानसभेची निवडणूक भाजपाने सुरुवातीपासून प्रतिष्ठेची केल्यामुळे याकडे  संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेच्या जोरावर आपण ममता बॅनर्जींना धूळ चारू, असा आत्मविश्‍वास भाजप होता. त्यासोबतच भाजपने आपली पूर्ण ताकद ही निवडणूक जिंकण्यासाठी झोकून दिली होती. असे असतानाही ममता बॅनर्जी यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचे भाजपचे स्वप्न उद्ध्वस्त झाले आहे. निवडणुकीची घोषणा होण्याआधीपासून बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले होते. सुरुवातीपासून भाजपाने बंगालमध्ये धृवीकरण करण्यासाठी प्रयत्न केले. भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष म्हणून ओळखला जातो. बंगालमध्ये भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा आणखी आक्रमकपणे मांडला. भाजपच्या प्रमुख नेत्यांपासून सामान्य कार्यकर्तेही जय श्री रामच्या घोषणा देत मैदानात उतरले होते. यावेळी ममता बॅनर्जी या हिंदूविरोधी असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली. मुस्लिम मतदार हा भाजपचा पारंपरिक मतदार नाही, याची संपूर्ण जाणीव पक्षाला होती. त्यामुळे हिंदू मतांचे कत्रीकरण करण्यावर भाजपने भर दिला. मात्र मी देखील ब्राह्मणाची मुलगी आहे, असेलू सांगत ममता बॅनर्जी यांनी जाहीर सभेतच संस्कृत श्लोक बोलून दाखवत भाजपाने तयार केलेली हिंदूविरोधी ही प्रतिमा तोडत भाजपची ही खेळी ममता बॅनर्जी यांनी उधळून लावली. ममता बॅनर्जींचे विजयाचे अजून एक कारण म्हणजे मुस्लिम मतदार ठामपणे ममतांच्या पाठिशी ठाम पणे उभे राहिले असल्याचे आता निकालानंतर स्पष्ट झाले आहे. 

बंगाली अस्मितेला हात घालण्याचा प्रयत्न 

बंगालमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम मतदार ममता बॅनर्जी यांच्यासोबत उभे असल्याचे पहायला मिळते. बिहारसारख्या राज्यात एमआयएमच्या असदुद्दीने ओवैसी यांनी मिळवलेल्या निर्णायक यशामुळे बंगालमध्येही मुस्लिम मतांमध्ये फाटाफूट होणार का, अशी चर्चा सुरू होती. मात्र, भाजपच्या आक्रमक हिंदुत्वामुळे मुस्लिम मतदारांनी भाजपला रोखू शकणार्‍या सर्वात मोठ्या पक्षामागेच म्हणजेच तृणमूल काँग्रेसमागेच आपली ताकद उभी करण्याचा निर्णय घेतल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ममता बॅनर्जी या मुस्लिमांचे तुष्टीकरण करत असून त्यांचा पक्ष भ्रष्टाचाराने बरबटला आहे, असा आरोप करत भाजपने तृणमूल काँग्रेसला घेरले. मात्र बंगाल की बेटी म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या अजेंड्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. हे बाहेरचे लोक बंगालला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी बंगाली अस्मितेला हात घालण्याचा प्रयत्न केला. ममता बॅनर्जींच्या या आरोपाला उत्तर देईल असा मजबूत प्रादेशिक नेता भाजपकडे नव्हता. परिणामी बंगाली अस्मितेचा मुद्दा वरचढ ठरला आणि त्याचा ममतादीदींना फायदा झाला. देशात कोरोनाने हाहाकार माजवला असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अनेक बड्या नेत्यांना पश्चिम बंगालच्या निवडणुकीत जास्त रस असल्याचे दिसून आले. देशातली कोरोना स्थिती ज्या पद्धतीने केंद्र सरकारने हाताळली त्यावर पश्चिम बंगालचे मतदार नाराज असल्याचे निकालावरुन प्रतिबिंबीत होते. 

या सर्व धामधुमीत काँग्रेस कुठे आहे?

कोरोनाचा सर्वाधिक फटका हा कामगार वर्गाला बसला आहे. या काळात लॉकडाऊन लागल्याने त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची वाताहत झाली. अनेकांचा रोजगार गेला. याचाही फटका भाजपाला नक्कीच बसला आहे. नव्या कृषी कायद्यामुळे शेतकरी वर्ग भाजपवर नाराज होता. पश्चिम बंगालमधील महिला मतदार हा कायमच चर्चेचा विषय ठरला आहे. या निवडणुकीतही महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला होता. ममता बॅनर्जी यांच्या कार्यकाळात महिलांना थेट मदत करणार्‍या काही योजनांमुळे त्यांना महिलावर्गाकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याने त्यांच्या विजयाची वाट अधिकच सुकर झाली. ‘सब कुछ मोदी’ असलेल्या भाजपच्या मोदी ब्रँडमुळे जागा वाढल्या पण भाजपला सत्ता मात्र मिळू शकली नाही. ‘खेला होबे’ ला बंगालच्या मतदारांनी कौल दिला. ‘खेला होबे’ ही ममता बॅनर्जींची घोषणा होती. ‘दीदी ओ दीदी’ असा भाजपने एकेरी प्रचार केला. तो प्रचार लोकांच्या काही पचनी पडला नाही. त्यामुळे मतदारांनी मतपेटीच्या माध्यमातून तो धुडकावला. दीदींच्या परप्रांतीय टिप्पनीमुळे भाजपचे नुकसानच झाले आहे. भाजपने आक्रमक प्रचार केला. तो आक्रमकपणा बंगालच्या मतदारांना भावला नसल्याचे ही आता स्पष्ट झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये १५० च्या वर जागा जिंकू असा दावा करणार्‍या भाजपला त्याच्या अर्ध्या जागांवर रोखत ममता बॅनर्जींनी बंगालच्या खर्‍या साम्राज्ञी त्याच असल्याचे पुन्हा एकदा सिध्द केले आहे. मात्र बंगालमध्ये भाजपाचे संख्याबळ मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याचा फायदा २०२४च्या लोकसभा निवडणुकीत होवू शकतो. या सर्व धामधुमीत काँग्रेस कुठे आहे? याचा शोध काँग्रेसचे धुरणी किमान आता तरी घेतील, अशी अपेक्षा ठेवावी का? हा देखील मोठा यक्ष प्रश्‍न आहे. मात्र सलग तिसर्‍यांदा मिळविलेल्या अभुमपूर्व यशाबद्दल ममता बॅनर्जी यांचे मन:पुर्वक अभिनंदन...

Post a Comment

Designed By Blogger