भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला महत्वाचे स्थान देण्यात आले आहे. अनेक पौराणिक कथांमध्ये तर देवांनाही अशक्यप्राय वाटणार्या गोष्टी आदिशक्तींनी म्हणजेच स्त्री-रूपाने शक्य करून दाखविल्या आहेत. आजही आपण धनप्राप्तीसाठी लक्ष्मीमाता, विद्येसाठी सरस्वती व शक्तीसाठी दुर्गामातेची उपासना करतो. मात्र, आज पुरुषप्रधान संस्कृतीच्या मानसिकतेखाली महिलांवर होणारा अन्याय, अत्याचार इतकेच काय तर जन्माच्या आधी तिच्याच आईच्या गर्भात होणारी ‘ती’ची हत्या हा समाजावर लागलेला कलंक आहे. मात्र अशा प्रतिकुल परिस्थितीतही संघर्ष करत महिलांनी घरचा उंबरठा ओलांडून विविध क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. कर्तृत्व सिद्ध करण्याची प्रत्येक संधी स्वीकारत तिने स्वत:चे शक्तीरूप दाखवून दिले. खरे तर भरारी मारायला तिला आज आकाशही कमी पडायला लागले आहे. या प्रगतीच्या शिखरावर कळस चढविण्याचे काम केले आहे ते भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने...
रडणारी महिला ते रोल मॉडेल महिला
आजच्या एकविसाव्या शतकातली स्त्री तर पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. घर-संसार तर तिने सांभाळलाच पण नोकरी आणि घर अशी दुहेरी जबाबदारीही तिने यशस्वीरित्या पेलली. राजकारण, क्रीडा, पत्रकारिता, मल्टी-नॅशनल कंपन्या, संशोधन, अभिनय जिथे संधी मिळेल तिथे तिने आपले वर्चस्व सिध्द केले आहे. स्वतःचे कर्तृत्व सिध्द करण्यासाठी लागणारा संघर्ष तिने कधीच नाकारला नाही पण तिला आपले अस्तित्व टिकविण्यासाठीच संघर्ष करावा लागणे ही केवळ चिंतेची नव्हे तर समाजासाठी शरमेची बाब देखील आहे. वंशाचा दिवा पाहिजे म्हणून मुलगी नको, असे म्हणणार्यांमुळे स्त्रीभृ्रण हत्यांचे प्रमाण वाढले, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. आज कोणत्याही क्षेत्रात मुली व महिला मागे नाहीत. एकेकाळी जे क्षेत्र पुरुषांची मक्तेदारी मानले जात होते त्या क्रीडा क्षेत्रात भारतीय महिलांनी आपल्या देशाचा नावलौकिक उंचावला आहे. पी. टी. उषापासून सुपरमॉम म्हणून ख्याती मिळविलेली बॉक्सर एम. सी. मेरी कोम, बॅडमिंटनची सुपरस्टार सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, सौंदर्यवती टेनिसपटू सानिया मिर्झा, तिरंदाजीमध्ये डोला बॅनर्जी, दीपिकाकुमारी, अॅथलेटिक्समध्ये कविता राऊत, कृष्णा पुनिया, क्रिकेटमध्ये मिताली राज, झुलन गोस्वामी, अंजुम चोप्रा, स्क्वॉशमध्ये दीपिका पल्लिकल, बुध्दीबळमध्ये कोनेरु हम्पी यांच्यासारख्या खेळाडू भारतीय खेळाडूंसाठी प्रेरणास्थान आहेत. मेरी कोम हिने केवळ एकदा नव्हे तर पाच वेळा जागतिक विजेतेपद मिळवित भारतीय महिलाही बॉक्सिंगमध्ये कारकीर्द करू शकतात हे दाखवून दिले आहे. त्यामधील दोन विश्वविजेतेपदे तिने दोन अपत्य झाल्यानंतर मिळविली आहेत. दोन मुलांची आई असलेल्या मेरी कोमने लंडन येथे २०१२ मध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक मिळवित सुपरमॉम म्हणून ख्याती मिळविली आहे. भारतीय महिला ही केवळ चूल व मूल यामध्ये रमलेली अबला नसून, ती जागतिक क्रीडा क्षेत्रातही आपल्या देशाची प्रतिमा उंचावत असते हेच या भारतीय खेळाडूंनी सिद्ध केले आहे. जी लोक मुलगी नको म्हणून स्त्रीभ्रृण हत्येसारखे महापाप करतात. ते देखील या महिलांचे यश व कर्तृत्व पाहून निश्चितच रडत असतील, अशी नेत्रदीपक कामगिरी या महिलांनी केली आहे. रडणारी महिला ते रोल मॉडेल महिला हा प्रवास निश्चितच सुखावणारा आहे. अनेकांनी हा खडतर प्रवास यशस्वीरित्या पार पाडला आहे. पी.व्ही.सिंधू हे त्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणावे लागेल.
