माहेरवाशिण, शेतकर्‍यांचा सण; अक्षय्य तृतिया अर्थात आखाजी

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला, माहेरवाशिणींचा हक्काचा सण व पूर्वजांचे स्मरण करण्याची शिकवण देणार्‍या खानदेशातील महत्त्वपूर्ण मानला जाणार अक्षय्य तृतीया अर्थात आखाजीचा सण कोरोना आणि लॉकडाउनमुळे तब्बल दोन वर्षांनंतर साजारा होत आहे. खान्देशात आखाजी हा सण दीपावलीइतकाच महत्त्वाचा गणला जातो. याच दिवशी कृतयुगाचा प्रारंभ होतो, असे मानले जाते. या प्रारंभ दिवसाला पवित्र मानून धर्मकृत्ये पार पाडण्याची प्रथा आहे. आखाजीचा सण पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. यात पुरणपोळी, आंब्यांच्या रसाचे जेवण, पितरांच्या नावाने आगारी व घागर पूजना यास विशेष महत्त्व दिले जाते. अक्षय्य तृतीयेचा संबंध सासर-माहेरच्या ऋणानुबंधाशीही जोडला गेला आहे. या सणाला सासरी गेलेल्या मुली माहेरी येतात. माहेरच्या आपल्या माणसांत त्या आठ, दहा दिवस राहतात. सासरी केलेल्या श्रमाचा परीहार करतात व पुन्हा नवीन उमेद, जगण्याचं बळ घेवून सासरी जातात. यंदा दोन वर्षांनंतर हा सण मोठ्या उत्साहाने साजार होत असल्याने यंदा आखाजीचा उत्साह वेगळाच दिसून येत आहे. शहरी भागात याचे महत्व कालानुरुप कमी झाले असले तरी ग्रामीण भागात आखाजीचा उत्साह अजून कायम आहे. हा सण महिला, मुली, शेतकरी अशा सर्वच घटकांशी निगडीत असल्याने जो तो आपआपल्या परिने या सणाची तयारी करतो. खान्देशातील आखाजी हा सण आपली परंपरा आजही कायम टिकवून आहे. हा सण कामानिमित्ताने दूर दूर गेलेल्या खान्देशवासीयांना एकत्र आणणारा, स्त्रियांना स्वातंत्र्य बहाल करणारा, शेतकरी शेतमजूर आणि बलुतेदार यांचे ऋण फेडणारा, अनेक अतृप्त इच्छांना वाट करू न देणारा आहे. 



अक्षयतृतीयेच्या दिवशी सालदार ठरविण्याची प्रथा

अक्षय्य तृतियेलाच खानदेशात आखाजी म्हणून संबोधतात. जळगाव, धुळे, नंदूरबार आणि नाशिक जिल्ह्याचा काही भागात प्रामुख्याने अहिराणी बोली भाषा आहे. या अहिराणीत आखाजी विषयी अनेक गीतं आहेत. या गीतातून खान्देशातील संस्कृती, जनजनीवन, कुटूंब व्यवस्था, सासर-माहेर, नातेसंबंध यांचे असंख्य पदर उलगडून जातात. सासूरवाशिणीला माहेरचा अक्षय्य आनंद देणारी म्हणून अक्षय्य तृतिया ओळखली जाते. गौराई ही ग्रामीण भागातील देवता. पार्वतीचे दुसरं रूप म्हणजे गौराई. या गौराईची अक्षय्य तृतीयेला खानदेशात गावागावात स्थापना होते. अक्षय्यतृतीयेसाठी माहेराहून मूळ येण्याची ती वाट पाहते. प्रत्येक विवाहित स्त्री आखाजी या सणासाठी माहेरी जाते. आखाजी हा स्त्रियांसाठी पूर्ण स्वातंत्र्याचा दिवस. हसणे, झोके घेणे, गाणी गाणे या सर्व अतृप्त इच्छांच्या पूर्तीचा हा दिवस. अक्षयतृतीयेला खान्देशभर प्रत्येक ओसरीवर किंवा झाडांवर झोका बांधलेला आढळतो. मुली-बायका झोका खेळतात, त्या वेळी गाणी, कथागीते गायिली जातात. या कथागीतांतून सासरचे सुखदु:ख, व्यवहारांतील अनुभव, उपदेश, कथा आदी विषय हाताळलेले असतात. आखाजी स्त्री-पुरुष, आबालवृद्धांचा जसा मौजमजा करण्याचा दिवस आहे तसाच तो आपल्या पूर्वजांना, पितरांना श्राद्धविधी करून स्मरण्याचा दिवस आहे. श्राद्ध पूजन हे खान्देशात दोन प्रकारचे आढळते, ज्यांचे आई किंवा वडील वारले ते पहिल्या वर्षी जे श्राद्ध घालतात त्यास ‘डेरगं पूजन’ असे म्हणतात, तर ज्याच्या आप्ताच्या मृत्यूला एक वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे ते ‘घागर पूजन’ या नावाचे श्राद्धविधी पार पाडतात. अक्षयतृतीयेच्या दिवशी सालदार ठरविण्याची प्रथा आजही अनेक गावांमध्ये कायम आहे. वर्षांच्या कराराने काम करणार्‍या सालदाराचा हिशेब या दिवशी पूर्ण करून त्यास शेतकरी बंधनमुक्त करतो. सालदाराचा हा दिवस जुन्या मालकाकडील वर्षांचा शेवटचा दिवस असतो. याच दिवशी वाढीव रकमेवर शेतमजूर त्याच शेतकर्‍याकडे किंवा दुसर्‍या शेतकर्‍याकडे सालदार म्हणून करारबद्ध होत असतो. आता काळाच्या ओघात सालदारकीची प्रथा हळूहळू कमी होत असली तरी आखाजीला याचा मोठा मान असतो. काही ठिकाणी याच दिवशी सालदारकी ठरविण्याची प्रथा आजही पाळली जाते. 

