फेसबुक, टिकटॉक; शत्रु राष्ट्राचे हेर!

लष्करातील संवेदनशिल माहिती गोळा करण्यासाठी शत्रूंकडून अनेकदा हनीट्रॅपचा वापर केला जात असल्याचे वेळोवेळी उघडकीस आले आहे. गेल्या आठवड्यात भारतीय नौदलाची संवेदनशील माहिती पाकिस्तानमधील हँडलरला दिल्याबद्दल ११ खलाशांना अटक झाली. हेरगिरीचे रॅकेट उद्ध्वस्त झाल्यानंतर भारतीय नौदलाने आपल्या कर्मचार्‍यांना फेसबुक वापरण्यास बंदी घातली आहे. २०१७ मध्ये जे खलाशी सेवेत दाखल झाले ते फेसबुकच्या माध्यमातून हनी ट्रॅपमध्ये सापडल्यानंतर त्यांनी पाणबुड्या आणि नौदल जहाजांच्या ठिकाणांची माहिती दिल्याचे समोर आले होते. सोशल मीडियाचा धोका ओळखत भारतापाठोपाठ अमेरिकेच्या लष्कराने टिकटॉक या लोकप्रिय अ‍ॅपवर बंदी घातली आहे.

अ‍ॅप गुप्तहेरासारखेही काम करू शकते

अलीकडच्या काळात सोशल मीडियाचा अतिवापर हा चिंतेचा व चिंतनाचा विषय ठरत आहे. सोशल मीडिया अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले असले तरी याच्या मदतीने, द्वेषयुक्त भाषण, बनावट बातम्या, सार्वजनिक सुव्यवस्था आणि देशविरोधी कारवाया देखील या प्लॅटफॉर्मवर दिसतात. यावर बंधने घालण्यासाठी केंद्र सरकारने पाऊले उचलली असून १५ जानेवारी २०२० पासून सोशल मीडियासाठी नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे. या विषयावरुन अपेक्षेप्रमाणे राजकीय धुराळा उडण्यास सुरुवात झाली आहे. हे योग्य की अयोग्य यावर स्वत:चे ठाम मत तयार करण्याआधी गेल्या १५ दिवसात घडलेल्या दोन घटनांकडे कटाक्ष टाकणे गरजेचे आहे. यातील पहिली घटना भारतातील असून दुसरी अमेरिकेतील आहे. आंध्र प्रदेश गुप्तचर विभागाने १९ डिसेंबरला हेरगिरीचे रॅकेट उघडकीस आणले. त्यांनी असा दावा केला की, २०१७ मध्ये जे खलाशी सेवेत दाखल झाले ते हनी ट्रॅमध्ये सापडल्यानंतर त्यांनी पाणबुड्या आणि नौदल जहाजांच्या ठिकाणांची माहिती दिली. या तरुण खलाशांशी आधी तीन ते चार महिलांनी फेसबुकवर पहिल्यांदा संपर्क साधला. नंतर या महिलांनी या तरुणांना ऑनलाईनवर एका व्यक्तीची ओळख करून दिली. ही व्यक्ती प्रत्यक्षात पाक हँडलर होती. त्याने खलाशांकडून माहिती मिळवायला सुरुवात केली. यामुळे नौदलाने फेसबुक वापरावर बंदी घातली आहे. दुसर्‍या एका घटनेत अमेरिकेच्या लष्कराने टिकटॉक या सोशल मीडिया अ‍ॅपचा धसका घेतल्याचे समोर आले असून अमेरिकेने टिकटॉक वापरण्यास बंदी घातली आहे. हे अ‍ॅप गुप्तहेरासारखेही काम करू शकते, असे अमेरिकन लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल रोबिन ओचोआ यांनी स्पष्ट करत गेल्या महिन्यात अमेरिकन नौदलाने त्यांच्या कर्मचार्‍यांना देण्यात आलेले टिकटॉक अ‍ॅप डिलिट केले होते. त्यानंतर संरक्षण विभागानेही लष्कराला टिकटॉकपासून सावध राहण्याचे आणि कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करताना सावधगिरी बाळगण्याचे आदेश दिले आहेत. 

