जगातील सर्वात शक्तीशाली राष्ट्र म्हणून दबदबा असणार्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बायडेन यांनी विजय मिळवल्यानंतर २० जानेवारी रोजी बायडेन राष्ट्राध्यक्षपदाची तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. बायडेन यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात उपराष्ट्राध्यक्ष म्हणून बायडेन यांनी आठ वर्ष काम केले आहे. यादरम्यान अमेरिकेच्या राजकारणातील अनेक चढ-उतारांचे जवळून निरीक्षण केले आहे. त्यांच्यातील संयम आणि दूरदृष्टीचा परिचय त्यांनी निवडून आल्यानंतरच दिला होता. बायडन हे अमेरिका-भारत संबंधांचे खंदे समर्थक मानले जातात. बायडन यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध सध्या आहेत तसेच राहतील किंवा त्यापेक्षाही पुढच्या स्तरावर जातील, याची दाट शक्यता आहे. यामुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधीची उत्सुकता भारताला लागून आहे.
बायडेन यांच्या विजयापेक्षा ट्रम्प यांच्या पराभवाची चर्चा
सर्वात मोठी लोकशाही असण्याचा मान जसा भारताला मिळाला आहे. तसा सर्वात जुनी लोकशाही असण्याचा मान अमेरिकेला मिळाला आहे. जवळपास २०० वर्षापेक्षा जास्त म्हणजे सन १८०४ मध्ये अमेरिकेत निवडणुकीची सुरुवात झाली. दर चार वर्षांनी होणार्या या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून असते. सर्वशक्तिमान राष्ट्राच्या अध्यक्षपदी कोण निवडून येणार यावर जागतिक राजकारणाचा पट अवलंबून असतो. यामुळे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीकडे भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागून होते. अमेरिकेची यंदाची निवडणूक ऐतिहासिकच म्हणावी लागेल. कोरोनाचे संकट रोखण्यात आलेले अपयश, वाढती मृत्यू संख्या आणि बेरोजगारी या दोन प्रमुख्य मुद्यांवर झालेल्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तेथील मतदार वर्ग राजकीय दृष्ट्या दुभंगले होते. अशा परिस्थितीत जो बायडेन यांची सरशी झाली. या निवडणुकीचे अजून एक वैशिष्टे म्हणजे, बायडेन यांनी सर्वाधिक मत मिळवण्याचा माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा विक्रम मोडीत काढला. या निवडणुकीत बायडेन यांच्या विजयाची चर्चा झाली त्यापेक्षा ट्रम्प यांच्या पराभवाची झाली. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आपला पराभव मान्य करण्यात तयार नव्हते, त्यांनी एक ना अनेक कारणे उपस्थित केली होती. पराभवाच्या भीतीने ते मतदानात चुका झाल्याचे सांगत होते, काही राज्यांमध्ये ट्रम्प यांचा पराभव पचवणे जड गेल्याने त्याचे हिंसक पडसाद वॉशिंग्टन डीसी येथील कॅपिटॉल इमारतीत पहायला मिळाले.
बायडेन पर्व भारतासाठी कसे ठरते?
