कोरोना हरणार...

जगभरात लाखो नागरीकांचे बळी घेणार्‍या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग जीव मुठीत घेवून जगत असताना आता मोठा आशेचा किरण दिसला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोरोना व्हायरस विरोधात विकसित केलेल्या लसीचा रिपोर्ट ‘द लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. हा अहवाल खूपच सकारात्मक आणि उत्साहवर्धक आहे. ऑक्सफर्डने बनवलेल्या लसीमुळे जगभरात लाखो नागरीकांचे बळी घेणार्‍या करोना व्हायरसला रोखता येणे शक्य असल्याचे दिसत आहे. ऑक्सफर्डची लस पूर्णपणे मानवी शरीरासाठी पूर्णपणे सुरक्षित असून ती रोगप्रतिकारक शक्तीलाही चालना देत असल्याचे अहवालात म्हटले आहे. एकीकडे ऑक्सफर्डची लस अंतिम टप्प्यात पोहचली असताना भारत बायोटेकने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या मदतीने तयार केलेली ‘कोव्हॅक्सिन’ विक्रमी कालावधीत मानवी चाचणीसाठी सिद्ध झाली आहे. कोणतीही लस विकसित करण्यासाठी किमान १ ते ३ वर्षांचा कालावधी लागतो. लसीच्या संशोधनापासून चाचण्या आणि उत्पादनापर्यंतची प्रक्रिया दीर्घ आणि आव्हानात्मक असली तरी त्यात झालेली प्रगती एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. 


लसी अंतीम टप्प्यात

संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसची लस तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात असून या तीन्ही लसी अंतीम टप्प्यात पोहोचल्या आहेत. सोमवारी संध्याकाळी कोरोनाची लस तयार होण्याच्या बातमीने संपूर्ण जगभरातील लोकांना आशेचा किरण दाखवला आहे. कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसपासून बचाव करता येऊ शकतो. असे सगळ्यांनाच वाटत आहे. ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतील एक्स्ट्राजेनका या लसीचे मानवी परिक्षण यशस्वी झाले आहे. म्हणजेच आता शेवटच्या टप्प्यातील लसीचे परिक्षण पूर्ण होण्यासाठी जास्त कालावधी लागणार नाही. ब्रिटीश तज्ज्ञांनी या लसीच्या शेवटच्या टप्प्यातील परिक्षण साऊथ आफ्रिका आणि ब्राझिलमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनी कंपनी सिनोवॅक बायोटेक ने दावा केला आहे की जगभरातील अनेक देशांमध्ये या लसीची चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे. चीनी कंपनी कोरोनाची लस तयार करण्याच्या जवळपास पोहोचली असून आता ब्राझिल आणि बांग्लादेशमध्ये या लसीचे परिक्षण सुरू करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्नच्या लसीचे परिक्षणाचे २ टप्पे पूर्ण झाले असून आता अंतीम टप्प्यातील संशोधनास सुरूवात होणार आहे. दुसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सफल झाले म्हणजे लस पूर्णपणे तयार झालेली असते. पण कोरोना व्हायरस हा महामारीच्या स्वरुपात पसरला आहे. संपूर्ण जगभरातील लोकांना कोरोना व्हायरसने प्रभावित केले आहे. शेवटच्या टप्प्यातील चाचणी झाल्यानंतर क्लिनिकल ट्रायलसाठी १ ते ४ वर्षापर्यंतचा कालावधी लागू शकतो. तरीही संशोधक सगळी परिक्षणे वेगाने करत आहेत. 

