जळगाव जिल्ह्यासह राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आधीच खान्देशात तापमानाचा पारा ४५ अंशाच्या जवळ पोहचला आहे. अशीच परिस्थिती विदर्भ व मराठवाड्यातही आहे. एकीकडे सुर्य आग ओकत असला तरी कोल्हापूर व सांगलीमध्ये मुसळधार पावसासह गारपीटही झाली. मे महिन्यातही महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. इतका टोकाचा विरोधाभास अलीकडच्या काही वर्षांमध्ये वारंवार पहायला मिळत आहे. गत काही वर्षात दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, दरडी - हिमकडे कोसळणे यासारख्या घटना वाढत चालल्या आहे. मानवी कृत्यांमुळेच हवामानबदल, तापमानवाढ हे दुष्परिणाम घडत आहेत, यात कोणतीच शंका नाही. सध्या हवामानाचा वारंवार बदलत असलेल्या मूड मागे ग्लोबल वॉर्मिंगच मुख्य कारण आहे, हे आता पुन्हा नव्याने सांगायला नको. गेल्या दशकांत महापूर, चक्रीवादळे, उष्णतेची लाट, थंडीची लाट, अतिवृष्टीने भूस्खलन आदी नैसर्गिक आपत्ती वाढल्या आहेत. अल्पावधीत जास्त पाऊस, उन्हाळ्यात तापमान सातत्याने ४५ अंशांवर जाण्याचे प्रकार वाढले आहेत. भारतीय उपखंडात दरवर्षी सरासरी ४ चक्रीवादळे येतात. मात्र गेल्या काही वर्षांत ही संख्या वाढली आहे. हवामान बदलामुळे मान्सून व सर्व पॅटर्न बदलताहेत. परिणामी जीवित व वित्तहानी होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. हवामान बदलाची वा तापमानवाढीची ही प्रक्रिया काही नैसर्गिक नव्हे. तर त्यामागे मानवी हस्तक्षेपच कारणीभूत आहे, हेदेखील ध्यानात घेतले पाहिजे. बेसुमार वृक्षतोड करून रस्ते, पूल उभारणे, डोंगर फोडून बोगदे काढणे म्हणजेच केवळ विकास का, याचा कुठेतरी विचार होणे गरजेचे आहे.
असा आहे हवामान खात्याचा अंदाज
एप्रिलच्या सुरुवातीपासूनच राज्यात तापमानाचा पारा सरासरीच्या पुढे राहिलेला आहे. या महिन्यात खान्देश, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात काही भागांत उष्णतेच्या लाटा येऊन गेल्या. मुंबई आणि उपनगरांमध्येही एप्रिलच्या शेवटच्या टप्प्यात उष्णतेच्या लाटेची स्थिती होती. उत्तरेकडून सातत्याने उष्ण आणि कोरडे वारे वाहत आहेत. त्यातून तापमानात वाढ नोंदिवली जात आहे. बंगलाच्या उपसागरातून गेल्या तीन ते चार दिवसांपासून बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्यातून उत्तरेकडील उष्ण वार्यांचा प्रभाव काहीसा कमी झाला होता. त्यामुळे राज्यातील तापमानात काही प्रमाणात घट नोंदिवली जात होती. मात्र, आता बंगालच्या उपसागरातील वार्यांचा प्रभाव कमी होत आहे. गुरुवारी हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, विदर्भ, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि राजस्थानात पाच दिवस उष्णतेची लाट राहील. बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि तेलंगणातही लाटेची शक्यता आहे. या राज्यातील अनेक ठिकाणी दिवसाचे तापमान ४५ अंश सेल्सियसपर्यंत वाढू शकते. दरम्यान, वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात, विशेषत: विदर्भात यलो व ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सावट असून सांगली आणि सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह ३० ते ४० प्रतितास वेगाने वादळी वार्यासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
तापमानवाढ ही मानवासाठी धोक्याची घंटा
हवामान बदल व पृथ्वीच्या तापमानवाढीचा प्रश्न गुंतागुंतीचा आणि चिंताजनक होत चालला आहे. ही तापमानवाढ सर्वत्र दिसणार आहे. पृथ्वीची तापमानवाढ ही मानवासाठी धोक्याची घंटा आहे. भविष्यात ग्लोबल वार्मिंगचा प्रश्न आता आणखी जटिल होण्याची चिन्हे आहेत. हिंदी महासागराच्या प्रदेशाचे तापमान वेगाने वाढत आहे. त्याचाच अर्थ असा, की त्या भागात सागरी पातळीही वाढणार आहे. समुद्र पातळीत वारंवार वाढ होत राहिली, तर त्यातून सखल किनारपट्टी भागात पूरस्थिती निर्माण होईल. तसेच किनारपट्टीची धूपही मोठ्या प्रमाणात होऊ शकते. याशिवाय उष्णतेच्या लाटा तीत्र होणे, अतिवृष्टी, हिमनद्यांचे वितळणे