वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सिंधूने सुवर्ण जिंकले आणि सारा देश तिच्या सेलिब्रेशनमध्ये सामील झाला. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्तीश: भेट घेवून सिंधूची पाठ थोपटली. सिंधूच्या या सुवर्ण कामगिरीमुळे देशाची मान अमिमानाने उंचावली होतीच यात तिळमात्र शंका नाही. मात्र, त्याच्या आदल्या दिवशी आणखी एका भारतीय बॅडमिंटनपटूने जग जिंकले होते. स्वित्झलँडमध्ये झालेल्या पॅरा वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियशिप २०१९मध्ये भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली. यात भारतीय खेळाडूंनी अनेक पदके भारतासाठी जिंकली. यात मानसी जोशी या खेळाडूने वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये विश्वविजेतेपदावर नाव कोरले. मात्र त्यांची चर्चा कुठेही झाली नाही. एका पायाने अपंग असणार्या या नव्या फुलराणीने मिळवलेले यश निश्चितच स्पेशल आहे. मात्र तिच्या या यशाची फारशी दखल घेतली गेली नाही, याबद्दल संपूर्ण देशाने मानसीची माफी मागायला हवी!
सोशल मीडियाच्या माध्यमातून मानसीचा विक्रम देशवासियांपर्यंत
पॅरा वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप या खास स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत तब्बल १२ पदके जिंकली. यात पॅरा बॅडमिंटनपटू मानसी जोशीने विश्व पॅरा बॅडमिंटनचा किताब जिंकला. मानसीने तीन वेळा विश्व चॅम्पियन झालेल्या पारुल परमारचा पराभव केला. मात्र त्यावेळी संपूर्ण देश सिंधूच्या यशात इतका गुंग झाला होता की, मानसी जोशी किंवा इतर पदकवीरांचा विसर सार्या देशाला पडला. कांस्य पदक जिंकलेल्या सुकांत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पीव्ही सिंधू यांच्या फोटोवर ट्वीट करत पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत १२ पदक मिळाल्याची माहिती दिली. त्यानंतर मानसी जोशीने स्वत: सिंधूला विजयाच्या शुभेच्छा देत, या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी १२ पदके जिंकल्याची माहिती दिली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत पदक जिंकणार्या खेळाडूंचे अभिनंदन करीत १३० कोटी देशवासियांना पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत पदक जिंकणार्या खेळाडूंचा अभिमान आहे. या खेळाडूंना पॅरा विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०१९मध्ये १२ पदके जिंकली आहेत, असे ट्वीट केले. यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून मानसीचा विक्रम देशवासियांपर्यंत पोहचला.
कृत्रिम पाय आणि गोल्ड मेडलचा प्रवास
अपंगत्व आल्याने अनेकांचे मानसिक खच्चीकरण होते, आत्मविश्वास खालावल्याने काही करण्याची उमेद हरवून जाते, असे अनेक वेळा पहावयास मिळते. मात्र मानसीने अपंगत्वामुळे खचून न जाता खेळामध्ये सातत्य ठेवले आणि विश्वविजेता पदाला गवसणी घातली. ३० वर्षीय मानसी जोशी बॅडमिंटन खेळाडू तर आहेच त्याचबरोबर ती एक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरसुध्दा आहे. मानसीने २०१४मध्ये पॅरा आशिया स्पर्धेत भाग घेतला होता, मात्र या स्पर्धेत तिला यश आले नाही. त्याच वर्षी तिने पहिल्यांदाच रौप्य पदकाची कमाई केली. त्यानंतर स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन स्पर्धेतही सहभाग नोंदवला, मात्र पाचव्या स्थानावर तिला समाधान मानावे लागले. सध्या मानसी २०२० पॅरा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या तयारीत आहे. विश्वविजेता होण्याचा मानसीचा प्रवास खूप खडतर होता. बॅडमिंटनची आवड असलेल्या मानसीने मुंबईच्या सोमय्या कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पूर्ण केले. शिक्षण पूर्ण होताच तिला मोठ्या कंपनीत जॉबही लागला. तिथेही तिने बॅडमिंटनचा छंद जोपासला. मानसीच्या आयुष्यात सगळे सुरळीत सुरु असतानाच २०११ साली एक दुर्घटना घडली. नेहमीप्रमाणे ती आपल्या स्कुटीवरुन ऑफिसला निघाली. एक सिग्नल पार करताना तिच्या स्कुटीवर एक भरधाव ट्रक धडकला. या अपघातात मानसीचा पाय गेला. वयाच्या २२व्या वर्षी झालेल्या अपघाताने मानसीच्या आयुष्याला मोठे वळण आणले. डिप्रेशनच्या गर्तेत गेलेल्या मानसीला पुन्हा उभे करण्याची जबाबदारी तिच्या घरच्यांसमोर होती. तिच्या कंपनीने मानसीच्या उपचारासाठी पैसा उभा केला. उपचारातून तिला कृत्रिम पाय बसवण्यात आला आणि सुरु झाला प्रवास गोल्ड मेडलचा.
