गेल्या अनेक दशकांपासून भारतीय वायू दलाची शान असलेले मिकोयान गुरेविच २७ अर्थात मिग-२७ हे लढाऊ विमान २७ डिसेंबरला निवृत्त झाले. जोधपूर विमानतळावर पार पडलेल्या या निवृत्ती सोहळ्यात मिग-२७ अखेरच्यावेळी हवेत झेपावेले. १९८१ च्या सुमारास भारतीय वायूदलात दाखल झालेल्या या लढाऊ विमानाने कारगिल युद्धात उंच पर्वतांच्या शिखरावर असलेल्या घुसखोरांच्या तळांवर यशस्वी हल्ला करण्याचे कामे चोखपणे पार पाडले होते. तब्बल १७०० किमी प्रतितास इतका तुफान वेग असलेल्या या विमानाची चार हजार किलो वजनाची शस्त्रास्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. मात्र गेल्या १० वर्षात विमान अपघाताच्या एकूण घटनांमध्ये सर्वाधिक मिग-२७ याच लढाऊ विमानांचा समावेश होता. या विमानातील तांत्रिक अडचणी दूर करणे शक्य न झाल्याने या विमानांना हवाई दलाच्या ताफ्यातून निवृत्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. जगातील बहुतांश देशांनी मिग-२७ चा वापर आधीच बंद केला आहे. आता भारतीय वायूदलातून निवृत्त झाल्यानंतर हे विमान इतिहासजमा झाले आहे.
हवेतून जमीनीवर अचूक मारा करण्याची क्षमता
भारतीय वायुदलाला गौरवशाली परंपरा आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी आपल्या वायुदलाकडे लढाऊ विमानांच्या ११ तुकड्या होत्या. फाळणीनंतर साडेसहा तुकड्या भारतात राहिल्या तर साडेतीन तुकड्या पाकिस्तानकडे गेल्या. त्यावेळी ही सर्व लढावू विमाने दुसर्या महायुध्दाच्य वेळेची ब्रिटिश विमाने होती. वायुदलाचे सामर्थ्य ओळखून याला सर्वशक्तीशाली करण्यासाठी अत्याधूनिक तंत्रज्ञानाची कास धरत व काळाची गरज ओळखत नव नवी विमाने भारतीय वायुदलात भरती करण्यात आली. १९६२ मध्ये चीनसोबतच्या युध्दावेळी भारताकडे ‘व्हॅम्पायर’ जेट विमान, ‘मिस्टेअर’, ‘तुफानी’ ही लढाऊ विमाने होती. पण दुर्दैवाने या युद्धात वायुदलाचा वापरच करण्यात आला नाही. नंतरच्या काळात ‘हंटर’ आणि ‘नॅट’ विमाने घेण्यात आली. त्यांनी ६५ च्या युद्धात उत्तम कामगिरीही बजावली. १९७१ च्या युद्धापर्यंत वायुदलाकडे लढाऊ विमानांची जवळजवळ ४० स्क्वाड्रन्स अर्थात तुकड्या होत्या. मिग विमाने भारतात येण्यास अमेरिका आणि रशिया अर्थात तत्कालीन सोव्हिएत युनियन यांच्यातील संघर्ष कारणीभूत ठरला. भारत तेंव्हा अमेरिकेच्या गटात सहभागी झाला असता तर अमेरिकेकडून ‘एफ १०४’ विमाने मिळाली असती (जी नंतर पाकिस्तानला मिळाली) परंतू भारताने अलिप्त राष्ट्रगटाची वाट निवडली. असे असतांनाही सोव्हिएत युनियने भारताला त्यांच्या गटात न जाताही ‘मिग २१’ दिले. जगातील पहिले सुपरसोनिक विमान मिग-२१ भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात आले. हवेतून जमीनीवर अचूक मारा करण्याची क्षमता असणार्या मिग लढावू विमानांची संपूर्ण मिग मालिकाच भारताने खरेदी केली. मिग २१ नंतर मिग २३, मिग २७ अशी रशियन विमाने भारताकडे आली.
