भारतीय संस्कृतीमध्ये सणांचा महिना म्हणून ओळखल्या जाणार्या श्रावण महिन्याला मंगळवार पासून सुरुवात होत आहे. बालकवींच्या भाषेत सांगावयाचे म्हणजे ‘श्रावण मासी हर्ष मानसी....’ असा हा महिना. आनंदाने भरलेला असा हा महिना यास निसर्ग ही समरसतेने साथ देतो असे म्हटले तर उचित होईल. या महिन्यापासून सणांची शृंखलाच सुरू होते. नागपंचमी, राखीपौर्णिमा हे सण याच महिन्यात येतात. त्यानंतर येणारे गौरी-गणपतीही खुणावत असतात. परंतु, यावर्षी कोरोनामुळे या सर्व सणांवर आणि आनंदावर विरजण पडले आहे, भारतासारख्या संस्कृतीप्रिय आणि उत्सवप्रिय देशामध्ये सणासुदीच्या कालावधीमध्ये करोनाचा उद्रेक वाढत असल्याने सण-उत्सवांचा आनंद हरवला आहे. गेल्या चार महिन्यात गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया, रामनवमी सारखे सण-उत्सव साजरे करता आले नाही. आता श्रावण मास सुरू झाला असला तरी सर्वसामान्यांच्या मनात हर्ष आहे, असे मात्र म्हणता येत नाही.
‘निसर्गाने सूड उगवला’
कोरोना व्हायरस हा जीवघेणा विषाणू चीनच्या वुहान शहरापासून जगभरात पसरल्यानंतर संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. तर सहा लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे भारतातही कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून हादरवणारी आकडेवारी समोर येत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल ११ लाखांच्या वर गेली आहे. या विषाणूला रोखण्यासाठी शास्त्रज्ञ, संशोधक त्यांचे प्रयत्न करत आहेतच, पण अद्याप यावर योग्य इलाज मिळाला नाही. कोरोनाचे गंभीर परिणाम पृथ्वीवर प्रत्येक सजीव जातीवर दिसून येत आहे. निसर्गनियमांची पायमल्ली केल्यास काय परिणाम होतात, याची प्रचिती मानवाला वारंवार येत असते, मात्र त्यापासून काही बोध घेतला जात नाही, असा आजवरचा अनुभव राहिला आहे. आधुनिक विज्ञानाचा जन्म झाल्यानंतर मानवाने निसर्गाच्या नियमांना आव्हान देण्यास सुरुवात केली. यातील अनेक शोध, प्रयोग मानवी जीवनास फायदेशिर ठरले मात्र जेंव्हा निसर्गावर हावी होण्याचा प्रयत्न जेंव्हा - जेंव्हा झाला त्याची मोठी किंमत मानवाला मोजावी लागली आहे. ढगफुटी. अवर्षण, महापूर, त्सुनामी, तापमान बदल ही त्याचीच काही उदाहरणे म्हणता येतील. जेंव्हा अशा घटना घडतात तेंव्हा आपण म्हणतो, ‘निसर्गाने सूड उगवला’. कोरोना विषाणू याच पंग्तीत मोडणारा आहे. या विषाणूने केवळ मानवाच्या शरीरावरच नव्हे तर देश व जगाच्या अर्थव्यवस्थेवरही हल्ला केला आहे.
