जम्मू-काश्मीर संदर्भातील कलम ३७० आणि कलम ३५ अ वरून आंतरराष्ट्रीय पातळीवर थयथयाट करणार्या पाकिस्तानला सगळ्या ठिकाणांहून लाथाडणे सुरुच आहे. आधी चीनच्या मदतीने युनोच्या व्यासपीठावर सपशेल चीतपट झालेल्या पाकिस्तानला फ्रान्समध्ये सुरु असलेल्या जी-७ शिखर परिषदेत थोडी फार आशा होती मात्र येथेही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या चर्चेत काश्मीर संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ट्रम्प यांनी केवळ काश्मीरच नव्हे तर भारत पाकिस्तान या दोन्ही देशातील सर्व प्रश्न हे द्विपक्षीय असल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले. जी-७ सारख्या परिषदेच्या व्यासपीठावरून ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्न द्विपक्षीय असल्याचे सांगून पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. आधी काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यास आपण तयार असून, यासाठी मोदींनीच गळ घातली होती, असे विधान ट्रम्प यांनी केले होते. नंतर त्यावरुन त्यांनी घुमजाव देखील केले होते मात्र आता त्यांनी केलेल्या विधानाचा स्पष्ट अर्थ होतो की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणत्याच विषयात अमेरिका लक्ष घालणार नाही. याला भारताच्या मुत्सद्देगिरीचे यश म्हणावे लागेल.
काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानच्या आशा संपुष्ठात
भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. भारतावर दबाव आणण्यासाठी पाकिस्तान सर्व स्तरांमधून दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. काश्मीरचा विषय भारत, पाकिस्तान व चीनमध्ये या त्रिकुटासाठी महत्त्वाचा आहे. काश्मीर, पाकव्याप्त काश्मीर आणि चीनच्या अधिपत्याखाली असलेला अक्साई चीन आणि ट्रान्स काराकोरम, असे तीन भाग यात पडतात. भारताबरोबर झालेल्या १९६२ च्या युद्धात चीनने अक्साई चीन ताब्यात घेतला, तर ट्रान्स काराकोरम हा भाग पाकिस्तानने चीनला दिला आहे. काश्मीरमधील कलम ३७० बाबत भारताने घेतलेल्या पाकिस्तानचा विरोध असून, त्याला चीनचा पाठिंबा आहे. चीनच्या मदतीने हा मुद्दा पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राकडे नेला तेव्हा दोन्ही देश तोंडघशी पडले. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असून, त्याबाबत निर्णय घेणे ही भारताची अंतर्गत बाब आहे, अशी भूमिका भारताने ठामपणे घेतली. या काळात मोदींच्या पहिल्या सरकारमधील बहुचर्चित परदेश दौर्यांचे फळ देशाला मिळाले. इस्लामिक देशांपासून सर्वच प्रमुख देश भारताच्या बाजूने उभे राहिले. हा विषय आंतरराष्ट्रीय करण्यासाठी पाकिस्तानने जंग जंग पछाडले. या सर्व पार्श्वभूमीवर जी-७ शिखर परिषदेत मोदी-ट्रम्प यांच्या भेटीत काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानच्या उरलेल्या आशा देखील संपुष्ठात आल्या.
