आयपीएलची विकेट!

आयपीएल अंतिम टप्प्याकडे जात असतानाच कोरोनाने ‘बायो-बबल’ फोडल्याने आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी एकाच दिवसात आयपीएलशी संबंधित १० जण कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. कोरोनाने आधी केकेआर मग नंतर चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश केला होता. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि एका बस क्लिनरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तसेच दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफमधील पाच कर्मचार्‍यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. केकेआरचे वरून याशिवाय मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा आणि सनरायजर्स हैदराबादचा रिद्धिमान साहा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. यामुळे आयोजकांच्या चिंता वाढल्या. यापुढे कोरोनामुळे मोठ्या संख्येने खेळाडू बाधित होतील की काय, अशी भीती निर्माण झाल्याने शेवटी बीसीसीआयला आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



बायो-बबलचे कवच तोडून कोरोनाने शिरकाव

आयपीएल म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी २०-२० क्रिकेटचा थरार व बीसीसीआयसाठी सोन्याची अंड देणारी कोंबडी. गतवर्षी देशात कोरानाचा शिरकाव झाला असल्याने युएईमध्ये ही स्पर्धा खेळली गेली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाही आयपीएल गेल्या वर्षीप्रमाणे संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) घेण्याचा सल्ला अनेकांनी बीसीसीआयला दिला होता. मात्र सुरुवातीला परिस्थिती तितकीशी गंभीर दिसत नसल्याने बीसीसीआयने त्याकडे दुर्लक्ष करत देशातच स्पर्धा खेळविण्याचा निर्णय घेतला. खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी बायो बबलचे कवच तयार करण्यात आले. मात्र एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यापासून देशात सर्वच ठिकाणी कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाल्याने आयपीएलवर स्पर्धा रद्द होण्याचे संकट घोंघावत होते. यासंकटात खेळाडू बाधित होण्याची भीती व्यक्त केली जात होती. शेवटी तसेच झाले आणि कोरोना व्हायसरने बायो बबल तोडून दोन संघांच्या ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश केल्याने आयपीएलची विकेट पडली. मुळात कोरोनामुळे पुढे जाऊन ही स्पर्धा रद्द किंवा स्थगित करावी लागू शकेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आयपीएल स्पर्धा बायो-बबलच्या सुरक्षित वातावरणात सुरू असल्याने धोका वाटत नव्हता. पण, यावेळचा संसर्ग इतका वेगवान आहे की, बायो-बबलचे कवच तोडून कोरोनाने शिरकाव केला. 

बीसीसीआयच्या अनेक त्रुटी 

आयपीएलमधील खेळांडूसाठी देण्यात आलेली अत्यंत महत्वाची बायो बबल का व कशी तुटली? याचा शोध घेतांना बीसीसीआयच्या अनेक त्रुटी समोर येत आहेत. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे स्वतःच सर्व काही व्यवस्था करण्याचा बीसीसीआयचा निर्णय. खर्च कमी करणे आणि भारत-आधारित कंपन्यांवर विसंबून राहण्यामुळे सध्याची परिस्थिती ओढावली आहे. मागच्या आयपीएल स्पर्धेत बायो बबलची व्यवस्था रेस्ट्राटा नावाची व्यावसायिक कपंनी पहात होती. ही कंपनी ट्रॅकिंग डिवाइस आणि बायो बबल सुरक्षा देण्यात पारंगत होती. यावेळी आयपीएलला देशी बनवण्यासाठी स्वतःच बायो बबल सुरक्षा, हॉस्पिटल वेंडर आणि टेस्टिंग लॅबची याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसरा म्हणजे अनेक शहरांमध्ये सामना खेळण्यासाठी हवाई प्रवास करणे ही सर्वात मोठी समस्या होती. युएईमध्ये खेळल्या जाणार्‍या सामन्या दरम्यान हवाई प्रवासाचा समावेश नव्हता. बायो बबलच्या बाहेरील सदस्यांसाठी टेस्टिंग आणि अलग ठेवण्याचे प्रोटोकॉल मागील वेळेसारखे तितकेसे चांगले नव्हते, यामुळेच आयपीएल रद्द करण्याची नामुष्की ओढवली आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत २९ सामने खेळवण्यात आले आहेत, उर्वरीत सामने कधी खेळवण्यात येणार, हा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. सध्याच्या घडीला भारतात करोनाचे तांडव सुरु आहे. त्याचबरोबर भारतामध्ये करोनाची दुसरी लाट जुलै महिन्यात येणार असल्याचेही म्हटले जात आहे. अशा परिस्थितीत यंदाची आयपीएल पूर्ण होणार की नाही? हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय टी-२० स्पर्धा आहे. या स्पर्धेतून बीसीसीआयला सर्वाधिक महसूल मिळतो. आयपीएल न झाल्यास आमचे तब्बल ४०० कोटी रुपयांचे नुकसान होईल, असे बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली मागील वर्षी म्हणाला होता. 

मोठा आर्थिक फटका 

यंदा आयपीएलचे ६० पैकी केवळ ३० सामनेच होऊ शकेल. आयपीएल स्थगित करावी लागल्याने बीसीसीआय आणि आठही संघांना या निर्णयाचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. केवळ तेवढेच नाही, तर प्रसारक स्टार स्पोर्ट्स आणि जाहिरातदारांचेही आर्थिक नुकसान होणार आहे. कोरोनामुळे प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नसल्याने आधीच बीसीसीआयला फटका बसला होता. त्यात आता अजून भर पडली आहे. कोरोना विषाणूमुळे अडखळलेल्या अर्थचक्राला मंद का होईना, पण वेग देण्याचे काम आयपीएल क्रिकेटमुळे होत होते. रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना सामने खेळले जात असल्याने कोरोना साथ पसरण्याचा धोका संपला होता. दररोज संध्याकाळी रंगणार्‍या थराराचा आनंद लुटण्यासाठी का होईना लाखो क्रिकेटप्रेमी घरी थांबू लागले हाही एक अप्रत्यक्ष फायदाच होता. मात्र या विषयाला अर्धविराम लागला आहे. नजीकच्या काळात उर्वरित स्पर्धा होण्याची शक्यता धुसरच आहे. सप्टेंबर महिन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये क्रिकेट मालिका होणार आहे. त्याचबरोबर या काळात परदेशी संघ भारतामध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात परदेशी खेळाडूही भारतात असतील आणि ट्वेन्टी-२० विश्वचषकाची पूर्व तयारी म्हणून आयपीएलचे सामने खेळवले जाऊ शकतात. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात आयपीएलचे सामने होऊ शकतात. पण हे आयपीएलचे सामने भारतात होणार की भारताबाहेर याबाबत मात्र कोणतीही स्पष्ट भूमिका अजून तरी पाहायला मिळालेली नाही. कारण जुलै-ऑगस्ट महिन्यात भारतामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, यानंतरच हा निर्णय घेण्यात येऊ शकतो. त्यामुळे बीसीसीआय काही महिने परिस्थिती पाहणार आहे आणि त्यानंतरच योग्य तो निर्णय घेणार आहे. पण आगामी चार महिन्यांमध्ये तरी आयपीएलचे सामने होऊ शकत नाहीत, असेच चित्र आहे.

Post a Comment

Designed By Blogger