कोणत्याही व्यक्तीचे आपल्या शहरावर प्रेम असतेच. यातही जर तो व्यक्ती शिक्षण किंवा नोकरीसाठी आपले मुळगाव सोडून अन्य शहरात गेला तर मुळ गावावरील त्याच्या प्रेमाला भरती येते. जळगाव जिल्ह्यातील अनेक तरुण-तरुणी मुंबई, पुणे, नाशिकसह परदेशातही स्थायिक झाले आहेत. यातील जर तालुका किंवा गावपातळीवर विभागणी केल्यास तापीकाठच्या रावेर, सावदा, यावल, फैजपूर, भुसावळ या शहरातील लोकांची संख्या तुलनेने अधिक आहे. या सर्वांना आपल्या मुळगावाची ओढ व प्रेम कायम आहे. तशीच परिस्थिती धरणगाव, पारोळा, अमळनेर, पाचोरा, चाळीसगावही दिसून येते. तुलनेने जळगाव शहरातील जे-जे बाहेरगावी गेले आहेत. त्यांची जळगावबाबतची ओढ दिवसेंदिवस कमी होतांना दिसते.
इतक्या वर्षांपासून आपलं जळगाव असचं आहे, अजूनही काहीच सुधारणा नाही, १०-१२ वर्षांपुर्वी जेंव्हा मी जळगाव सोडलं होतं तेंव्हापासून आजपर्यंत काहीच सुधारणा नाही, अशी काहीशी भावना अनेकांच्या मनातून व्यक्त होते. याबाबत जळगाव लाईव्हने केलेल्या एका वैयक्तीक सर्व्हेत मुळ जळगावकर असलेल्यांच्या मनात जळगाव शहराबाबत काय भावना आहेत, हे जाणून घेतल्यानंतर अनेकांचे जळगाव वरिल प्रेम कमी होत असल्याचं अधोरेखीत झालं आहे. (या सर्वेक्षणासाठी जळगाव लाईव्हने संपर्कातील अनेकांशी सोशल मीडियावरुन संवाद साधण्यासह त्यांच्या फेसबूक प्रोफाईलचा अभ्यास केला आहे. शिवाय जवळपास ७० हजार फॉलोअर्स असलेल्या ‘आमचं जळगाव’ या लोकप्रिय फेसबूक पेजवरील एक पोस्ट केसस्टडी म्हणून अभ्यासण्यात आली आहे.)
प्रत्येक शहराला एक वेगळी स्वतंत्र अशी ओळख असते. शिवाय कालानुरुप ते शहर प्रगती व विकासाच्या वाटेवर एक एक पाऊल पुढे सकरत असते. यातून त्या शहराची किती प्रगती झाली, याचे मुल्यमापन होत असते. जळगाव जिल्हा हा सधन व सुपीक जिल्हा म्हणून ओळखला जातो. केळी व कापसाने या जिल्ह्याच्या अर्थकारणाला नवी ओळख निर्माण करुन दिली आहे. तापी पट्ट्यातील केळी आज पर राज्यांसह परदेशातही निर्यात होते. यामुळे केळी व कापूस उत्पादक भागांमध्ये अनेक शेतकर्यांनी केलेली प्रगती जिल्ह्यासाठी भुषणावह आहे. येथील तरुणाई प्रचंड प्रतिभाशाली असल्याने जिल्ह्यातील अनेक तरुण-तरुणी अनेक मोठ्या शहरांमध्ये मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. त्यापैकी अनेकांनी परदेशातही खान्देशची मान उंचवली आहे.
यामुळे आपल्या मातीपासून लांब गेलेले लोकं आपल्या मुळ गावाविषयी काय विचार करतात? हे खूप महत्त्वाचे ठरते. हाच धागा पकडून जळगाव लाईव्हच्या चमूने वेगवेगळ्या शहरातील तरुणाईशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधला. यावेळी जिल्ह्यातील बहुतांश जणांनी आपल्या मुळगावाचे तोंडभरुन कौतूक करत आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली. मात्र जेंव्हा जळगाव शहराचा विषय आला तेंव्हा अनेकांचे मत थोडेसे नकारात्मकच दिसून आले. गेल्या अनेक वर्षांमध्ये जळगावमध्ये सकारात्मक असे काहीच बदल झाले नाहीत. आम्ही १०-१५ वर्षांपूर्वी जेंव्हा जळगाव सोडलं होतं तेंव्हा रस्ते, रस्त्यांवरील खड्डे, धुळ, गटारी अशा अनेक मुलभूत समस्या होत्या, त्या आजही कायम आहेत. मोठा सकारात्मक असा कोणताच बदल झालेला दिसून येत नाही, असे मत अनेकांनी व्यक्त केले.