पाकिस्तानचा प्रत्येक डाव उलटा
काश्मीरप्रश्नावरुन पाकिस्तानचा प्रत्येक डाव त्यांच्यावर उलटा पडत आहे. पाकिस्तानमधील माजी मंत्री असणार्या मलिक यांनी ट्विटवरुन भारतावर टीका करताना मलिक यांनी संयुक्त राष्ट्रांचे म्हणजेच युनायडेट नेशन्सचे ट्विटर हॅण्डल टॅग करण्याऐवजी उनो गेमचे ट्विटर हॅण्डल टॅग केल्याचे समोर आले आहे. मलिक यांनी एएनआय या वृत्तसंस्थेचे ट्विट रिट्विट करुन कोट करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. श्रीनगरमधील परिस्थितीवर भाष्य करणारे ट्विट कोट करून याकडे दखल द्या, असे सांगताना मलिक यांनी पंतप्रधान मोदी आणि उनो गेमच्या ट्विटर अकाउंटला टॅग केले. या गोंधळामुळे मलिक चांगलेच ट्रोल झाले. यातील गमतीचा भाग सोडला तर काश्मीरप्रश्नी पाकिस्तान सर्व पातळ्यांवर प्रत्येक लढाई हरलाच आहे. काश्मीर ही भारताची अंतर्गत बाब आहे. हे उघड सत्य मान्य करण्यास पाकिस्तान तयार नाही. काश्मीरप्रश्नी प्रथमच भारताने एवढी आक्रमक भूमिका घेतली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील स्पष्ट केले आहे की, आता चर्चा काश्मीरवर नव्हे तर पाकव्याप्त काश्मीरवर होईल. कारण, संपूर्ण काश्मीर भारताचा आविभाज्य भाग आहे आणि सध्या पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भाग पुन्हा मिळविण्यासाठीचे अधिकार भारत सरकारला देण्याचा ठराव संसदेनेच केलेला आहे. काश्मीरच्या मुद्याची सोडवणूक करण्याचा विषय भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यानची द्विपक्षीय बाब असून, त्यात कोणत्याही तिसर्या पक्षाला किंवा मध्यस्थीला वाव, अधिकार नाही हे तत्त्वही भारताने निश्चित केलेले आहे.
काश्मीरमध्ये उद्रेक होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल
सिमला करार आणि लाहोर जाहीरनामा या वाटाघाटींसाठी आधारभूत दस्तऐवज राहील हे उभयमान्य तत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर गेली महिनाभरा सुरु असलेले काश्मीर पुराण का सुरु झाले. हा महत्त्वाचा प्रश्न ठरतो. या विषयावरुन तणाव निर्माण झाल्यानंतर अमेरिकेसह फ्रान्स, रशिया, ब्रिटनसह अन्य प्रमुख देशांनी तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले. या विषयावर अफगाणिस्तानमध्ये घडणार्या घडामोडी देखील प्रभाव पाडणार्या आहेत. ट्रम्प यांना अमेरिकेच्या फौजा संघर्षग्रस्त अफगाणिस्तानमधून मागे घेण्याची घाई झाली आहे. त्यांना अफगाणिस्तानमध्ये होणारा अमेरिकेचा खर्च हा वायफळ व अनावश्यक वाटतो. म्हणून अफगाणिस्तानची जबाबदारी भारत व पाकिस्तान आणि त्यांच्या शेजारी देशांनी घ्यावी, अशी ट्रम्प यांची भूमिका आहे. त्यासाठी ते भारत व पाकिस्तानचा पिच्छा पुरवत आहेत. अफगाणिस्तानसाठी अमेरिकेला भारतापेक्षा पाकिस्तानची गरज अधिक आहे आणि त्यामुळेच पाकिस्तानला गोंजारणेही सुरू आहे. यामुळे पाकिस्तान भारतावर अधूनमधून गुरगुरत असतो शिवाय त्याला चीनची फुस आहेच. आतापर्यंत सर्व पातळ्यांवर भारत अशस्वीच ठरला आहे. आता पाकिस्तानचा आजवरचा इतिहास पाहता अमेरिकेच्या संपूर्ण माघारीनंतर अफगाणिस्तानात कोणते बदल होतात? तेही भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे असतील. आज अफगाणिस्तानमध्ये भारताला अनुकूल राजवट आहे व ती टिकून राहणेही तेवढेच अनिवार्य आहे. या पेचातून भारताला मार्ग काढावा लागेल आणि त्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये लवकर सुरळीत व सर्वसाधारण परिस्थिती निर्माण करण्याचे आव्हान सरकारला पार पाडावे लागणार आहे. दुसरीकडे काश्मीरमध्ये उद्रेक होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल आणि त्यासाठी लवकरात लवकर तेथील परिस्थिती पूर्वपदावर कशी येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील.
Post a Comment