ठाकरे सरकारची ‘घराणेशाही’

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ३४ व्या दिवशी मुहूर्त लागला. यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या एकूण ३६ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली मात्र अत्यंत गोपनियता बाळगण्यात आलेल्या सेनेच्या ‘युवराजां’चा राज्याभिषेक देखील याचवेळी करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावणे स्वाभाविक आहे. शिवसेना आतापयर्र्ंत काँग्रेस-राष्ट्रवादीला घराणेशाहीवरुन डिचवत होती मात्र आता खुद्द ठाकरे परिवारासह ठाकरे सरकारमध्येही घराणेशाही वरचढ ठरली आहे. ठाकरे सरकारमध्ये किमान अर्धा डझन नवनिर्वाचित मंत्री केवळ राजकीय वारसाहक्काने मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत.


काँग्रेसने तरुणांना संधी दिली

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात २६ कॅबिनेट मंत्री व १० राज्यमंत्री शपथ घेतली. नव्या मंत्रिमंडळात अनुभवी मंत्र्यांसह आणि तरुण मंत्र्यांचाही समावेश आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार आल्यामुळे प्रत्येक पक्षाच्या वाटेला मोजकीच खाती आली आहेत. त्यातही सरकारमध्ये मंत्रिपदासाठी अनेकजण इच्छुक होते त्यामुळे तिन्ही पक्षांच्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्तारासाठी मंत्र्यांची यादी जाहीर करताना तारेवरची कसरत करावी लागली असेल, हे सांगायला कुण्या ज्योतिषाची गरज नाही यापार्श्‍वभूमीवर मंत्रिपद वाटपाची नावे जाहीर होताच तिनही पक्षांमध्ये नाराजी नाट्य रंगण्यास सुरुवात झाली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराआधी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेले नाराजी नाट्य उघडपणे समोर आले. काँग्रेसने तरुणांना संधी दिली आहे. परंतु, या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसच्या युवा आमदार आणि माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांचे नाव नसल्याने त्यांची मंत्रिपदाची संधी हुकली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव मंत्रिमंडळाच्या विस्तारात नाही. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर येण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसकडून मंत्रीमंडळात दोन महिला नेत्यांना संधी दिली असून शिवसेनेने महिला नेत्यांना सपशेल डावलले आहे. मंत्रीमंडळ विस्तार आणि देण्यात आलेली मंत्रीपदे यावरून शिवसेनेने पुन्हा एकदा मुंबईवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येते. त्यामुळे महाराष्ट्रात संघटन वाढविण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला संधी आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपद मुंबईच्या वाट्याला गेले आहे. पहिल्या रांगेत मंत्रीपदाची शपथ घेणारे सुभाष देसाई मुंबईचेच आहेत. त्यात आता उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात शिवसेनेकडून मुंबईकडील नेत्यांचाच अधिक आहे.

ही दुर्मिळ राजकीय घटना

महाआघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, प्रहार संघटना आणि शेतकरी कामगार पक्षांनी साथ दिली. त्यामुळे या पक्षांच्या नेत्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता होती. मात्र ही शक्यता आता मावळली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला अनुकूल वातावरण होते. त्या परिस्थितीत देखील या घटक पक्षांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला साथ दिली होती. पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी आघाडीला दोन्ही निवडणुकीत विनाअट पाठिंबा दर्शविला होता. तर भाजपने अजित पवारांच्या मदतीने सरकार स्थापन केल्यानंतर देखील बच्चू कडू यांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शविला होता. तर राजू शेट्टी देखील शेतकरी प्रश्नी आघाडीत सामील झाले होते. शेकापमुळे आघाडीला अनेक जागांवर फायदाच झाला. घटक पक्षांनी अडचणीच्या काळातही आघाडीची साथ सोडली नाही. त्यामुळे त्यांना याचे फळ मिळण्याची शक्यता होती. मात्र बच्चू कडू, शेकापचे जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचे मंत्रीपद हुकले आहे. मात्र याचवेळी विधानसभा निवडणुकीमध्ये वरळीमधून पहिल्यांदाच आमदार झालेले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असणार्‍या आदित्य यांच्या रूपाने ठाकरे कुटुंबातील सदस्याने प्रथमच सक्रिय राजकारणात प्रवेश केला. आदित्य ठाकरे पहिल्यांदाच आमदार झाले आहे. आमदार झाल्यानंतर थेट मंत्रिमंडळात आणि थेट कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळण्याची ही दुर्मिळ राजकीय घटना आहे. 

तिन चाकांचा गाडा 

याप्रमाणे घराणेशाहीची परंपरा कायम ठेवण्यामध्ये, आदित्य ठाकरेंप्रमाणेच अमित देशमुख यांचाही समावेश आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे पुत्र असणारे अमित देशमुख यांनी लातूर शहर मतदारसंघामधून निवडणूक जिंकली. त्यांचीही मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. धारावी मतदारसंघातून सलग तिसर्‍यांदा विजयी झालेल्या वर्षा गायकवाड यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. वर्षा यांनी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळामध्ये महिला व बालकल्याण विकासमंत्रीपद भूषवले होते. काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या त्या कन्या आहेत. काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे पुत्र तथा काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि आमदार विश्वजीत कदम यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे तसेच अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित अपक्ष आमदार शंकरराव गडाख यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. शंकरराव हे माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे पुत्र आहेत. शंकरराव यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठींबा जाहीर केला होता. मात्र निवडणुकीनंतर शंकरराव यांनी शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले होते. एकंदरीत सहा जणांची वर्णी हे घराणेशाहीचे प्रतिबिंब अधोरेखीत करत आहे. यामुळे निष्ठांवान दुखावले जातील यात शंका नाही. मात्र जे ठाकरे घराणे केवळ रिमोट कंट्रोल म्हणून काम करत होते त्यांनी एकाच घरात मुख्यमंत्री पदासह कॅबिनेट मंत्रीही ठेवून घेतल्याने बाळासाहेबांची आठवण आल्यावाचून राहत नाही. आधीच उध्दव ठाकरेंना तिन चाकांचा गाडा हाकावा लागत आहे. अशात निष्ठावंत दुखावत असतील तर हा गाडा किती दुरवर जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल!

Post a Comment

Designed By Blogger