परगावी असलेल्या अनेकांना जळगाव शहरासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. मात्र जळगावचे काहीच होणार नाही? असे म्हणून अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली. काहींनी येथील राजकारणावर बोट ठेवले. जळगाव शहराच्या विकासासाठी आणि चेहरामोहरा बदलण्यासाठी एक नव्या चेहर्याची गरज आहे, जो सध्याच्या राजकरणापासून लांब आहे, असेही काहींचे मत पडले. स्थानिक राजकारणी काहीच करणार नाही, त्यांना करायचं असतं तर जळगावची अशी दुर्दशा झालीच नसती, असा रोखठोक आरोपही काहींनी केला. ‘आमचं जळगाव’ या फेसबूक पेजवर व्यक्त झालेल्यांची मत आरोप-प्रत्यारोप किंवा नकारात्मक पध्दतीने न घेत एक दिशादर्शक म्हणून घेतली पाहिजे. यातील मिलिंद देशपांडे नावाचे युझर म्हणतात की, ‘एका समृद्ध व संपन्न आणि कधी काळी महाराष्ट्रातील वेगाने औद्योगिक दृष्ट्या झपाट्याने वाढ होणार्या जळगाव,औरंगाबाद व नाशिक या शहरांपैकी या शहराची वाट कशी स्थानिक लोकप्रतिनिधींनी व महानगर पालिकेने लावली हे जळगाव कडे पाहिल्यावर लक्षात येते.’ चंद्रकांत बडगुजर यांनी तर त्यांच्या व्यथा एका गणिताच्या स्वरुपात मांडल्या आहेत. ते म्हणतात की, ‘सहनशिल जनता + मस्तवाल लोकप्रतिनिधी + शून्य सामाजिक सुविधा = अविकसित जळगाव’ सुधीर पाटील यांनी त्यांच्या मनातील खदखत अत्यंत मार्मिक स्वरुपात मांडली आहे. ते म्हणतात की, ‘मात्र भुमी हि कशीहि असो ती प्रिय असतेच, तिचा सर्वाथाने विकास / भरभराट होवो हिच माझी सदिच्छा.’
याव्यतरिक्त अनेकांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली आहे. त्यापैकी काही निवडक प्रतिक्रिया खालील प्रमाणे,
१) ‘सर्वात महत्वाचे म्हणजे जळगाव चे राजकारण सर्वात थर्डक्लास. म्हणून जळगांव ची प्रगती होऊ शकत नाही. आणि सगळे जण आप आपले खिसे भरतात. शहराच्या विकास गेला खड्यात. म्हणून जळगांव च्या पुढे सगळे शहर पुढे गेले... जितके बोलले ते कमीचं आहे....’
- चेतन गोयर
२) ‘कॉम्प्लेक्सचे गाव, स्वर्ण नगरी, पाईप उद्योग, दाल उद्योग, चटाई उद्योग... जळगावमध्ये कधी काळी भरारी घेणारे उद्योग होते, पण आता लौकिक कमी झालेला आहे, अनेक कारण आहे, भविष्यामध्ये पुढील २५ वर्षामध्ये शहराचा कायापलट, प्रगति कशी होणार पूर्ण नियोजन चे इच्छा करणारे नेतृत्व नाही आहे, तशी विश्वासू समर्पित इच्छा शक्ती असणारे जळगांव सध्या तरी कोणी नाही आहे, खड्ड्यांचे गांव, नियोजन शून्य शहर पण सभ्य, सहन करणारे, शांत राहणार्या महिला पुरुष, गृहस्थ, युवा चे शहर रोजगार नाही, नवीन मोठे उद्योग नाही, काम धंदे नाही, तरी आय लव्ह माय जळगाव... माझ गांव जळगांव’
- संजय हिराणी
३) ‘लोकं खूप मेहनती आणि स्वावलंबी पण गेली कित्येक वर्षे झाली आहे ती एमआयडीसी खाली होत चालली आणि डेव्हलोपमेंट शून्य. विकास नाही होणार तर मानसिकता खराब होणार. आठवा ३०-३५ पूर्वीचे जळगांव साध्या सीटी बस सुध्दा एमआयडीसीला किती असायच्या आणि आता.’
- सचिन तायडे
४) ‘जळगाव हे एक असं खेड आहे ज्याला जिल्ह्याची उपाधी दिली आहे.’
- ज्ञानेश्वर सुर्यवंशी
५) ‘गेल्या १५ वर्षपसुन तरी ख़ड्डे आणि धुळीचे शहर’
- सचिन भास्कर
Post a Comment