भारताने घेतलेली आघाडी कौतुकास्पद

ऑक्सफर्ड विद्यापीठ मागच्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणार्‍या कोरोना व्हायरस विरोधात लस विकसित करण्याचे काम करत आहे. लॅन्सेट या वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित निकालांनुसार ही लस सुरक्षित आढळली. तिचा मनुष्यांवर धोकादायक दुष्परिणाम आढळला नाही. या लसीने कोरोनाला निष्क्रिय करणार्‍या अँटिबॉडीजची मात्रा वाढवलीच, व्हायरसविरुद्ध लढणार्‍या इम्यून टी-सेल्सचीही पातळी वाढवली. यूके, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत ऑक्सफर्डची ही लस चाचणीच्या निर्णयाक टप्प्यावर आहे. ऑक्सफर्ड, यूके सरकार आणि अस्त्रा झेनेकामध्ये आधीच करार झाला आहे. फेज ३ च्या चाचणीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला तर अस्त्रा झेनेकाकडून या लसीचे मोठया प्रमाणावर उत्पादन सुरु होईल. ऑक्सफर्डच्या या लस प्रकल्पात पुण्याची सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया ही संस्था सहभागी आहे. सिरमकडून या लसीचे उत्पादन केले जाणार आहे. भारतात ऑगस्टपर्यंत मानवी चाचण्या पुर्ण होवून लस २०२० च्या अखेरीस उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने ऑक्सफर्डच्या लसीमुळे भारतातही उत्साह आहे. जगभरातील संशोधकांप्रमाणे भारतातही कोरोना व्हायरसची लस शोधण्यासाठी तज्ज्ञांचा प्रयत्न सुरू आहे. अमेरिका, चीनसह अनेक युरोपातील देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचा संसर्ग उशिराने म्हणजे मार्चमध्ये सुरू झाला. त्या वेळी जगातील अन्य देशांत लसीच्या संशोधनाला गती आली होती. मात्र उशिराने सुरुवात करुनही भारताने घेतलेली ही आघाडी निश्‍चितच कौतुकास्पद आहे. ऑक्सफर्ड, रशिया, चीनसह अन्य देशांतील लसींच्या बरोबरीला भारत पोहचला असल्याने सहाजिकच संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. भारतात जवळपास ११ पेक्षा जास्त लसी अशा आहेत. ज्यांना मानवी परिक्षणासाठी परवानगी मिळाली आहे.

कोरोनाविरुध्दची लढाई आपण जिंकण्याच्या टप्प्यात

सध्या कोवेक्सीन या लसीची चर्चा सर्वत्र सुरू आहे. भारत बायोटेकने करोनावरील लस ’कोव्हॅक्सिन’ तयार केल्याची घोषणा केली आहे. आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून त्यांनी यशस्वीरित्या भारतातील पहिली करोना लस तयार केली आहे. या लसीला भारत सरकारने मानवी चाचणीसाठी परवानगी दिली आहे. भारत बायोटेक कंपनीचा लस बनवण्याचा दीर्घ अनुभव आहे. पोलिओ, रेबीज, रोटाव्हायरस, जपानी इनसेफ्लाइटिस, चिकनगुनिया आणि जिका व्हायरसवर आतापर्यंत कंपनीने लस बनवल्या आहेत. दिल्ली एम्समध्ये सोमवारी भारतात निर्मित पहिली कोरोना लस ‘कोवाक्सिन’ची मानवी चाचणी सुरू झाली. १०० पेक्षा जास्त स्वयंसेवकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. यामुळे या कोरोना विरुध्दच्या या लढाईत भारतानेही मोठी आघाडी घेतली आहे. भारतासह जगभरातील शास्त्रज्ञांच्या या परिश्रमापुढे आता कोरोना दीर्घकाळ टिकाव धरु शकणार नाही, याचे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे. जगभरातील तज्ञांच्या मते यावर्षी डिसेंबरपर्यंत लस उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. कोरोनाविरुध्दची लढाई आपण जिंकण्याच्या टप्प्यात पोहचलो आहोत. मात्र पुढील चार ते पाच महिने खूप महत्त्वाचे आहेत. देशातील कोरोना बाधितांची संख्या ११ लाखांच्या वर पोहचली आहे. देशात समुह संसर्गाला सुरुवात झाली की नाही? यावर मते मतांतरे असले तरी, परिस्थिती निश्‍चितच चिंताजनक होत चालली आहे, याबाबत कुणाचेही दुमत नाही. लस उपलब्ध होईस्तव प्रत्येकाने कोरोना योध्दा बनून लढाई लढली तर कोरोनाला हरविण्यास वेळ लागणार नाही.

Post a Comment

Designed By Blogger