यासारख्या आव्हानांशी भारतासारख्या देशाला सतत मुकाबला करावा लागेल. अतिवृष्टी व त्यातून निर्माण होणार्या पूरस्थितीचा अनुभव भारतासारख्या देशासाठी नवीन नाही. ढगफुटीसदृश पाऊस, अतिवृष्टीमुळे आलेले पूर, दरडी कोसळणे अशा घटना सध्या वारंवार घडताना पहायला मिळत आहेत. ग्लोबल वॉर्मिंगच्या विषयावर नेहमीच चिंता व्यक्त केली जाते. आता या चिंतेत अजूनच भर पडली आहे. कारण युनायटेड नेशन्स इंटर-गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजच्या (आयपीसीसी) नुकत्याच आलेल्या अहवालानुसार हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी केल्यानंतरही २०४० पर्यंत पृथ्वीचे तापमान १.५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
जैवविविधतेशी तडजोड नकोच
हवामान बदलाचा सर्वसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम होत असतो कारण, हवामानातील बदलांच्या अशा घटनांमुळे पीक वाया जाण्याची धोका अधिक असेल. याचा परिणाम आपल्या दैनंदिन गरजा, अन्न, पाणी आणि वीज यांसारख्या सुविधांवर होऊ शकतो आणि किमतींमध्ये वाढ होऊ शकते. हवामान बदलामुळे लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होईल आणि त्यांचा वैद्यकीय खर्च वाढेल. कोणत्याही देशाच्या, जगाच्या पर्यावरणासाठी तेथील निसर्गाची साखळी अबाधित राहणे आवश्यक असते. मात्र, तेथील जैवविविधतेशी तडजोड केली जात असेल, तर त्यातून ही साखळी तुटून नवनव्या संकटांना आमंत्रण मिळू शकते. याचा अनुभव आपण वारंवार घेत आहोत. त्यात वाढते औद्योगिकीकरण, कार्बन वायू उत्सर्जन, वाहनांचे प्रदूषण आदी घटक तापमानवाढीस कारणीभूत ठरताना दिसतात. त्यात नदीपात्रात केली गेलेली अवैध बांधकामे, नैसर्गिक ओढ्या-नाल्यांचे प्रवाह संकुचित करणे या गोष्टी पूरस्थितीत भर घालतात. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. विकासाची कास धरल्याशिवाय मानवी जीवन पुढे जाऊ शकत नाही, हे खरेच. परंतु, विकासाची नेमकी व्याख्या काय, हेही ठरवायला हवे. देशाच्या, जगाच्या पर्यावरणासाठी तेथील निसर्गाची साखळी अबाधित राहणे आवश्यक असते. मात्र, तेथील जैवविविधतेशी तडजोड केली जात असेल, तर त्यातून ही साखळी तुटून नवनव्या संकटांना आमंत्रण मिळू शकते, यावर आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
जागतिक हवामान अभ्यासकांचा धोक्याचा इशारा
आर्क्टिकसारखा बर्फाचा सागर वेगाने उष्ण होत आहे. दक्षिण चीन सागरही उष्ण होत आहे. तथापि, हिंदी महासागराचा पश्मिच भाग थंड होत आहे. याचे कारण ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन आहे. पूर्व आशियात मार्चच्या सुरुवातीपासून मजबूत जेट स्ट्रीम सिस्टिम आहे. यामुळे मार्च-एप्रिलचा काळ आतापर्यंतचा सर्वात उष्ण राहिला. संकटांची ही मालिका लगेच थांबणार नाही. आगामी काळात जगभर वादळ, अतिवृष्टी आणि दुष्काळाचा प्रकोप वाढेल. जमिनीवरील आणि समुद्राचे तापमान वाढल्याने जगभरात वादळ, अतिवृष्टी आणि दुष्काळाचा प्रकोप वाढेल. जमिनीचा ओलावा कमी होईल आणि सुपीक क्षमता कमी होईल. याचा थेट परिणाम अन्न सुरक्षेवर होईल. आर्क्टिक ते हिमालयापर्यंतच्या हिमनद्या वितळतील. पुराचा धोका निर्माण होईल. पाऊस न झाल्यास दुष्काळ पडेल. अन्न व जल संकट निर्माण होईल, असा इशारा हवामान तज्ञ वारंवार देत आहेत. हे बदल अत्यंत वेगाने होत आहेत. हवामानातील बदल रोखण्याशिवाय बचावाचा कोणताच मार्ग नाही. वातावरणबदलामुळे भारतात सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटा अधिकाधिक तीव्र होत आहेत. उष्णतेच्या लाटांमागे हवामान बदल हा मोठा घटक आहे. कोळसा जाळणे आणि इतर इंधन उत्सर्जनामुळे त्याचे प्रमाण वाढत आहे. जगभरात तापमानवाढीमागेही हेच कारण आहे. त्यामुळे उत्सर्जन कमी होत नाही, तोपर्यंत भारतासह इतर देशांत उष्णतेच्या लाटा अधिक उष्ण आणि धोकायदायक होत राहणार आहेत. कार्बन उत्सर्जन कमी होत नाही तोपर्यंत अधिक तीव्र उष्णतेच्या लाटा सहन कराव्या लागतील, असेही जागतिक हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे.
Post a Comment