अमेरिका यादवी युद्धाच्या उंबरठ्यावर!

जगातील सर्वात जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेच्या संसदेवर हल्ला झाल्याची मोठी घटना गुरुवारी घडली. अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टनमधील डीसीमीधील कॅपिटॉल इमारतीमध्ये अमेरिकन काँग्रेसचे सभागृह आहे. इथे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील इलेक्टोरल मतांची मोजणी सुरु होती. यात भावी राष्ट्राध्यक्ष जो बायेडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार होते. या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब होऊ नये म्हणून या सोहळ्यापूर्वीच मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी संसद परिसरात घुसून धुडगूस घातला. काही आंदोलकांनी संसदेच्या उपाध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत जाऊन गोंधळ घातला. त्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला. सत्ता संघर्षातून आज अमेरिकेत जे काही घडले, ते धक्कादायक होते. वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घडलेल्या हिंसेची इतिहासात नोंद घेतली जाईल. ट्रम्प समर्थकांचा हा धुडगूस म्हणजे अमेरिका यादवी युद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचे प्रतिक तर नाही ना? असा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.


ट्रम्प यांचा लहरी स्वभाव व मनमानी कार्यपध्दतीच जबाबदार 

राजकारणात संघर्ष ही अटळ बाब आहे. त्यामुळे राजकारणात आणि राज्यशास्त्रात संघर्षाचे बारकाईने केलेले वर्णन आणि विश्लेषण आढळते. मूल्ये, स्थान, सत्ता, संसाधने यांच्यासाठी संघर्ष होतो. विरोधकांना नेस्तनाबूत करणे, जखमी करणे किंवा पूर्णतः संपवणे अशी उद्दीष्टे त्यामध्ये असतात. त्यामधून राजकीय हिंसेचा जन्म होतो. अमेरिकेच्या संसदीय इमारतीवरील हल्ल्याकडे याच दृष्टीने पाहिले जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला असून जो बायडेन नवे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. परंतु, ट्रम्प आपला पराभव मानण्यास तयार नाहीत. सत्तेवर राहण्यासाठी सर्व मार्ग अवलंबणार असल्याचेही त्यांनी याआधी स्पष्ट केले. बायडेन यांनी निवडणुकीत घोळ घालून विजय मिळविल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. पराभव मान्य नसल्यामुळेच ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांना वारंवार चिथावले होते. आज जो बायडेन यांना प्रमाणित करण्याची प्रक्रिया पार पडणार होती. म्हणजे बायडेन यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार होते. त्यावेळी झालेल्या हल्ल्याची विषारी बिजं ट्रम्प यांनीच पेरली आहेत, असे म्हटले तरी पुर्णपणे चुकीचे ठरणार नाही. याची झलक निवडणुकीदरम्यान पहायला मिळाली होती. एवढेच काय तर निकालानंतर अमेरिकेत हिंसाचाराचा आगडोंब उसळेल, असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. यास ट्रम्प यांचा लहरी स्वभाव व मनमानी कार्यपध्दतीच जबाबदार आहे. ट्रम्प हे स्वत:च्या प्रेमात आहेत. इमेज राखण्यासाठी आणि ईगो जपण्यासाठी ते काहीही करतात. असा नेता पूर्वी अमेरिकेत कधीही झाला नाही. ते लोकशाहीतील नेत्यासारखे वागत नाहीत. ते हुकूमशहांसारखेच वागतात, असे त्यांच्याबद्दल नेहमी बोलले जातेे. 

