पे पाल, टेस्ला मोटर्स, स्पेसएक्स आणि सोलरसिटी या कंपन्यांची स्थापना करणारा अवलिया माणूस म्हणजे इलॉन मस्क! इलॉन मस्क हे एक प्रसिद्ध संशोधक, एक यशस्वी अभियंता आणि सर्वाधिक यशस्वी व्यावसायिक देखील आहेत. त्यांना मानवतेच्या हितासाठी हे जग बदलायचे आहे आणि या जगात काही अर्थपूर्ण बदल घडवून आणायचे आहेत. इलॉन सारखे विलक्षण लोक शतकात दोन तीनच जन्माला येतात. हे लोक भविष्याचा वेध घेऊन अशक्य वाटणार्या गोष्टी शक्य करण्यासाठी आपली सगळी शक्ती पणाला लावतात. इलॉन यांच्या काही प्रमुख प्रकल्पांमध्ये मंगळावर मानवी वस्ती बनवणे, शाश्वत उर्जेद्वारे जागतिक तापमानवाढ कमी करणे आदींचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. एकेकाळी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे असलेले इलॉन मस्क हे २०२१ साल उजाडताच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती १८५ बिलियन डॉलरहून (१३,५७९ अब्ज रुपयांपेक्षा जास्त) अधिक झाली आहे. याआधी २०१७ सालापासून अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हे श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानी होते. मात्र, ते स्थान आता इलॉन मस्क यांच्याकडे आले.
इलॉन यांचा जीवनप्रवास प्रचंड प्रेरणादायी
आज ४६ वर्षांचे असलेले इलॉन मस्क जगातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या व्यक्तींपैकी एक आहेत. इलॉन मस्क यांचा प्रवास वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी आयुष्याचा अर्थ शोधण्यापासून सुरू झाला. इलॉन यांना लहानपणापासून वाचनाची प्रचंड आवड होती. लहान वयातच ते नित्शे आणि ऑर्थर शोपेनहुअर आदी तत्वज्ञांची पुस्तके वाचत होते. त्याच्या वयाच्या दृष्टीने ती खूपच कंटाळवाणी पुस्तके होती. मात्र तेव्हाच त्येंच्या हाती डग्लस अॅडम्सची ‘द हिचहायकर्स गाइड टू द गॅलेक्सी’ ही गाजलेली विज्ञान कादंबरी लागली आणि त्यांना आयुष्याच्या अर्थाचे कोडे उलगडले. इलॉन यांचा जीवनप्रवास प्रचंड प्रेरणादायी आहे. कॅनेडियन माता आणि दक्षिण आफ्रिकेचा पिता असलेल्या इलॉन यांचा जन्म २८ जून १९७१ रोजी दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया येथे झाला. त्यांनी आपले लहानपण आपले भाऊ किम्बल आणि बहीण टोस्का यांच्या सोबत दक्षिण आफ्रिकेत घालवले. इलॉन १० वर्षांचे असतांना त्यांच्या पालकांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्यांच्या वडीलांसोबत राहणारे इलॉन कॉम्पुटर प्रोग्रामिंग स्वतः शिकले, आणि जेव्हा १२ वर्षांचे होते तेव्हा त्यांनी एका गेमिंग कंपनीला कम्यूटर गेम तयार करुन विकले. वयाच्या २० व्या वर्षी इलॉन यांनी स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीत पीएचडी करण्यासाठी प्रवेश घेतल्याच्या दोन दिवसांत अभ्यास सोडला आणि नवउद्योजक बनण्याचा निर्णय घेतला. तो काळ इंटरनेट आधारित क्रांतिकारक शोधांचा, उद्योजकतेचा आणि पारंपरिक उद्योगाविरुद्धच्या बंडखोरीचा काळ होता. त्यांनी स्वत:ची पहिली झिप-२ कॉर्पोरेशन हि कंपनी स्थापना केली. १९९९ साली ही कंपनी कॉम्पॅक कॉम्प्यूटर कॉर्पोरेशनला ३०७ दशलक्ष रोख व ३४ दशलक्ष किमतीचे स्टॉक घेवून विकली. या व्यवहारामुळे ते वयाच्या २०व्या वर्षीच अब्जाधीश झाले. पुढे त्याच वर्षी म्हणजे १९९९ मध्ये मस्क यांनी एक्स डॉट कॉम या कंपनीची सहसंस्थापक म्हणून स्थापना केली जी ऑनलाइन आर्थिक सेवा/पेमेंट सुविधा पुरवणारी कंपनी होती. त्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांनी पेपाल या कंपनीची सुरुवात केली. ऑक्टोबर २००२ पेपाल ला ईबे या कंपनीने १.