कोरोनाचा अंत जवळ!

जवळपास वर्षभरापासून भारतासह संपूर्ण जगाला वेठीस धरणार्‍या कोरोना व्हायरसमुळे जगभरात २० लाखापेक्षा जास्त तर भारतात दिड लाखांपेक्षा जास्त जणांचा बळी गेला. अनेक देशांची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. याचे हादरे भारतालाही बसले मात्र आता भारतात कोरोनाचा अंत जवळ आला आहे. गेली अनेक महिने सर्व भारतीय ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते त्या कोरोना लसीकरण मोहिमेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झाले. इतिहासात कधीही अशाप्रकारचे आणि एवढ्या मोठ्या स्तरावर लसीकरण अभियान कधी झालेले नाही. तीन कोटींपेक्षा कमी लोकसंख्या असलेले १०० पेक्षा जास्त देशत जगात आहेत. तर भारतात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातच ३ कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस देण्यात येईल. म्हणूनची ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम आहे.



शास्त्रज्ञ व उत्पादकांचे कौतुक

सन २०२०च्या सुरुवातीला चीनच्या वूहानमध्ये जन्मलेल्या कोरोना व्हायरसने पूर्ण वर्षभर संपूर्ण जगभर हाहाकार माजविला. जगभरात कोरोनाचे नऊ कोटी ३६ लाख रुग्ण असून, त्यातील सहा कोटी ६९ लाख रुग्ण बरे झाले आहेत. अमेरिकेमध्ये दोन कोटी ३८ लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ भारताचा क्रमांक येतो. भारतात कोरोना रुग्णांची एकूण संख्या १०५२७६८३ वर गेली आहे. त्यातील १०१६२७३८ जण बरे देखील झाले आहेत. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या सव्वादोन लाखांपेक्षा कमी आहे. मात्र कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने डोकं वर काढल्याने पुन्हा एकदा संकटांचे ढग गडद होत आहेत. ब्रिटनसह अनेक युरोपीय देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. अशा संकट काळात भारतात कोरोनाचा खात्मा करण्यासाठी लसीकरण मोहिमेचा प्रारंभ निश्‍चितच दिलासा देणारा आहे. भारतात दोन लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यातील एक आहे लंडन येथील ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेली कोव्हीशील्ड लस याचे उत्पादन पुणे येथील सिरम इन्स्टिटयूटमध्ये करण्यात आले आहे. तर दुसरी आहे कोव्हॅक्सीन स्वदेशी बनावटीची भारत बायोटेकने आपल्याच देशात विकसित केलेली आणि त्याचे उत्पादनही हैद्राबाद येथेच करण्यात आले आहे. अत्यंत कमी वेळात कोरोनावरील लशीच्या निर्मितीचे आव्हान सीरम आणि भारत बायोटेक यांनी यशस्वी रितीने पेलले. सामान्यत: एक लस बनण्यासाठी अनेक वर्षे लागतात. पण एवढ्या कमी वेळात एक नाही तर दोन मेड इन इंडिया लस बनवल्या, भारतीय लस, विदेशी लसींच्या तुलनेत अतिशय स्वस्त असून त्यांचा वापरही तितकाच सोपा आहे. यामुळे शास्त्रज्ञ व उत्पादकांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. 

लसीकरण प्रचंड आव्हानात्मक

कोरोना व्हायरसचे समुळ उच्चाटन करण्याच्या लढाईत आताशी पहिला टप्पा पार पडत आहे. पुढचा प्रवास म्हणावा तितका सोपा नाही. भारतात साधारणत: ४५-५० वर्षांपासून लसीकरण मोहिम राबविण्यात येते. याची गणती जगातल्या सर्वांत मोठ्या आरोग्य योजनांपैकी होते. भारतामध्ये लशींची वाहतूक करण्यासह त्यांच्या साठवणुकीची मोठी यंत्रणा कार्यरत आहे. त्याच्या जोडीला या कामाचा अनुभव असलेले कुशल मनुष्यबळ देखील आहे. असे असले तरी कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक लसीकरण प्रचंड आव्हानात्मक आहे. लसीकरणास प्रारंभ झाल्यानंतर आता १३० कोटी पेक्षा जास्त लोकांना लस देण्याचे आव्हान केंद्र आणि सर्व राज्य सरकारांना पेलावे लागणार आहे. या लसीकरणासाठी आपल्याला किती वर्ष लागतात याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. निम्म्या भारतीयांना लस द्यायलाच किमान दोन वर्षं लागतील, असा तज्ञांचा अंदाज आहे. हा प्र्रवास निश्‍चितपणे सोपा नाहीच!लसीबाबतची उदासिनता हे जगातील आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आव्हान आहे. रोगप्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी लोकांना तयार करणे, हे शिवधणुष्य देखील सरकारला पेलावे लागणार आहे. याच्या जोडीला होणारे राजकारण देखील लसीकरणाच्या मोहिमेवर प्रभाव टाकणारे असेल. भारतात लसीकरणाची मोहिम यशस्वीरित्या राबवली गेली तरच कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत होण्यास मदत होईल. 

भारतातील मोहिम अनेक देशांसाठी रोडमॅप 

आपण सर्वजण जाणताच, २०१८ पासून जगावर असणार्‍या मंदी, महागाईने जगभरातील नोकरदार, भांडवलदार, सर्वसामान्य हवालदिल आहेत. त्यातच आता ‘मेड इन चायना’ कोरोना व्हायरसमुळे जगभराला तीव्र मंदी आणि प्रचंड महागाईला सामोरे जावे लागले. कोरोनामुळे अमेरिका व ब्रिटनसारख्या महासत्ता हादरल्या. आयात-निर्यात ठप्प झाल्याने बड्या कंपन्यांवर उत्पादन प्रकल्प बंद ठेवण्याची वेळ आली. परिणामी जागतिक अर्थव्यवस्था ठप्प पडण्याच्या मार्गावर येवून ठेपली. मंदीची झळ बड्या अर्थव्यवस्थांना बसू लागल्याने जगभरातील बेरोजगारांची संख्या २ कोटी ५० लाखांपर्यंत वाढण्याची भीती आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने व्यक्त केली आहे. हातची नोकरी गेल्याने चालू वर्षात लाखो लोक गरिबीच्या दृष्टचक्रात अडकतील. मंदीने कंपन्यांकडून कामगार कपात केली जाईल तसेच कंपन्या वेतन कमी करून खर्च कमी करण्याला प्राधान्य देतील. ज्यामुळे ८६० अब्ज डॉलर ते ३४०० डॉलरचे नुकसान सोसावे लागेल, अशी भीती या संघटनेने व्यक्त केली आहे. कोरोनामुळे झालेले हे नुकसान भरुन काढण्यासाठी आता नव्या दमाने व उत्साहाने सुरुवात करावी लागणार आहे. त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे लसीकरणाची मोहिम यशस्वीरित्या पार पाडावी लागणार आहे. ही केवळ केंद्र सरकारची जबाबदारी नसून सर्व राज्य सरकारे व समाजातील प्रत्येक घटकांची आहे. यासाठी सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींनी सवंग लोकप्रियता मिळवणारी तसेच संशयकल्लोळ आणि अविश्‍वास निर्माण करणारी विधाने टाळली पाहिजे. सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यास जगातील सर्वात मोठी लसीकरणाची मोहिम निश्‍चितपणे यशस्वी होईल. भारतातील ही मोहिम जगातील अनेक देशांसाठी रोडमॅप म्हणून देखील फायदेशिर ठरेल, याची खात्री आहे. 

Post a Comment

Designed By Blogger