जगासमोर नाचक्की 

अमेरिकेचा दबदबा कमी होण्याचे एक कारण ट्रम्प यांची कार्यशैली आहेच. परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांची त्यांनी ज्या पद्धतीने तडकाफडकी उचलबांगडी केली, ते याचे उत्तम उदाहरण मानले जाते. ट्रम्प प्रशासनातून बाहेर पडलेल्या अथवा ट्रम्प यांनी घरचा रस्ता दाखवलेल्या सहकार्‍यांची संख्या निश्‍चितपणे जास्त होती. आंतरराष्ट्रीय पातळीवरील विषय हाताळतांनाही त्यात त्यांचा इगो झळकत होता. इराणसोबतचा अणुकरार रद्द करून अधिक कडक निर्बंध लादावेत, उत्तर कोरियाचा प्रश्न सोडवताना चर्चेच्या फंदात न पडता लष्करी कारवाईचा मार्ग पत्करावा, जेरूसेलमसारखा स्फोटक प्रश्न हाताळताना त्याच्या परिणामांची काळजी करू नये, अशी ट्रम्प यांची कार्यशैली होती. अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांचे हित धोक्यात आणल्याचा आणि भांडखोर कृत्ये केल्याचा आरोप करीत ट्रम्प यांनी रशिया, इराण आणि उत्तर कोरियावर निर्बंध लादले. भारताच्या नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन ट्रम्प प्रशासनाने भारताच्या अंतर्गत बाबीत लुडबुड करण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला होता. पराभव ही यांच्यासाठी अत्यंत वाईट गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टीत त्यांना विजय हवा असतो. त्यांना पराभव मान्यच नसतो. स्वत:ची इमेज वाचवण्यासाठीच त्यांनी निवडणूक पद्धतीतही खुसपट काढली. त्यांनी स्वत:च्या ईगोसाठी हे सर्व घडवून आणले असले तरी यामुळे रिपब्लिकन पक्षाचे नावही खराब केले आहे. भविष्यात याची मोठी किंमत पक्षाला चुकवावी लागू शकते. या प्रकाराने जगासमोर त्यांची नाचक्की झाली आहे. 

यादवी युध्द उफाळले तर मोठी किंमत मोजावी लागू शकते

अमेरिकेतील ट्रम्प समर्थकांमुळे २०० वर्षांनंतर त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली. १८१४ मध्ये असाच एक हल्ला इंग्रजांनी अमेरिकेच्या संसदेच्या इमारतीवर केला होता. त्यावेळी घुसखोरांनी वॉशिंग्टनमध्ये जाळपोळही केली होती. कॅपिटल बिल्डिंगवर झालेल्या हल्ल्यामुळे अमेरिकेत संतापाची लाट पसरली आहे. या घटनेवर जनतेतून टोकाच्या प्रतिक्रिया उमटत असून त्यामुळे डोनाल्ड समर्थक आणि बायडेन समर्थक असे दोन गट अमेरिकेत निर्माण झाले असून जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत गृहयुद्धाची स्थिती निर्माण झाली असल्याचे मानण्यात येत आहे. हा हिंसा सध्या राष्ट्राध्यक्ष पदावर असणार्‍या व्यक्तीने भडवल्याने झाली असून ही व्यक्ती कायदेशीर मार्गाने पार पडलेल्या निवडणुकांबद्दल सातत्याने खोटे आरोप करत आहे. ही घटना आपल्या देशासाठी लज्जास्पद आणि अपमानजनक आहे, अशा शब्दांमध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी कॅपिटॉलमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनाचा निषेध केला आहे. या हल्ल्यामुळे अमेरिकेची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर डागाळली आहे. आतापर्यंत दुसर्‍या देशांच्या अतंर्गत बाबींमध्ये नाक खूपसणार्‍या अमेरिकेला ट्रम्प यांच्यामुळे खाली मान घालून सल्ले ऐकावे लागत आहेत. कदाचित यामुळेच मुदत पूर्ण होण्याआधीच ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्ष पदावरुन गच्छंती करण्यासंदर्भात चर्चा सुरु झाली असावी. राष्ट्राध्यक्ष योग्य पद्धतीने आपले कर्तव्य बजावत नसेल, तर संविधानातील २५ वी दुरुस्ती उपराष्ट्राध्यक्ष आणि मंत्रिमंडळाला राष्ट्राध्यक्षाला पदावरुन हटवण्याचा अधिकार देते. या ब्रम्हास्त्राचा वापर रिपब्लिकन पक्षाने केल्यास त्याचे आश्‍चर्य वाटायला नको. कारण ट्रम्प यांच्या राजकीय इर्षेमुळे अमेरिकेत यादवी युध्द उफाळले तर देशाला त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.

Post a Comment

Designed By Blogger