जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतीयांचे सोन्यावर अधिक प्रेम आहे. लग्नापासून कोणत्याही कौटुंबिक समारंभात सोन्याचे दागिने घातल्याशिवाय तो समारंभाला फिलच येत नाही! सोने म्हटले की जळगावचे नाव चटकन समोर येते. जळगावचा सुवर्ण बाजार देशभरात प्रसिद्ध आहे. येथील सोन्याची शुद्धता आणि व्यवहारातील विश्वासर्हाता यामुळे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, दक्षिण भारतातून सातत्याने मोठ्या प्रमाणावर सोन्याचे चोखंदळ ग्राहक जळगावात येतात. यामुळेच जळगावला सुवर्णनगरी देखील म्हटले जाते. या बाजारपेठेला तब्बल १६० वर्षांची परंपरा आहे. १८६४ मध्ये राजमल लखीचंद ज्वेलर्सने जळगावच्या सराफ बाजाराची मुहूर्तमेढ रोवली. पुढील काळात ती विस्तारत गेली. आजमितीस जळगाव शहरात सुमारे १५० सुवर्ण पेढ्या व सुवर्ण मॉल्स आहेत तर जिल्ह्याची आकडेवारी ५००च्या वर आहे.
जळगावची सुवर्ण बाजारपेठ देशभरात प्रसिध्द आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे येथील सोन्याची शुध्दता व गुणवत्ता. उपलब्ध माहितीनुसार, जळगावच्या सुवर्ण बाजारात रोज १०० किलो सोन्याची विक्री होते. आजमितीला जळगावमध्ये सोन्याच्या पेढीसर सुसज्ज शोरुम देखील सुरु झाले आहेत. यात देशातील सर्वात मोठ्या ब्रॅण्डपैकी एक असलेल्या तनिष्कचा देखील समावेश आहे. जळगावात शोरूम संस्कृतीची मुहूर्तमेढ आर. सी. बाफना या फर्मने रोवली, असे मानले जाते. जळगावमध्ये केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर शेजारच्या गुजरात, मध्यप्रदेश मधून देखील अनेक ग्राहक सोने खरेदीसाठी येतात.
ब्रिटिशांच्या काळापासून जळगावच्या सोन्याची महती दुरपर्यंत पसरलेली दिसते. जुन्या लोकांच्या मते ब्रिटिशांनी जळगावमधून देखील खूप सोनं लुटलं आहे, मात्र तशा नोंदी शासनदप्तरी आढळून येत नाही. खान्देश हा सधन आणि सुपीक प्रदेश म्हणून ओळखला जात असे. येथील केळी व कापसामुळे येथील शेतकरी सधन होते. यामुळे येथील बाजारपेठे देखील मोठी होती. या शिवाय व्यापारी वाहतुकीच्या दृष्टीने हा मध्यवर्ती भाग म्हणून ओळखला जात असे. यामुळे येथे औद्योगिक विकास झपाट्याने झाला. लोकांच्या हातात पैसा खेळू लागला. याच काळात जळगावमध्ये सुवर्ण बाजारपेठे स्थिरावली.
परकीय आक्रमणकर्ते आणि बिटिशांनी लुटले सोने
भारतात इ.स.पूर्व काळापासून सोन्याला विशेष महत्त्व आहे. भारताच्या सिंधू संस्कृतीत ख्रिस्तपूर्व अडीच हजार वर्षांपूर्वी सापडलेल्या सोन्याची नाणी आणि दागिन्यांचे वर्णन आहे. चौदाव्या शतकापर्यंत भारतातील अनेक राज्यांमध्ये सोन्या-चांदीची नाणीही चलनात होती. परकीय आक्रमणकर्त्यांनी भारतावर (तत्कलिन अखंड हिंदूस्तान) हल्ले करत येथील मंदिरातील अफाट संपत्ती लुटून नेली. दक्षिण भारतातील मंदिरांमध्ये सोन्या-चांदीचा खजिना इतका मोठा आहे की ते एकत्र केले तर संपूर्ण जगाचे सोने भारताच्या जवळपास कुठेच राहणार नाही. म्हणूनच भारतात सोन्याचा धूर निघायचा, असे म्हटले जायचे. इंग्रज भारतात आले तेव्हा या देशातील अफाट संपत्ती आणि सोन्याचे वैभव पाहून त्यांचे डोळे दिपले. त्यांनी देशातील सोने ब्रिटनला पाठवायला सुरुवात केली. इंग्रजांनी राजघराण्यांच्या तिजोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनमानी कायदे केले, असे आपणास इतिहासाची पाने उलगडतांना दिसून येते.
