महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी अगदी दिवाळीपर्यंत ठाण मांडून बसलेल्या अवकाळी पावसाने वर्ष संपत असतानाही बहुतांश ठिकाणी हजेरी लावली. यंदा देशात किंबहूना जगभरात निसर्गचक्र बिघडल्यासारखी स्थिती होती. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूर आदी प्रकारच्या आपत्तींमुळे हजारो लोकांसह मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे चित्र जवळपास सर्वच ठिकाणी पहायला मिळाले. एकट्या महाराष्ट्राचा विचार केल्यास शासनाच्याच आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये जवळपास साडेचारशे जणांना जीव गमवावा लागला. हवामान संकटासंबंधीत संयुक्त राष्ट्रांच्या आशिया व पॅसिफिक प्रदेशासाठीच्या आर्थिक व सामाजिक आयोगाने या वर्षी ऑगस्ट महिन्यात एक अहवाल प्रसिध्द केला आहे. या प्रदेशाने मागील दोन वर्षांमध्ये अनुभवलेल्या नैसर्गिक आपत्ती या अगोदर अनुभवलेल्या आपत्तींच्या किंवा आपत्तीविषयक व्यक्त केलेल्या अंदाजांच्या कितीतरी पटींनी अधिक असल्याचे या अहवालात म्हटले आहे. यावरुन आपण विनाशाकडे किती वेगाने जात आहोत, याची प्रचिती येते.
बर्फ आवरण वितळण्याचा वेग वाढला
अलीकडच्या काही वर्षात ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द परावलीचा झाला आहे. या विषयावर चर्चा देखील सुरु आहे मात्र प्रत्यक्षात कृती करण्यात आपण मागे पडत आहोत. विकासाच्या नावाखाली अमर्याद वृक्षतोड सुरु आहे. याचा ‘आखोंदेखा हाल’ संपूर्ण देशाने आरे वसाहतीतील नियोजित मेट्रो शेडच्या निमित्ताने पाहिला. देशभरात कुठे बांधकामासाठी तर कुठे खाणी-खदानींसाठी सर्र्सास वृक्षतोड सुरु आहे. दिवसेंदिवस वाढणार्या सिमेंटच्या जंगलांमुळे पर्यावरणाची अमर्याद हानी सुरु आहे. लोकसंख्या व वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने प्रदूषणाचे प्रमाण देखील झपाट्याने वाढत आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून जागतिक हवामानात बदल होत असून, वातावरण आणि समुद्राचे तापमान वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात बर्फ वितळले आहे आणि समुद्राच्या पातळीत वाढ झाली आहे. १९९३ नंतर ग्रीनलँडमधील बर्फ आवरण वितळण्याचा वेग वाढला आहे, आर्क्टिक समुद्रातील बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढले आहे, समुद्रात वरच्या ७०० मीटरमध्ये जास्त प्रमाणात उष्णता साचून राहिली आहे. उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, पूर, चक्रीवादळे, वणवे अशा हवामानाच्या तीव्र घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे खूप विपरित परिणाम झाला आहे.