५ अब्ज डॉलर्सचा स्टॉक देऊन विकत घेतले. पुढे इलॉन यांनी २००२ मध्ये स्पेसएक्स या कंपनीची स्थापना केली ज्याचा उद्देश लोकांना अंतराळाची सफर घडवून आणने असा होता. या कंपनीचे तंत्रज्ञान इतके पुढे गेले की अमेरिकेच्या नासा या संस्थेने स्पेसएक्सशी करार केला. स्पेस एक्सने २०१२ मध्ये पहिल्यांदा अवकाशात मानवरहित रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करत अंतराळात रॉकेट पाठविणारी पहिली खासगी कंपनी, असा बहुमान पटकावला. मार्च २०१७ मध्ये, स्पेसएक्सने टाकाऊ भागांचा वापर करून बनविलेले फाल्कन ९ रॉकेटचे यशस्वी चाचणी उड्डाण आणि लँडिंग केले. जे रॉकेट पुन्हा पुन्हा वापरता येणार होते. टेस्ला मोटर्स हि आणखी एक इलॉन मस्क यांच्या मालकीची कंपनी आहे, जी जगातील सर्वात अत्याधुनिक इलेक्ट्रीक कारचे उत्पादन करते. ऑगस्ट २०१३ मध्ये, त्यांनी हायपरलूप नावाची एक नवीन वाहतूक संकल्पना प्रसिद्ध केली. ज्याच्या माध्यमातून ७०० किमी प्रति तास इतक्या प्रचंड वेगाने प्रवास करता येणे शक्य होणार आहे. सुमारे सहा अब्ज डॉलर्स खर्चून कॅलिफोर्नियामध्ये या प्रकल्पावर काम सुरु आहे. ऑगस्ट २०१६ मध्ये, मस्क यांनी स्वच्छ ऊर्जा वापराला प्रोत्साहन आणि उत्तेजना देण्यासाठी सोलर सीटी हि सौर ऊर्जा उत्पादने बनवणारी कंपनी २.६ अरब डॉलर्स ला विकत घेतली असून एक सुंदर जग तयार करण्याच्या प्रकल्पावर त्यांचे काम सुरु आहे. इलॉन मस्क यांचे विचार आणि भविष्याचा वेध घेणारी त्यांची दृष्टीच त्यांना इतरांपासून वेगळे ठरवते.
भविष्याला आकार देणारे उद्योग
इलॉन मस्क यांनी मानवजातीला भविष्यकाळात कोणते प्रश्न भेडसावतील आणि ते आपण कसे दूर करू शकू, असा प्रश्न विचारला आणि त्यातून त्यांनी भविष्याला आकार देणारे उद्योग सुरू केले. पृथ्वी माणसांना पुरणार नाही, भविष्यात पृथ्वीवर एखादा ग्रह किंवा उल्कापिंड आदळू शकते, या शक्यतेने मंगळावर वस्ती उभारण्याची योजना हाती घेतली. वाहतुकीचे प्रश्न सोडवण्यासाठी हायपरलूपचा प्रकल्प हाती घेतला. ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न सोडवण्यासाठी सोलर सिटी आणि टेस्ला एनर्जी आणि टेस्ला कारची निर्मिती केली. पेट्रोल आणि डिझेल एक ना एक दिवस संपणार आहे म्हणून त्यास पर्याय म्हणून इलॉन यांनी टेस्ला ही इलेक्ट्रिक कार बनवली. ड्रायव्हर शिवाय चालणारी कार बनवण्याचा विक्रम सुद्धा इलॉन यांच्याच नावे नोंदला गेला. एकदा अवकाशात पाठविले रॉकेट पुन्हा वापरण्याचे म्हणजे रि युजेबल रॉकेटचे तंत्रज्ञान इलॉन यांनी अमेरिकेच्या नासाच्या आधी आत्मसात केले. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानात माणूस मागे पडू नये म्हणून ‘एआय’ हा स्वयंसेवी स्वरुपाचा प्रकल्प कार्यान्वित केला. २०१६ मध्ये इलॉन मस्क यांनी सुरुवात केलेल्या न्यूरालिंक कंपनीला वायरलेस कम्प्युटर मानवी मेंदूत बसवायचा आहे जो हजारो इलेक्ट्रोड्स वापरुन तयार केलेला असेल. यामुळे मेंदू संबंधित अल्झायमर्स, डिमेंशिया व स्पानल कोर्ड इजा अशा आजारांना बरे करणे सोपे होणार आहे असे त्यांचे म्हणणे आहे. न्यूरालिंकतर्फे मानवी मेंदूत चिप बसवून त्यानुसार आज्ञांची देवाणघेवाण करण्याच्या प्रयोगावर काम सुरु आहे. या प्रयोगाच्या पहिल्या टप्प्यात डुकरांच्या मेंदूत चिप बसविण्यात आली असून येणार्या काळात मानवी चाचण्या देखील घेण्यात येणार आहेत.