चार दशकांहून अधिक काळ पराक्रम गाजविला
मिग-२७ हे रशियन बनावटीचे भारतीय हवाई दलातील लढाऊ विमान हवेतून जमिनीवर मारा करणारे सर्वोत्तम विमान म्हणून ओळखले जाते. १९८१ च्या सुमारास हे लढाऊ विमान भारतीय वायूदलात दाखल झाले. यानंतर भारतात १५० पेक्षा जास्त मिग २७ विमानांची निर्मिती करण्यात आली. तंत्रज्ञान हस्तांतरण करारानंतर भारताने रशियन बनावटीची मिग २७ विमाने बनवली. त्यांना ‘बहादूर’ या टोपण नावानेही ओळखले जाते. सोव्हिएत युनियनचा पाडाव झाल्यानंतर रशियाकडून विमानांचे सुटे भाग मिळण्यात अडचणी येत असल्याने मिग विमानांमध्ये तांत्रिक अडचणी वाढू लागल्या. या काळात मिग विमानांचे अपघात देखील चर्चेत आले. लढाऊ विमाने खर्चिक तर असतातच पण त्याचबरोबर त्यातील वैमानिकाचा जीवही अमूल्य असतो. अशा हवाई दलाच्या वैमानिकावर त्याला प्रशिक्षण देण्यापासून तो त्याची नेमणूक होईपर्यंत लाखो रुपये खर्च होतात. अशा परिस्थितीत अपघात झाला तर देशाचे भरून न येणारे नुकसान होते. जवळपास दर महिन्याला एकदा तरी मिग विमान कोसळल्याची बातमी असते. भारताजवळ या विमानांसह याच श्रेणीतील मिग २३, मिग २५, मिग २७ आणि मिग २९ ही विमाने आहेत. मध्यंतरीच्या काळात या मिग श्रेणीतील विमानांचे आधुनिकीकरण केले गेलेे. त्यामुळे या विमानांची मारक क्षमता वाढली असेल, पण त्यामधील तांत्रिक दोष दूर झाले नाही. तेंव्हापासून मिग२७ च्या निवृत्तीची चर्चा सुरु झाली होती. भारतीय वायुदलाच्या ताफ्यात ब्रिटिश ‘जग्वार’, फ्रेंच ‘मिराज’ ‘सुखोई’ विमाने असतानाही मिग २७ ने जवळपास चार दशकांहून अधिक काळ पराक्रम गाजविला, हे कुणीही नाकारु शकत नाही.
अत्याधुनिक लढाऊ विमानांची गरज
मिगचे महत्त्व १९६५ व १९७१ च्या भारत-पाक संघर्षात अधोरेखीत झाले. या युद्धांत मिगच्या पाच स्क्वॉड्रनांनी भारताच्या पश्चिम आघाडीवर हवाई वर्चस्व टिकवून ठेवले, तर पाच स्क्वॉड्रनांनी बांगला देश आघाडीवर अभूतपूर्व कार्यवाही केली. बांगलादेश सरकारची महत्वाची बैठक रात्री डाक्का शहरामध्ये राजभवनात चालू असल्याची माहिती गुप्तचरविभागाकडून मिळताच, अवघ्या पंधरा मिनीटांत दोन मिग स्क्वॉड्रनांनी केवळ पर्यटन नकाशाच्या साहाय्याने राजभवनावर रॉकेटचा हल्ला चढवून, बैठक उधळून लावली परिणामतः बांगला देश सरकारला बिनशर्त शरणागती पतकरावी लागली. जगात इतक्या धाडसी पिन पॉइंट हल्ल्याचे हे पहिलेच उदाहरण होते. मात्र आता जागतिक पातळीवर तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. आपण आजही तिसर्या व चौथ्या पिढीतील विमानांचा वापार करत आहोत. गेल्या काही वर्षांमध्ये इतर काही देशांमध्ये पाचव्या व सहाव्या पिढीतील विमाने तयार करण्यात आली आहेत. चीन, इस्रायलसारखे देश आज संरक्षण क्षेत्रात पुष्कळ प्रमाणात स्वयंपूर्ण आहेत. आधुनिक शस्त्रसामग्रीचा तुटवडा आणि परावलंबित्व ही केवळ वायुसेनेचीच व्यथा आहे असे नाही, तर वस्तूस्थिती आहे. स्वदेशी तंत्रज्ञान विकास हाच त्यावर खरा आणि निश्चित उपाय आहे. सध्यस्थितीत भारतीय हवाई दलात विविध प्रकारची एकूण ८१४ लढाऊ विमाने आहेत. मिराज २००० विमानांखेरीज या प्रकारची लढाऊ विमाने आहेत. यात प्रामुख्याने सुखोई, तेजस, मिग व जग्वारचा प्रामुख्याने ÷उल्लेख करावा लागेल. सुखोई-३०एमकेआय हे हवाई दलाचे असे लढाऊ विमान आहे, जे २१ व्या शतकाच्या गरजेनुसार बनवले आहे. स्वदेशी बनावटीचे ‘तेजस’ हे विमान नुकतेच हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाले आहे. तर भारतीय हवाई दलाचे दोन इंजिने असलेले जग्वार हे छोटे लढाऊ विमान आहे. हे कमी उंचीवरून उडत लक्ष्यांचा वेध घेणारे विमान आहे. भारतीय हवाई दलातील जग्वार ही महत्त्वाची विमाने आहेत. मिग ही हवाई दलाची भिस्त असणारी लढाऊ विमाने निवृत्तीच्या मार्गावर असताना त्यांची जागा भरून काढण्यासाठी विविध क्षमतांच्या आणि अत्याधुनिक लढाऊ विमानांची गरज आहे.
Post a Comment