ट्रम्प समर्थकांचा हा हल्ला म्हणजे अमेरिकेच्या इतीहासातील सर्वात काळा अध्याय मानला जात आहे. आताही बायडन यांच्या शपथविधीआधी ट्रम्प समर्थकांकडून वॉशिंग्टन डीसी तसेच इतर ५० राज्यांमध्ये सशस्त्र आंदोलन केले जाण्याची शक्यता एफबीआयने वर्तविली असल्याने प्रथमच अभूतपुर्वी सुरक्षतेत अमेरिकन राष्ट्रध्यक्षपदाचा शपथविधी होणार आहे. ट्रम्प यांच्या या आत्मघातकी भुमिकचेचा रिपब्लिकन पक्षालाही फटका बसला. कट्टर वर्णद्वेषी, असा ठपकाही त्यांच्यावर अखेरच्या काळात बसला. राष्ट्राध्यक्षाच्या पदावरुन पायउतार झाल्यानंतर त्यांची वाट बिकट मानली जात आहे. अमेरिकेतील बायडेन पर्व भारतासाठी कसे ठरते? याचीही मोठी उत्सुकता आहे. भारत अमेरिकेदरम्यान राजनितीक, रणनितीक, सामरिक आणि आर्थिक स्तरावर दृढ संबंध आहेत. अमेरिकेचे चार अध्यक्ष बिल क्लिटंन, जॉर्ज बुश, बराक ओबामा आणि डोनाल्ड ट्रम्प या सर्वांचा भारताशी संबंध अधिक दृढ करण्यावर भर होता. बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळापासून दोन्ही देश एकमेकांचे जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात. आबामा राष्ट्राध्यक्ष असतांना बायडेन हे उपराष्ट्रपती होते. त्यावेळी त्यांची भुमिका भारताच्या बाजूनेच राहीली आहे. भारत-अमेरिका नागरी अणुकराराच्या मंजुरीसाठी आणि द्विपक्षीय व्यापारातील ५०० अब्ज अमेरिकन डॉलर्सचे उद्दीष्ट ठेवण्यात बायडन यांचा मोलाचा वाटा होता. आताही बायडन यांच्या कोअर टीममध्ये भारतीयांची संख्या मोठी आहे. आताही अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अनेक भारतीय वंशाच्या नागरिकांना संधी दिली आहे.
भारतीय वंशाच्या नागरिकांना संधी
बायडेन यांच्या प्रशासनात स्थान मिळालेल्या भारतीय वंशाच्या लोकांमध्ये ऊर्जा आणि हवामान बदलांच्या वरिष्ठ सल्लागापदी सोनिया अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासह निरा टंडन या कॅबिनेट रँकसह व्यवस्थापन आणि अर्थसंकल्प कार्यालयाच्या संचालक म्हणून काम पाहणार आहेत. विवेक मूर्ती सर्जन जनरल, वेदांत पटेल सहाय्यक माध्यम सचिव, विनय रेड्डी भाषण लेखन संचालक आणि गौतम राघवन हे राष्ट्रपती कार्यालयाचे उपसंचालक म्हणून कार्यरत असणार आहेत. यांच्याव्यतिरिक्त बायडेन प्रशासनात स्थान मिळालेल्यांपैकी अतुल गवांडे, सेलीन गौंडर हे कोविड-१९ टास्क फोर्स सदस्य, भरत राममूर्ती राष्ट्रीय आर्थिक परिषदेचे उपसंचालक, सबरिना सिंह यांच्याकडे कमला हॅरिस यांच्या उप माध्यम सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर माला बाया अदिगा यांच्याकडे जिल बायडेन यांच्या धोरण संचालक पदाची, शपथविधी सोहळ्याच्या आयोजन समितीच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी माजू वर्गिस यांच्याकडे देण्यात आली आहे. तर दुसरीकडे तरूण छाब्रा, सुमोना गुहा यांनादेखील बायडेन प्रशासनात महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. ही भारतासाठी आणि संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानाची व आनंदाची बाब आहे. २० रोजी अमेरिकेत बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या कार्यकाळाचा अधिकृत उदय होईल. या दोघांकडूनही प्रचंड अपेक्षा जगाला आहे. जगाला भेडसावणारा मुस्लिम दहशतवाद आटोक्यात आणण्यात उभयतांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. चीनच्या विस्तारवादावरही अमेरिकेलाच तोडगा काढावा लागणार आहे. कोरोनामुळे विसकळीत झालेली देशांतर्गत अर्थव्यवस्था स्थिरस्थावर करण्याचेही आव्हान उभयतांवर आहे. जागतिकीकरणाच्या युगात इतर देशांशी संबंध वृद्धिंगत करणे, विकसनशील देशांमध्ये सहकारितेची भावना वाढविणे, पर्यावरणाचे असंतुलन, कार्बन उत्सर्जन यावर तोडगा काढणे महत्त्वाचे ठरणार आहे. यासह ट्रम्प यांनी घेतलेले वादग्रस्त निर्णय व त्यामुळे होणारे परिणाम यातूनही तोडगा काढावा लागणार आहे. अमेरिकेतील बायडन पर्व जगासाठी व विशेषत: भारतासाठी फलदायी ठरो, अशी अपेक्षा!
Post a Comment