नाथाभाऊ तुमचं खरचं चुकतयं, आतातरी वस्तूस्थिती स्विकारा

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीला ग्रामीण राजकारणाच्या दृष्टीने खूप महत्त्व असते यात दुमत नाही. मात्र दूध संघाच्या निवडणुकीसाठी पाच आजी माजी मंत्री व पाच आजी माजी आमदार यांनी प्रतिष्ठा पणाला लागेल, इतके महत्त्व असते का? हा प्रश्‍न सध्या जळगावकरांना पडला आहे. याचे कारण म्हणजे, नुकतीच पार पडलेली जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक! एकनाथराव खडसे व गिरिश महाजन यांच्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई म्हणून याकडेे पाहिले गेले असले तरी सर्वाधिक चर्चा झाली ती नाथाभाऊ व भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यातील आरोप प्रत्यारोपांची. खडसेंच्या तुलनेत चव्हाण हे राजकारणात खूपच ज्यूनियर आहेत तरी देखील त्यांनी खडसेंना धूळ चारली. खडसेंनी ही निवडणूक इतकी प्रतिष्ठेची का केली होती? याचेही उत्तर अनेकांना मिळालेले नाही.



मंत्री गिरिश महाजन व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यातील राजकीय वर्चस्वाची लढाई म्हणून पाहिल्या गेलेल्या जळगाव जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकी हायहोल्टेज लढत म्हणून भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे यांच्याकडे पाहिले गेले. विशेष म्हणजे मंगेश चव्हाण यांनी आपला चाळीसगाव तालुका मतदासंघ सोडून खडसेंच्या मुक्ताईनगर तालुक्यातून उमेदवारी करत बाजी मारली. महाजन यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने १५ जागांवर विजय मिळवला. तर खडसे यांच्या नेतृत्वाखालील सहकार गटाला केवळ ४ जागा मिळाल्या. या निकालानंतर खडसेंची जिल्ह्याच्या राजकारणावर उरलीसुरली पकड ही ढिली झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र ही वस्तूस्थिती नाथाभाऊ स्विकारायला तयार नाहीत.

खडसेंसोबत खरंच कुणी आहे का?

महाराष्ट्रातील वजनदार नेत्यांच्या यादीत ऐकेकाळी ज्यांचे नाव अग्रभागी असायचे असे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपल्या जीवनाची ४० पेक्षा जास्त वर्षे भाजपाला वाढविण्यासाठी खर्ची घातली आहेत. ज्याकाळी जळगाव जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता तेंव्हा भाजपाची बिजे रोवली व केंद्रात आणि राज्यात सरकार नसतांना जळगाव जिल्ह्यात भाजपचे खासदार, आमदार सातत्याने निवडून आणले. ग्रामपंचायतींपासून ते नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपचा झेंडा फडकवला. २०१४ मध्ये सत्तास्थापनेवेळी एकनाथराव खडसे हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. त्यांच्या राजकीय वर्चस्वाला उतरती कळा लागण्यास येथूनच सुरुवात झाली. मुख्यमंत्रीपद तर दूरच राहिले पण भोसरीतील जमीन गैरव्यवहार, दाऊदच्या पत्नीशी फोनवरून झालेले कथित संभाषण तसेच स्वीय सहायकाचे लाचप्रकरण अशा एक ना अनेक आरोपांमुळे खडसेंना जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासह तब्बल १२ महत्त्वपूर्ण खात्यांच्या मंत्रीपदावर पाणी सोडावे लागले. कालांतराने आरोपांवर निर्दोषत्व मिळून देखील खडसेंना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. योग्य वेळ आल्यावर खडसेंचे पुनर्वसन केले जाईल, असे सांगत त्यांना झुलवत ठेवल्याने अखेर त्यांनी भाजपाला रामराम करुन राष्ट्रवादीत प्रवेश केला. राजकीय तज्ञांच्या मते खडसेंची ही मोठी चूक होती. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना आमदारकी मिळाली असली तरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते त्यांना मनापासून नेते मानण्यास तयार नाही, हे आता लपून राहिलेले नाही. भाजपातून त्यांच्या सोबत राष्ट्रवादीत आलेले अशोक लाडवंजारी व सुनील माळी यांच्यासह दोन-चार नावं सोडली तर खडसेंसोबत खरंच कुणी आहे का? याचं प्रामाणिक आत्मपरिक्षण केल्यास अनेक प्रश्‍नांची उत्तरे मिळतील!

चुकीच्या सल्ल्यांमुळे खडसेंचा पाय दिवसेंदिवस खोलात

एखादी व्यक्ती घर बनवण्यासाठी आयुष्य खर्ची घालते, त्याच व्यक्तीला आयुष्याच्या शेवटी त्या घरातून बाहेर व्हावे लागते. घराच्या दारात बसून तो उरलेल्या आयुष्यभर वाट पाहतो की आतून कधीतरी कुणी आवाज देईल, याची वेदना काय असते? हे सध्या खडसेंपेक्षा जास्त कुणी जाणणार नाही. खडसे यांचे नेमके काय चुकले? ज्याची त्यांना एवढी मोठी शिक्षा मिळाली. यामागे अनेक कारणे असू शकतात. अर्थात प्रत्येकवेळी पक्षानेच खडसेंवर अन्याय केला आहे असेही नाही, खडसेंही चुकले आहेच, हे नाकारताच येणार नाही. खडसेंच्या हातून एकामागून एक चुका का होत गेल्या? या प्रश्‍नाचं उत्तर शोधतांना खडसेंच्या जवळचे स्वयंघोषित सल्लागारांची भुमिका संशयाच्या भोवर्‍यात येते. खडसेंना सध्या ज्या फेजमधून जावे लागत आहेत. तसा फेज राज्यातील किंवा देशातील अनेक नेत्यांच्या आयुष्यात येतो किंवा आलेला आहे. मात्र चुकीच्या सल्ल्यांमुळे खडसेंचा पाय दिवसेंदिवस खोलात चालला आहे. दूध संघाची निवडणूक त्याचेच एक उदाहरण म्हणता येईल.





Post a Comment

Designed By Blogger