हवामानबदलाचे गंभीर वास्तव
सध्याच्या काळात जी जागतिक तापमानवाढ झाली, त्यापैकी निम्म्या वाढीस माणूस जबाबदार असल्याचे म्हणता येईल. जागतिक हवामानात जो वेगाने बदल होत आहे ती जगापुढची आजची सगळ्यात मोठी चिंता आहे. हे जग जेवढे मोठे आहे तेवढेच या जगाचे प्रश्न मोठे आहेत. मुख्य प्रश्न आहे तो या पृथ्वीवर लोकसंख्येचा वाढत चाललेला भार. जशी लोकसंख्या वाढली तसे लोकांचे प्रश्न वाढले. जंगलतोड ही त्यातून अपरिहार्य ठरलेली गोष्ट आहे आणि जेव्हा जंगले तोडून वस्त्या होवू लागल्या त्यावेळी या पृथ्वीसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले. झपाट्याने कमी होणारे पावसाचे प्रमाण याचा जंगलतुटीशी अत्यंत अनन्यसाधारण संबंध आहे आणि पावसाच्या अनियमिततेमुळे वाढणार्या उष्णतेचा हवामानाशी संबंध आहे. जमिनीतील ओल जेव्हा कमी होत जाते तेव्हा उष्णतामान वाढायला सुरूवात होते. एकीकडे जगातील ७०० कोटी लोकांचा श्वासोच्छश्वास हीच मुळी उष्णतेची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. लोकसंख्या वाढीमुळे उष्णतामान जसे वाढते आहे, तसे पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे उष्णतामान वाढत आहे. वातावरणात जे कार्बनचे उत्सर्जन वाढलेले आहे त्यातून ऑक्सिजनचे प्रमाण कमी होण्याची प्रक्रिया होत आहे. या सगळ्याचे एकत्रित परिणाम म्हणजे जागतिक तापमानात वाढ होत जाते आणि सगळ्यात चिंतेची बाब आहे. इंटरगव्हर्मेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) या संस्थेचा अहवाल काही महिन्यांपूर्वी प्रसिध्द झाला. या अहवालाने हवामानबदलाचे गंभीर वास्तव आपल्यापुढे मांडले आहे. वातावरणात कार्बन डायऑक्साईड सोडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. कारण १७५० ते २०११ या २६१ वर्षांमध्ये वातावरणात सोडलेल्या २०४० अब्ज टन पैकी निम्मा कार्बन डायऑक्साईड केवळ मागच्या ४० वर्षांमध्ये वातावरणात सोडला गेला आहे. गेल्या ४० वर्षांत लोकसंख्या वाढ आणि औद्योगिक वाढ यामुळे हे उत्सर्जनाचे प्रमाण वाढले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आशिया व पॅसिफिक प्रदेशासाठीच्या आर्थिक व सामाजिक आयोगाच्या अहवालात मांडण्यात आलेल्या मुद्यांवर लक्ष देवून उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
हवामान संकटामुळे तापमानाशी संबंधित टोकाच्या घटना
जगातील सर्वांत नैसर्गिक आपत्तीप्रवण असणार्या आशिया-पॅसिफिक भूभागास २०१९मध्ये हवामान संकटाच्या कठोर वास्तवाचा सामना करावा लागला. आशियातील महानगरांवर विषारी धुराचे थर पसरले होते. पूर आणि दरडी कोसळल्यामुळे या प्रदेशातील शेकडो लोक मृत्युमुखी पडले. चक्रीवादळांमुळे किनारी प्रदेशांमध्ये हाहाकार माजला आणि वणवे, दुष्काळ व उष्णतेच्या लाटांमुळे अनेक शहरांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले. हवामान संकटामुळे तापमानाशी संबंधित टोकाच्या घटना घडत असून, त्याचे आशिया-पॅसिफिक प्रदेशावर विनाशकारक परिणाम होत असल्याकडे शास्त्रज्ञांनी लक्ष वेधले आहे. मुंबईसह शांघाय, बँकॉक, जकार्ता ही आशिया-पॅसिफिक प्रदेशातील महानगरे समुद्र किनार्यावर वसली असल्याने त्यांना समुद्राची पातळी वाढण्याचा थेट धोका आहे. माणसाने कार्बन वायूंचे उत्सर्जन करणे आताच्या घडीला पूर्णपणे थांबवले तरीही सध्या अस्तित्वात असलेल्या वायूंचे परिणाम हवामान बदल आणि त्यामुळे होणार्या बदलांच्या माध्यमातून काही शतकांपर्यंत तरी होत राहतील. २०५० सालापर्यंत या वायूंचे उत्सर्जन ७० ते ९५ टक्क्यांनी कमी करावे लागेल. हे मोठे आव्हान आहे. मात्र, हे करण्यात आपण अपयशी ठरलो तर तापमानवाढ ४ अंशांच्याही पुढे जावू शकते. हे बदल रोखण्यासाठी या वायूंच्या उत्सर्जनात लक्षणीय प्रमाणात आणि सातत्यपूर्ण घट करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर काही बदलांशी जुळवून घेतले तरच हवामानबदलाचे धोके मर्यादित ठेवणे शक्य होईल. अन्यथा उष्णता वाढ, वादळे, अतिवृष्टीच्या घटना, अंतर्गत भागात व किनारी भागातील पूर, दरडी कोसळणे, हवेचे प्रदूषण, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, सागरी पातळीत वाढ आदी संकटे ओढवू शकतात. याचा गांभीर्यांने विचार करण्याची वेळ येवून ठेपली आहे.
Post a Comment