परंपरा प्रत्येकाने जपलीच पाहिजे

खान्देशातील आखाजी हा सण शेतकरी, शेतमजूर, पुरुष आणि स्त्रिया यांचा जसा आहे तसा तो शेतकर्‍यांसाठी राबणार्‍या बलुतेदारांचाही आहे. या सर्व बलुतेदारांना ‘सांजर्‍या’, ‘घुण्या’ हे पदार्थ दिले जातात. वर्षभराच्या कामाची जी ठरलेली रक्कम किंवा धान्याचा हिस्सा असेल तो त्या बलुतेदाराला आखाजी या दिवशीच मिळत असते. आखाजी हा सण जुगार खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. या दिवशी सर्व मुले, माणसे पत्ते खेळतात. वर्षभर पत्त्यांना स्पर्श न करणारी मंडळी या दिवशी हमखास पत्ते खेळतात. आखाजीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक ठिकाणी पत्यांचे डाव रंगतांना दिसत आहेत. एकंदरीत आखाजीचा उत्साह यंदा सर्वत्र ओसांडून वाहतांना दिसत आहे. या दिवशी सोने खरेदी शुभ मानली जाते. यामुळे सुवर्ण बाजारपेठेतही मोठा उत्साह दिसून येत आहे. दोन वर्षांपासून आखाजीच्या शुभ मुहूर्तावर काही बंधने होती. मात्र आता परिस्थिती तशी नाही. यामुळे यंदा सर्वांनाच आखाजीची आतुरता लागली आहे. पुर्वी पारंपारिक पध्दतीने साजरी होणार्‍या आखाजीला आता नवे रुप प्राप्त झाल आहे. या सणाच्या निमित्ताने कराव्या लागणार्‍या पापड, कुरडया, सांजोर्‍या आता बाजारातून रेडीमेड आणण्याकडे कल वाढत चालला आहे. घराघरांतून पत्र्यांचे डबे गायब झाल्याने त्यांची जागा स्टीलच्या, प्लॅस्टिकच्या डब्यांनी घेतल्याने आता आखाजीनिमित्ताने डबे घासण्याचा कार्यक्रमच बाद झालेला दिसता. असे असले तरी ग्रामीण भागात आखाजीची परंपरा अजूनही सुर आहे. हे विशेष! आखाजी सारख्या सणांचे महत्व भविष्यातही कायम ठेवायचे असल्याने पुढच्या पिढीला या सणाचे महत्व समजून सांगण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या युगात जो तो व्यस्त आहे. अनेक जण पोटापाण्यासाठी घरदार सोडून लांब शहरांमध्ये राहू लागले आहेत. ही त्यांची अपरिहार्यता असली तरी आपले सण, परंपरा प्रत्येकाने जपलीच पाहिजे, एवढची माफक अपेक्षा आहे.

Post a Comment

Designed By Blogger