टिक-टॉकचा धुमाकुळ

टिक-टॉक हे एक सोशल मीडिया अ‍ॅप्लिकेशन आहे. या अ‍ॅपच्या मदतीने स्मार्टफोन युजर्स छोटे-छोटे व्हिडिओ बनवून शेअर करू शकतात. टिकटॉक म्हणजेच म्युझिकली हे म्युझिकली इंकॉर्पोरेटेड कंपनीने बनवले आहे. अ‍ॅलेक्स झू आणि लुयू यांग हे त्याचे खरे मालक. पण २०१६ मध्ये बाईटडान्स (आता टिकटॉक) ने ही म्युझिकली कंपनी टेक ओव्हर केली आहे. टिकटॉक जरी जगभर टिकटॉक ह्या नावाने ओळखले जात असले तरी चायना मध्ये हे डुयीईन म्हणून सुद्धा ओळखले जाते. या अ‍ॅपची लोकप्रियता झपाट्याने वाढत असून ऑक्टोबर २०१८ मध्ये अमेरिकेत हे अ‍ॅप सर्वाधिक डाउनलोड होणारे अ‍ॅप ठरले भारतातही सुमारे १२ कोटींच्यावर टिकटॉकचे वापरकर्ते आहेत. जगभरात अनेक ठिकाणी याची ऑफिसेस आहेत. लंडन, टोकियो, सेऊल, बीजिंग, सिंगापूर, जकार्ता आणि मुंबईत सुद्धा याचे ऑफिस आहे. या अ‍ॅपद्वारे युझर्स १५ सेकंदांपासून ते १ मिनिटांपर्यंतचे व्हिडीओ बनवू शकतात आणि हवा तो साऊंडट्रॅक निवडू शकतात. भारतातील रिकाम टेकड्या टिकटॉक वापरकर्त्यांना कदाचित माहिती नसणार की टिकटॉकने त्यांच्या बळावर घसघशीत कमाई केली आहे. मध्यंतरी सोशल मीडियावर सध्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या व तरुणाईला वेड लावणार्‍या टिकटॉक अ‍ॅपला विरोध होऊन या अ‍ॅपवर बंदी घाला, अशी मागणी करत हीना दरवेश नामक मुंबईतील गृहिणीने जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. यानंतर काही काळ अ‍ॅपवर बंदी देखील घालण्यात आली. बंदी नंतर गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून टिक टॉक अ‍ॅप हटवण्यात आले होते. मात्र अल्पकाळात बंदी मागे घेण्यात आली. आता हे अ‍ॅप पुन्हा एकदा सर्वत्र धुमाकुळ घालत आहे. 

देशविरोधी कारवायांसाठी प्रमुख अस्त्र म्हणून वापर

अशा सोशल मीडिया अ‍ॅप्सचा देशविरोधी कारवायांसाठी प्रमुख अस्त्र म्हणून वापर होत असल्याने अमेरिकेने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करायला हवे. दरम्यान, अमेरिकेत मेड इन चायना असलेल्या या टिकटॉकचा तपास सुरू आहे. मेड इन चायना असलेलं हे अ‍ॅप यूजर्सचा डाटा तर गोळा करत नाहीत ना? याबाबतची हा तपास सुरू आहे. भारतातही टिकटॉकवर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र आपल्याकडे कोणत्याही विषयावर राजकारण सुरु होत असल्याने अनेकवेळा मुळ मुद्दा बाजूला राहून जातो. आपण बघतो की जवळपास सर्व सोशल मीडिया संकेतस्थळांची मालकी परदेशी आहे. आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग असल्याने ज्याच्याकडे जास्त माहिती असेल तोच सर्वशक्तीशाली असेल, असे म्हटले जाते. भविष्यात कोणत्या देशांमध्ये युध्द जरी झाले तरी त्या माहिती हेच मोठे शस्त्र ठरेल. आपण विविध प्रकारचे अ‍ॅप्स वापरत आहोत, व्हॉट्सअप व फेसबुकतर आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्या आवडी-निवडींपासून इत्यंभूत माहिती परदेशी कंपन्यांकडे पाठवित आहोत, याकडे आपले सोईस्कररित्या दुर्लक्ष होते. आता त्यात टिकटॉक सारख्या अ‍ॅपची भर पडली आहे. याचा वापर करुन काहींनी कमाईचा मार्ग तयार केला असला तरी याचे प्रमाण अत्यल्प आहे. उर्वरित तरुणाई निव्वळ टाईमपास म्हणून याकडे पाहत असल्याने हा निश्‍चितपणे चिंतनाचे विषय ठरत आहे.

Post a Comment

Designed By Blogger