इश्क है तो रिस्क है
इलॉन मस्क यांनी पेपालच्या विक्री मधून साधारण १.७६ अब्ज कोटी रुपये मिळवले होते. त्यातील १ अब्ज टेस्ला मध्ये ०.५ अब्ज स्पेसएक्स मध्ये आणि उरलेले सोलर सिटी मध्ये गुंतवले होते. एक वेळ अशी आली होती कि तो ज्या घरात राहात होते त्या घराचे भाडे देण्या इतके हि पैसे मस्क यांच्या कडे नव्हते. अब्जाधीश व्यक्ती पण अजून एक महिन्यानंतर रोड वर येणार होते. त्यांच्या टेस्ला आणि स्पेस एक्सला अनेकांचा विरोध होता मात्र त्यांनी प्रचंड मोठी रिस्क घेतली. त्यांच्या मेहनतीने रंग दाखविला व स्पेसएक्सच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या यामुळे ते दिवाळखोर होण्यापासून वाचले.
आठवड्यातले १०० तास काम
इलॉन मस्क हे त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना सत्यात उतरवण्यासाठी अतोनात कष्ट आणि प्रयत्न करतात आणि आजही आठवड्यातले १०० तास काम करतात. ते म्हणतात, ‘परिश्रम घ्या म्हणजे तुम्हाला आठवड्यातून ८० ते १०० तास काम करावे लागेल. हे आपल्या यशाची शक्यता वाढवते. जर उर्वरित लोक आठवड्यातून ४० तास काम करत असतील आणि आपण १०० तास करत असाल तर आपण त्याच गोष्टी केल्या तरीही आपल्याला ठाऊक आहे की ज्या गोष्टी त्यांना मिळण्यास १ वर्ष लागेल, आपण त्या ४ महिन्यांत प्राप्त कराल. ध्येय काय आहे आणि का आहे हे जेव्हा त्यांना माहित असते तेव्हा लोक अधिक चांगले कार्य करतात. जेव्हा मी महाविद्यालयात होतो, तेव्हा मला या जगात बदल घडवून आणणार्या एखाद्या गोष्टीचा भाग व्हायचे होते. आता मीही तेच करत आहे.’ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरल्यानंतर टेस्ला ओनर्स ऑफ सिलिकॉन व्हॅली या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देणारे एक ट्वीट करण्यात आले. त्यावर प्रतिक्रिया देताना इलॉन मस्क यांनी आपल्या नेहमीच्या शैलीतच या ट्वीटला दोन रिप्लाय दिले. पहिला रिप्लाय होता, ‘हाऊ स्ट्रेंज’ आणि दुसरा रिप्लाय होता, ‘वेल, बॅक टू वर्क’. यावरुन ते त्यांच्या कामावर किती फोकस करतात, हे दिसून येते. इलॉन म्हणतात की, आयुष्यात उत्तरापेक्षाही प्रश्न अधिक कठीण असतात; आणि तुम्हाला तुमचे प्रश्न नीट मांडता आले, तर उत्तर नीट आणि स्पष्ट बनून हाती लागते. कोणतेही काम करतांना कायम, शेवटपर्यंत टीकेचे स्वागत करा. कारण टीका ही व्यायामासारखी असते, सुरुवातीला अत्यंत त्रासदायक आणि नंतर त्यातून उत्तम परिणाम साधणारी. कौतुकाने शैथिल्य येते तर टीकेने सुधारणा घडते. असा हा ध्येयवेडा अवलिया आजच्या तरुणाईचा खर्या अर्थाने रोल मॉडेल आहे.
Post a Comment