महाराष्ट्र दिनापासून दुहेरी लढाईचा संकल्प!

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा अशा शब्दात ज्या राज्याचा गौरव केला जातो त्या महाराष्ट्र राज्य स्थापनेचा आज ६१ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. गत वर्षाप्रमाणे यंदाही या उत्सवावर करोना संकटाचे सावट आहे. कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी आणि विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन राज्यात यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात यावा, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार शाखेमार्फत देण्यात आल्या आहेत. यंदा १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करतांना, कोरोना विरुध्द सुरु असलेल्या लढाईचे दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर नव्याने रणशिंग फुंकले जाणार आहे. यातील पहिली लढाई म्हणजे, लॉकडाऊनचे यशस्वीरित्या पालन करुन कोरोनाचा वाढता आलेख खाली आणणे व दुसरे १८ वर्षांवरील सर्वांना लस उपलब्ध करुन देणे. येत्या काळात लसीकरणचा वेग वाढविण्यासह कोरोनाग्रस्तांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याचे दुहेरी शिवधणुष्य राज्य सरकारला पेलावे लागणार आहे.हा छत्रपती शिवाजी महाराजांचा लढवय्या महाराष्ट्र

महाराष्ट्रासाठी संकटं ही नविन नाहित. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा लढवय्या महाराष्ट्र आहे. मागील काही वर्षात महाराष्ट्राने अनेक संकटांशी दोन हात केले. १९७२ चा भीषण दुष्काळ, महापूर, किल्लारीचा भूकंप, बॉम्ब ब्लास्ट, दहशतवादी हल्ला अशी अनेक संकटे महाराष्ट्राने पाहिली. त्याच्याशी दोन हात करत महाराष्ट्राने त्याचा पाठिचा कणा ताठ राखला. पण आता देशासह राज्यावर आलेले कोरोनाचे संकट हे सर्वांपेक्षा वेगळे व भयंकर, भीषण असे आहे. या संकटामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे, राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे, बेरोजगारीची समस्या अधिक गंभीर झाली आहे, पायाभुत सुविधांची दाणादाण उडाली आहे. यात सर्वांत गंभीर प्रश्‍न आहे तो आरोग्याचा! महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना बळींची संख्या ६६ हजारांवर गेली असून आजच्या घडीला राज्यात जवळपास ७ लाख अ‍ॅक्टिव रुग्ण आहेत. कोरानाच्या मगर मिठीतून महाराष्ट्राला वाचविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नांची शर्थ करत असले तरी अद्यापपर्यंत म्हणावे तसे यश मिळालेले नाही. कोरोना विरुध्दच्या लढ्यात राज्य सरकारसह डॉक्टर, आरोग्य सेवक पोलीस आणि प्रशासन खांद्याला खांदा लावून लढताहेत. तरीही कोरोना बाधितांची संख्या कमी होतांना दिसत नाही. जर आपल्याला ही लढाई खरोखरच जिंकायची असेल तर प्रत्येकाने यात योगदान देण्याची आवश्यकता आहे. हे योगदान घरात सुरक्षित राहून किंवा घराबाहेर पडल्यानंतर स्वत:ची व दुसर्‍यांच्या सुरक्षिततेची काळजी घेवून देता येईल. 

देशाला दिशा देण्याची जबाबदारी महाराष्ट्रावर 

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गत महिनाभरापासून राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आजपासून पुन्हा १५ दिवस हे निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहे. या निर्बंधांमुळे गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत आणि इतरही काही शहरांमध्ये नवरुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. ही संख्या कमी होत जाईल, तसतसा रुग्णालयांवरील ताण कमी होत जाईल. तसे झाल्यावर प्राणवायू आणि रेमडेसिव्हिरसारखे इंजेक्शन यांचीही मागणी आटोक्यात येऊ शकेल. आरोग्यतज्ञांनी घरातही मास्क लावण्याचा सल्ला दिला आहे. इतकी गंभीर परिस्थिती असताना लॉकडाऊनची काटेकोरपणे अमंलबजावणी झाली नाही, तर उद्याच्या तिसर्‍या लाटेची विषपेरणी झालीच म्हणून समजावे लागेल. महाराष्ट्रात १८ ते ४४ या वयोगटात पाच कोटी ७१ लाख नागरिक आहेत. सध्याचा लसीकरणाचा वेग पाहता, ही प्रक्रिया पुरी होण्यास कित्येक महिने लागू शकतात. महाराष्ट्र सरकारने मोफत लस टोचण्यासाठी साडे सहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. असे असले, तरी लसींची उबलब्धता हा मोठा यक्षप्रश्‍न आहे. लसी उपलब्ध झाल्यानंतर पुढील अंमलबजावणी कशी होते? यावरही पुढची परिस्थिती अवलंबून राहिल. सध्यस्थितील महाराष्ट्रातील लसीकरणाचा वेग देशात सर्वाधिक आहे. कोरोना संकटावर मात करत देशाला दिशा देण्याची जबाबदारी आज महाराष्ट्रावर आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. पुढचे संकट म्हणजे राज्याची विस्कटलेली घडी बसविण्याचे... 

महाराष्ट्र पुन्हा भरारी घेईल

संपूर्ण जगाला वेठीस धरणार्‍या कोरोनाचा प्रादुर्भाव देशात होऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशभरात २२ मार्चपासून लॉकडाउन लागू केला. तेंव्हापासून देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असणार्‍या मुंबईचे अर्थकारण मंदीच्या फेर्‍यात अडकले आहे. त्याचा मोठा फटका राज्याला बसत आहे. राज्यातील अनेक उद्योग आजही मंदीशी दोन हात करत आहे. कोरोना व लॉकडाऊनचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर झाला आहे. मजूर, शेतीविषयक साधने व इतर संसाधनांच्या अनुपलब्धतेमुळे संपूर्ण कृषीकार्यात अडथळा निर्माण झाला. तसेच या दरम्यान महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पाऊस आणि गारपिट झाल्याने परिस्थिती आणखीच बिकट झाली. शेतकर्‍यांना मदतीचा हात दिला तरच ते पुन्हा उभे राहू शकतील. १ मे हा दिन जगाच्या विकासात योगदान देणार्‍या कामगारांच्या सन्मानार्थ कामगार दिन म्हणून देखील साजरा केला जातो. आता कोरोना व लॉकडाऊनमुळे उद्योगधंद्यांचे चक्र अनेक समस्यांच्या गर्केत अडकले आहेत. यामुळे उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. क्षेत्र आणि काळ कोणताही असो महाराष्ट्र नेहमीच इतर राज्यांच्या कित्तेक पटीने पूढेच राहिला आहे. देशाचा खर्चाचा गाडा ओढणारे राज्य अशी महाराष्ट्राची छबी आहे. म्हणूनच महाराष्ट्र जगला तर देश जगेल असे म्हणतात. उद्योग क्षेत्र, साहित्य, क्रीडा असो वा शिक्षण क्षेत्र महाराष्ट्र नेहमीच देशात नंबर वन राहिला आहे. कोरोनाच्या समस्येमुळे महाराष्ट्रासमोर सध्या दोन मोठी आव्हाने आहेत. एक म्हणजे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे, या परिस्थितीतून बाहेर पडणे आणि दुसरे आव्हान म्हणजे राज्याचा विकास दर वाढविणे. सध्या सुरु असलेले कोरोनाचे संकट लवकर संपेल व महाराष्ट्र पुन्हा भरारी घेईल. यासाठी कोरोनाविरुध्दच्या लढाईत प्रत्येकाने योगदान देण्याची आवश्यकता आहे.

Post a Comment

Designed By Blogger