भारतात उत्तर प्रदेश, झारखंड व बिहारमध्ये सोन्याच्या खाणी
केजीएफ या चित्रपटाचा पहिला व दुसरा भाग सुपरडुपर हिट झाला आहे. कर्नाटकची राजधानी बंगलोर पासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या कोलार गोल्ड फिल्ड(केजीएफ) या सोन्याच्या खाणीवर हा चित्रपट आधारित आहे. ही तब्बल १२१ वर्षे जुनी असलेली जगातील दुसर्या क्रमांकाची सर्वाधिक खोल सोन्याची खाण समजली जाते. मात्र आता त्यातून सोने काढले जात नसल्याने ती खाण बंदच आहे. भारतातील सोन्याच्या खाणींबद्दल बोलायचे म्हटल्यास, उत्तर प्रदेश, झारखंड व बिहारमध्ये सोन्याच्या खाणी आहेत. अलीकडेच बिहारमध्ये सोन्याचा मोठा साठा असलेली खाण सापडली आहे. बिहारमधील जमुई जिल्ह्यात सोन्याचा अनेक टनांचा साठा आहे. फार पूर्वी येथील मातीत सोन्याचे तुकडे सापडल्याचा दावा रहिवासी करतात. झारखंड मधील रांची जिल्ह्यातही २०१८ मध्ये सोन्याच्या पाच खाणी सापडल्या होत्या. कुबासाल, सोनापेट, जारगो, सेरेंगडीह आणि सरायकेला-खरसावा जिल्ह्यातील जेलगडा येथे या खाणी सापडल्या. उत्तर प्रदेशात ठिकाणी सापडलेला सोन्याचा साठा ३,५६० टन आहे. बुंदेलखंड आणि विंध्य विभाग सोन्याबरोबरच प्लॅटिनम, हिरे, चुनखडी आदी धातूंनी समृद्ध आहेत.
जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या खाणी
दक्षिण आफ्रिकेमध्ये जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण आहे. साऊथ डीप गोल्ड नावाच्या या सोन्याच्या खाणीत सुमारे ३.२८ कोटी औंस सोने (एक औंस म्हणजे २८ ग्रॅम) आहे. इंडोनेशियामधील ग्रासबर्गमधील सोन्याची खाण जगात दुसर्या क्रमांकावर आहे. या खाणीत २.६० कोटी औंस सोने आहे. रशियातील सबियामधील ओलंपियाड ही सोन्याची खाण जगातील तिसर्या क्रमांकाची सर्वांत मोठी सोन्याची खाण आहे. या खाणीत सोन्याचा तब्बल ३.२० कोटी औंस इतका सोन्याचा साठा आहे. पापुआ न्यू गिनी येथील लिहिर गोल्ड खाण जगात चौथ्या क्रमांकावर आहे. या खाणीत २.४० कोटी औंस सोने आहे. चिली येथील नॉर्थ एबेरेटो खाण जगात पाचव्या क्रमांकावर आहे. या खाणीत जवळपास २.३२ कोटी औंस सोनं आहे.
<a href="https://www.informationg.com/2022/05/rakshabandhan-nibandh-marathi.html>रक्षाबंधन विषयी संपूर्ण माहिती नक्की वाचा.</a>
ReplyDelete