सिंधूचे यश भारतील अनेक मुली व महिलांना प्रेरणा देणारे
वयाच्या ८ व्या वर्षापासून बॅडमिंटन खेळायला सुरूवात करणार्या सिंधू ने आंतरराष्ट्रीय ख्याती तेंव्हा प्राप्त केली जेव्हा ती १७ वर्षांची होती. २०१२ मध्ये तिथे जगातील टॉप २० वर्ल्ड रँकिंग मिळविली होती. असे करणारी ती पहिली कमी वयाची बॅडमिंटन खेळाडू ठरली. २०१३ मध्ये वर्ल्ड चँपियनशिप मध्ये पदक जिंकणारी ती पहिली महिला एकल खेळाडू बनली होती. मार्च २०१५ मध्ये ती भारताचा सर्वोच्च पुरस्कार पद्मश्री प्राप्त करणारी पहिली कमी वयाची खेळाडू ठरली आहे. आता तर जिद्द आणि जिंकण्यासाठीची चिकाटीच्या जोरावर सिंधूने इतिहास रचत जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय ठरली आहे. यापूर्वी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताकडून कोणत्याही पुरूष किंवा महिला खेळाडूने ही ऐतिहासिक कामगिरी केलेली नाही. सलग तिसर्या वेळेला सिंधूने अंतिम फेरीत प्रवेश केला केला होता. २०१७मध्ये याच स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ओकुहाराने सिंधूला पराभत केले होते. त्याच पराभवाची सल सिंधूच्या मनात होती. सिंधूने पराभवाची व्याजासह परतफेड केली. यापूर्वी १९८३मध्ये प्रकाश पादुकोण यांनी वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये ब्राँझ पदक पटकावले होते. चॅम्पियनशीपच्या पदकाजवळ पोहोचलेले ते पहिले भारतीय होते. त्यानंतर २०१९मध्ये सिंधूने सुवर्ण पदक मिळवून पहिली भारतीय महिला बॅटमिंटनपटू होण्याचा मान मिळवला. यापूर्वी सायना नेहवालने २०१६मध्ये जकार्तामध्ये झालेल्या या स्पर्धेत रौप्य पदक मिळवले होते. त्यावेळी स्पर्धेच्या रौप्य पदकापर्यंत जाणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती. बॅडमिंटनच्या कोर्टमध्ये विरोधी खेळाडूला नामोहरम करणार्या पी.व्ही. सिंधूने अन्य एका क्षेत्रातही इतिहास रचला आहे. बंगळुरूमध्ये झालेल्या एअर शोदरम्यान सिंधून ‘तेजस’मधून भरारी घेत इतिहासाच्या पानावर आपले नाव कोरले. स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ या फायटर विमानाने भरारी घेणारी सिंधू पहिला महिला ठरली आहे. सन २०१९ मध्ये सर्वाधिक कमाई करणार्या जगातील १५ महिला खेळाडूंची यादी फोर्ब्जने प्रसिद्ध केली होती. त्यात अमेरिकेची दिग्गज टेनिस स्टार सेरेना विल्यम्स अव्वल स्थानी आहे. त्यात स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू तेराव्या स्थानी आहे. या यादीत स्थान मिळवणारी ती एकमेव भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. फोर्ब्जच्या यादीनुसार, सिंधूची कमाई ५५ लाख डॉलर (जवळपास ३८ कोटी ८६ लाख ८७ हजार रुपये) इतकी आहे. सिंधूचे हे यश भारतील अनेक मुली व महिलांना प्रेरणादेणारे ठरणारे आहे. तिची कारकीर्द अशीच बहरत राहो, ही इश्वरचरणी प्रार्थना...!
Post a Comment