आत्मपरिक्षण करायला लावणारा ग्रा.पं.चा निकाल

गावगाड्याचा कारभारी ठरवण्यासाठी १६ जानेवारी रोजी पार पडलेल्या राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. कोरोना संकटानंतर पहिल्यांदाच होणारी ही निवडणूक सर्वांगाने वेगळी होती. ग्रामपंचायतीची निवडणूक ही ग्रामीण भागातील व विशेषत: शेतकर्‍यांच्या दृष्टीने महत्त्वाची असते. गत दिड महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या वेशीवर बसलेले हजारो शेतकरी व राज्यात भाजपा विरुध्द शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसची महाआघाडी अशा दोन्ही आघाड्यांवर लढणार्‍या भाजपासाठी ही निवडणूक निश्‍चितपणे महत्त्वाची होती. ग्रामपंचायत निवडणूक कोणत्याही राजकीय चिन्हावर लढली जात नसली तरी स्थानिक पातळीवरील पक्ष व नेत्यांच्या नेतृत्वाखालीच हा ग्रामीण भागातील राजकीय कुस्त्यांचा आखाडा रंगत असतो. निकालानंतर काही अपेक्षित तर काही अनपेक्षित निकाल समोर आले आहेत. यामुळे सर्वच पक्षांना तटस्थपणे आत्मपरिक्षण करायला लावणारी ही निवडणूक ठरली आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. दिग्गज नेत्यांचा बालेकिल्ल्यात पराभव

ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणूक ही खूप प्रतिष्ठेची असते. राज्याच्या राजकारणात स्थानिक वर्चस्वासाठी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला फार महत्व असते. केंद्रीय वित्त आयोगाकडून थेट निधी मिळू लागल्याने ग्राम पंचायतीच्या अर्थकारणाला महत्त्व आले आहे. या ग्रामपंचायती ताब्यात असणे हे जसे राजकियदृष्ट्या महत्वाचे आहे तसेच आर्थिकदृष्ट्याही नाड्या हातात येण्यासारखे आहे. यंदा कोरोनाच्या संकटातही निवडणुकीची धामधुम पहायला मिळाली. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हांवर लढविल्या जात नसल्या तरीही तेथे राज्यातील राजकारणापेक्षा थोडेसे वरचढ राजकारण पहायला मिळते. याची प्रचिती निकालानंतर पहायला मिळाली. सर्वच पक्षांनी सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे. यात किती खरं किती खोटं हे त्यांनाच माहित असले तरी काही निकालांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. यात प्रामुख्याने उल्लेख करावयाचा म्हटल्यास, भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांचे गाव असलेल्या कोथळी ता.मुक्ताईनगर येथील ग्रामपंचायतीवर सहापैकी पाच जागा शिवसेनेने जिंकल्या. एकनाथराव खडसे यांच्यासह भाजपा खासदार रक्षा खडसे यांना हा जोरदार धक्काच आहे. 

शिवसेनेची नितेश राणेंच्या मतदारसंघात बाजी 

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावामध्ये भाजपाचीच सत्ता होती. यंदा निवडणुकीत शिवसेनेला थोपविण्यासाठी भाजपाने काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती देखील केली होती. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतानाही खानापूरमध्ये ही अनोखी युती झाली होती. खानापूर गावात आबिटकर गटाला रोखण्यासाठी भाजपाने काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ घेतली होती. अशातही शिवसेनेने सहा जागांवर विजय मिळविला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यानंतर भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनाही धक्का बसला आहे. भोदरदन तालुक्यातील प्रमुख गावात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. चार ग्रामपंचायती भाजपकडून राष्ट्रवादीच्या ताब्यात, तर एक ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात गेल्याने भाजपाला धक्का बसला. सर्वाधिक चर्चा होतेयं ती सिंधुदुर्गमधील कणकवली तालुक्यातील निकालांची! भाजपाचे आमदार नितेश राणे यांचा कणकवली मतदारसंघात शिवसेनेचा दबदबा पाहायला मिळतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. दोघांमधून विस्तवही जात नाही. नारायण राणे यांच्यासह त्यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश आणि नितेश राणे सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत असतात. अनेकदा राणे यांच्याकडून उद्धव ठाकरेंचा यांचा एकेरी उल्लेख करुन टीका केली आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेने नितेश राणेंच्याच मतदारसंघातील तिन पैकी दोन ग्रामपंचायतींमध्ये बाजी मारली आहे. नगरमध्ये भाजपचे नेते व माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना पराभवाचा धक्का बसला आहे. लोणी खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांनी १७ पैकी १३ जागा जिंकल्या आहेत. विखे यांच्या पॅनलला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले. नगरमधील भाजपचे दुसरे नेते व माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने धक्का दिला आहे. 

आरोप-प्रत्यारोप विसरुन सर्वांनी एकत्रित काम करायला हवे

विधानसभा निवडणुकीत शिंदे यांना पराभवाची धूळ चारणारे आमदार रोहित पवार यांनी शिंदे यांच्या चौंडी गावची सत्ता भाजपकडून खेचून आणली. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षातील प्रतिष्ठित नेते पृथ्वीराज चव्हाण, यांना भाजपने धक्का देत, शेनोली शेरेगावात विजय मिळवला आहे. या उलथापालथीतही राज्यात सर्वाधिक यश मिळाल्याचा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे. राजकारण्यांच्या या भाऊगर्दीत सर्वाधिक सर्वांचे लक्ष लागलेल्या पाटोदा गावात मोठी उलथापालथ पहायला मिळाली. औरंगाबादच्या पाटोद्यात भास्कर पेरे-पाटलांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे. तब्बल २५ वर्षांनी आदर्श गाव असलेल्या पाटोद्यात सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळाले. पेरे पाटलांनी या निवडणुकीतून माघार घेतली होती. येथे अकरा सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीपूर्वीच आठ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. तर तीन जागांसाठी निवडणूक घेण्यात आली, यात भास्कर पेरे पाटील यांची मुलगी अनुराधा पेरे उभ्या होत्या. त्यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे. मात्र दुसरीकडे ग्रामविकासामुळे केवळ राज्यातच नव्हे, तर देशाला दिशादर्शक असणारे आदर्श गाव हिवरेबाजार येथे ३० वर्षांनी बिनविरोध निवडणुकीची परंपरा प्रथमच खंडित झाली होती. या हिवरेबाजार ग्रामपंचायतीत पद्मश्री पोपटराव पवार यांच्या पॅनलचा सातही जागांवर विजय झाला. येथे विरोधकांचे बंड फसले. कमी मते मिळाल्याने सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार. हिवरे बाजारसोबतच राळेगणसिद्धीमध्येही असे बंड फसले आहे. राळेगणसिद्धीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या निकटवर्तीयांनी पुन्हा सत्ता मिळविली. दोन्ही ठिकाणी बंड केलेल्या विरोधकांचा सुपडा साफ झाला. निवडणुकीचा निकाल जो लागायचा होता तो आता लागलेला आहे. आता निवडणूक काळात झालेले आरोप-प्रत्यारोप विसरुन सर्वांनी एकत्रित व एक दिलाने काम करायला हवे, तेंव्हाच गावाचा विकास होईल.


Post a Comment

Designed By Blogger