सण आणि उत्सवांच्या आनंदाला मुकणार
कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची चाके रुतली आहेत. यातुन बाहेर पडण्यासाठी राज्य व केंद्र सरकार आपआपल्या परिने प्रयत्न करतच आहे. मात्र आता निसर्गानेच त्याची मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. श्रावण महिन्यापासून सण-उत्सवांना सुरुवात होते. सण-उत्सवांचा कालावधीत अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात गती येत असते कारण याच दिवसांमध्ये नागरिक खरेदी करण्यास प्राधान्य देतात. गुढीपाडवा व अक्षय्यतृतीया सारख्या सणांना लॉकडाऊनमुळे सर्वजण घरात अडकून पडले होते. कारण हे उत्सव ज्या कालावधीमध्ये होते त्या काळात देशात आणि राज्यांमध्ये लॉकडाऊन अतिशय कडक आणि तीव्र होता. यामुळे गुढीपाडवा किंवा अक्षय्यतृतिया सारख्या सणांना कोट्यावधींची उलाढाल ठप्प झाली. पण आता अधूनमधून या लॉकडाऊनमध्ये शिथिलता येत असल्याने आणि लोकही पूर्वीसारखे गांभीर्याने घेत नसल्याने रस्त्यावरील गर्दी वाढत आहे. पण यंदाच्या श्रावण महिन्यामध्ये पुर्वीप्रमाणेच चित्र दिसेल असे वाटत नाही. सध्या समुह संसर्गाचा धोका असल्याने तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम काठोर करण्यात आल्याने यंदा सर्व सण आणि उत्सवांच्या आनंदाला सर्वसामान्य नागरिक यावेळी मुकणार आहेत. अर्थात, केवळ श्रावण महिन्यापुरती ही बाब मर्यादित नाही. कारण श्रावण महिन्यापासून देशात सण आणि उत्सवांची परंपरा आणि उत्साह सुरू होतो. श्रावण संपल्या संपल्या लगेच गणपतीचे वेध लागतात. शासनाने सार्वजनिक गणपती मंडळांनाही साध्या प्रमाणात गणेशोत्सव साजरे करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे गणेश चतुर्दशीपासून सार्वजनिक मंडळांमार्फत शहरात, गल्लोगल्ली सजविले जाणारे परिसर, आनंदी वातावरण अनुभवता येणार नाही.
श्रावण मासी नाही हर्ष मानसी...
अनेक ठिकाणी दहहंडीचे कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहेत. कोरोना नियंत्रणात आला नाही तर तसाच निर्णय नवरात्र आणि दिवाळीचा सण देखील असाच जातो की काय? अशी भीती सतावू लागली आहे. प्रत्येक सणाचे जसे धार्मिक महत्व असते तसेच त्याचे अर्थकारण देखील असते. सण, उत्सवाच्या कालावधीत यात्रा, जत्रा देखील भरतात तेथे व्यवसाय करून वर्षभराची बेगमी करणारे हे छोटे व्यावसायिक असतात. मंदिराबाहेर फुले किंवा नारळ विकणारे कष्टकरी असतात. सण-उत्सव यांच्या माध्यमातूनच भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळते. देशातील अनेक देवस्थानांची कोट्यवधीची उलाढाल पाहता ही बाब लगेच स्पष्ट होते. त्यामुळे सणांशी संबंधित अर्थव्यवस्थेशी निगडीत अनेक छोटे-छोटे घटक असतात त्यांच्याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जसे उद्योगांना भरारी देण्यासाठी सरकार पॅकज जारी करते त्याच धर्तीवर सरकारला आता या विषयाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावे लागणार आहे. श्रावणापासून सुरू होणार्या चार महिन्यांमध्येच या ठिकाणची अर्थव्यवस्था जोर धरत असते. देशातील सण-उत्सव आणि धार्मिक परंपरा यांच्याबाबत सरकारने बाळगला आणि काही नियंत्रित प्रमाणात परवानगी दिली तर लोकांच्या मनातील मरगळ निघून जाईल. आगामी चार महिन्यांच्या कालावधीमध्ये अनेक सण आणि उत्सव असल्याने अर्थव्यवस्थेला त्याचा हातभारच लागणार आहे. हा सर्व विचार करूनच लोकांच्या मनातील श्रावण हर्षभरित करण्यासाठी सरकारला पावले टाकायला हवीत, तेंव्हाच खर्या अर्थाने ‘श्रावण मासी हर्ष मानसी....’असे म्हणता येईल.
Post a Comment