‘खास’ खेळाडूंनी भारताची मान उंचावली
२०१४ साली मानसीने बॅडमिंडनचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणार्या मानसीला जागतिक स्टेज खुणावत होते. त्याच दरम्यान तिला सायना नेहवाल, पी व्ही सिंधूसह पी. गोपीचंद यांचे मार्गदर्शन लाभले. २०१५ साली मानसीने वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक मिळवले. त्यावर्षी तिने अनेक स्पर्धा गाजवल्या. यंदा महाराष्ट्र सरकारने एकलव्य पुरस्कार देऊन तिचा सन्मानही केला. एवढ्यांचा आशीर्वाद आणि जिंकण्याच्या जिद्दीने मानसीने यंदाच्या वर्ल्ड पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिपचा प्रवास सुरु केला. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आपण काय करु शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मानसी ठरली आहे. याआधी अशीच प्रेरणा व ऊर्जा अरुणिमा सिन्हा या तरुणीकडून कोट्यवधी भारतीयांना मिळाली होती. आयुष्यात स्थिरस्थावर होऊन संसाराचे स्वप्न रंगवणार्या अरुणिमाला एका काळरात्री गुंडांनी धावत्या ट्रेनमधून खाली फेकले. तिच्या पायावरून रेल्वे गेल्याने उजवा पाय तुटला. पण ती हरली नाही...खचली नाही...ती जिद्दीने पेटून उठली. तिने निश्चय केला उभे राहण्याचा...चालण्याचा आणि पराकोटीचे परिश्रम करून एव्हरेस्ट चढून जाण्याचा...! खरोखर, ती तिचे ध्येय मिळवण्यात यशस्वी झाली. पहिली भारतीय अपंग महिला एव्हरेस्टवीर झाली. याच पंगतीत अजून एका नावाचा आवर्जून उल्लेख करणे आवश्यक आहे. तो म्हणजे मरियप्पन. दक्षिण भारताच्या या मरियप्पन थांगवेलूने पुरुषांच्या उंच उडीत सुवर्णपदक जिंकून रियो पॅराऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली होती. देशासाठी अभिमानाचे पदक आणणारा तो तिसरा भारतीय अपंग खेळाडू ठरला. त्याच्या या यशापासून इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून त्याच्या जीवनावर मरियप्पन नावानेच बायोपिक काढण्यात येत आहे. या सर्व ‘खास’ खेळाडूंनी केवळ भारताचीच मान उंचावली नाही तर छोट्या छोट्या अडचणींवर रडणार्यांना जीवन जगण्याचा मंत्रदेखील दिला आहे. यात विश्वविजेतापदाचा किताब मिळवणार्या मानसीचे यश देशातील सर्वच मुली व महिलांना प्रेरणादायी ठरणारे आहे. जीवनात कितीही अडचणी, संकटे आली तरी खचून जायचे नसते किंवा त्यापासून पळायचेदेखील नसते. जीवन ही एक समरभूमी आहे, येथे जखमा तर होणारच. हा मूलमंत्र ठेवत आपल्या जिद्दीच्या जोरावर देशाचे नाव उंचावणारी मानसी व अन्य सर्व ‘खास’ खेळाडू करोडो भारतीयांना प्रेरणा देत राहणार हे नक्की.
Post a Comment