मागील काही दिवस राज्यात चाललेल्या मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. न्यायालयाच्या सूचनेचे पालन करणे, हा एवढाच भाग खरे तर यात आहे. मात्र, त्यातही राजकीय वाद उफाळला आहे. प्रार्थनास्थळांवरील भोंगे जर प्रदूषणाच्या मुद्यावरून काढण्यासंदर्भात किंवा त्यांची तीव्रता ठरावीक डेसिबलपर्यंत ठेवण्याविषयी न्यायालयाच्या सूचना पाळल्या जाव्यात, हा मुद्दा समोर येताच महाराष्ट्रात राजकीय वाद पराकोटीचा आक्रमक ठरला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मशिदीवरील भोंगे हटविण्यासंदर्भात ठाम आहेत. जिथे मशिदीवर भोंगे वाजविले जातील, तिथे हनुमान चालिसा वाजवा, असे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले आहेत. आम्हाला देशातली शांतता बिघडवायची नाही. देशात आम्हाला दंगलीही नकोत. परंतु आपण धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल, तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही. प्रत्येक राज्यातल्या नागरिकांनी आपापल्या सत्ताधारी राज्यकर्त्यांना हिंदूंची ताकद काय आहे; हे दाखवून द्यावे, अशी भुमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे. राज ठाकरेंच्या या आक्रमक भुमिकेमुळे राज्यातील वातावरण तर ढवळून निघालेच आहे मात्र राजकीय पातळीवर याचा विचार केल्यास राज्यातील महाविकास आघाडी त्यातही शिवसेनेची यात मोठी गोची झाली आहे.
भोंग्यावरुन सुरु असलेल्या राजकाराचे पडसाद थेट दिल्लीपर्यंत
औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्यासाठी ४ मेचे अल्टिमेटम दिले होते. मात्र सरकारने याला प्रतिसाद न दिल्यामुळे, राज ठाकरे यांनी आपली पुढची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यात सरकारची भूमिका यात बोटचेपेपणाची असल्याचे सांगत त्यांनी सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेची आठवण करुन दिली आहे. बाळासाहेबांच्या विचाराचा सरकारला विसर पडला आहे, अशी टीकाही त्यांनी या पत्रात केली आहे. प्रत्येक धर्माच्या लोकांना ३६५ दिवस भोंगे लावण्याची परवानगी नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. उद्या अजानच्या समोर हनुमान चालिसा लावा, असे आवाहनही त्यांनी मनसैनिकांना केले आहे. औरंगाबाद येथील सभेत भडकवणारी विधाने केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मनसैनिकांची धरपकडही सुरु करण्यात आली आहे. ईदच्या दिवशी भोंग्याच्या राजकारण काहीसे निवळले होते. कारण अक्षय्य तृतीयेनिमित्त मनसेकडून राज्यभरात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. तसे आदेश मनसेचे अध्यक्ष राज यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. मात्र नंतर कोणाच्याही सणात बाधा आणायची नाही, अशा शब्दांत राज यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत महाआरती रद्द केली होती. मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेली डेडलाइन एक दिवस वाढवली. ‘३ मे रोजी रमझान ईद आहे. ईदच्या सणात आपल्याला विष कालवायचे नाही. मात्र ४ मेपासून आम्ही ऐकणार नाही.’ असे सांगतानाच मशिदींवर भोंगे वाजले तर समोरच दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू, असे आवाहन त्यांनी संभाजीनगर येथे आयोजित जाहीर सभेमध्ये केले. आधी मशिदींवरील भोंगे उतरवा नंतरच मंदिरांवरील भोंगे उतरवू, असे ते म्हणाले. ‘मला महाराष्ट्रात दंगली घडवायच्या नाहीत. लाऊडस्पीकर हा सामाजिक विषय आहे, पण त्याला कुणी धार्मिक रंग देणार असेल तर आम्हीही त्याला धर्मानेच उत्तर देऊ.’ असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंच्या इशार्यानंतर बुधवारी राज्यात तणावसदृष्य वातावरण दिसून आले. भोंग्यावरुन सुरु असलेल्या राजकाराचे पडसाद थेट दिल्लीपर्यंत पडत आहे.
आता अचानक राजची भूमिका का बदलली ?
योगी बाबांच्या उत्तर प्रदेशात अनेक मशिदींवरील अनाधिकृत भोंगे फारसा गाजावाजा न करता उतरविण्यात आले आहे. मात्र महाराष्ट्रात या विषयावरुन गोंधळच होतांना दिसत आहे. अशा वातावरणाचा फायदा समाजकंटक घेवू शकतात, हे विसरता कामा नये. या देशाची वाटचाल धार्मिक विद्वेशामुळे आणखी एका फाळणीच्या दिशेने सुरू आहे. काही लोक धार्मिक द्वेष भावना पसरवणार्या लोकांच्या मागे फरफटत जात आहेत. काही लोक धर्माला राष्ट्रवादाशी जोडून समाजात जातीपातीच्या भिंती उभ्या करीत आहेत. धर्माला रस्त्यावर आणून तणावाची धार्मिक तणाव निर्माण करीत आहेत धर्म आणि देश याची अनावश्यक भेसळ करून लोकांची माथी भडकावत आहे. असे संवेदनशील विषय राजकारणासाठी वापरणे आणि त्यातून दोन समुदायाच्या लोकांमध्ये तेढ निर्माण करणे हे कुठे तरी थांबायला हवे राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करून हनुमान चालीसा बाबतचे जे आदेश दिले आहेत ते आता त्यांच्याच पक्षातील काही लोकांना मान्य नाहीत, असे देखील चित्र काही ठिकाणी दिसून येते. मुस्लिम समाज हा मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंच्या सोबत होता कारण राज ठाकरे यांनी मनसेची स्थपना केल्यानंतर धर्मापेक्षा स्थानिक भूमिपुत्रांच्या प्रश्नांना मर्थी माणसाच्या न्याय्य हक्काचा प्रश्नांना अधिक महत्व दिले होते आणि त्यांचे हे धोरण मुस्लिम समाजालाही पटलेले असल्याने मुस्लिम समाज राजच्या मागे उभा राहिला त्यानंतर मनसेच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे जे १३ आमदार निवडून आले ते सर्वच्या सर्व काही हिंदू मतांवर निवडून आले नव्हते सर्व जाती धर्माच्या लोकांनी त्यांना मते दिली होती असे असताना आता अचानक राजची भूमिका का बदलली आणि या बदललेल्या भूमिकेमुळे पक्षाचा फायदा होणार आहे का? मग विनाकारण राजने अशा धार्मिक मुद्द्यांमध्ये पक्षाला का अडकवले? अशी देखील भावना काहींमध्ये आहे. मुळात हा विषय अत्यंत संवेदननिशल आहे. यात राज्य सरकारची भुमिका महत्वाची आहे. मात्र सरकारकडून या विषयाला हाताळण्यासाठी कोणतीही ठोस व्ह्यूवरचना दिसून येत नाही. केवळ सत्ता व बळाच्या जोरावर हा विषय चिरडण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचे विपरित पडसाद उमटू शकतात. यासाठी राज्य सरकारने सामज्यांची भुमिका घेत हा विषय हाताळला पाहिजे शिवाय महत्वाचे म्हणजे. शक्यतो या विषयापासून खासदार संजय राऊत यांना चार हात लांब ठेवलेलेच बरे.
Post a Comment