ट्विटरच्या ‘फ्री स्पीच’मुळे स्वैराचाराची भीती!

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर म्हणजेच ३.३७ लाख कोटी रुपये मोजून ट्विटरला विकत घेतले आहे. मस्क आणि ट्विटर यांच्यामधील करार हा तंत्रज्ञान जगतातील आतापर्यंतचा तिसरा सर्वात मोठा करार असल्याने याची जगभर चर्चा होणे स्वाभाविकच आहे. या कॉर्पोरेट डीलवरुन भारतात संमिश्र प्रतिक्रीया उमटत आहे. मुळात ट्विटरचा भारताबाबतीचा आजवरचा व्यवहार तसा वादग्रस्तच राहिला आहे. मात्र आता नवा मालक येण्यामुळे सर्वकाही ऑल इज वेल होईल, असे मानने देखील चुकीचेच म्हणावे लागेल. आधी ट्विटर पब्लिक कंपनी होती. आता ती पूर्णपणे खासगी झाली असल्याने आता ट्विटर दुधारी तलवारीसारखे झाले आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. जगातील सर्वात मोठी लोकशाही व लोकसंख्येबाबत जगात दुसर्‍या क्रमाकांवर असलेल्या भारतावर ट्विटरच्या नव्या भुमिकेचा निश्‍चितपणे परिणाम जाणवेल, यात शंका नाही. इलॉन मस्क यांनी कराराची घोषणा करताना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाषण स्वातंत्र्य हा कार्यरत लोकशाहीचा आधारस्तंभ आहे आणि ट्विटर हा डिजिटल टाउन स्क्वेअर आहे जिथे मानवतेच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या बाबींवर चर्चा केली जाते. नवीन वैशिष्ट्यांसह विश्वास वाढवण्यासाठी अल्गोरिदम ओपन सोर्स बनवायचे आहे. तसेच स्पॅम बॉट्सवर मात करून सर्वांना प्रमाणीकृत करून ट्विटरला पूर्वीपेक्षा चांगले बनवायचे आहे. मात्र जगभरात रोज ५० कोटी ट्वीट नोंदवणार्‍या ट्विटरवर ‘फ्री स्पीच’चा दावा केला जात आहे. म्हणजे, प्रत्येक युजर काही लिहू शकेल याचा अधिकार दिला जाईल. मात्र यामुळे ट्रोलर्स आणि समाजकंटक प्रवृत्तींना खुल्या मंचावर शिवीगाळ व चुकीची माहिती पसरवण्याचा परवाना मिळण्याची दाट शक्यता वाटते.



एक प्रसिद्ध संशोधक, एक यशस्वी अभियंता आणि सर्वाधिक यशस्वी व्यावसायिक 

पे पाल, टेस्ला मोटर्स, स्पेसएक्स आणि सोलरसिटी या कंपन्यांची स्थापना करणारा अवलिया माणूस म्हणजे इलॉन मस्क! एकेकाळी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे असलेले इलॉन मस्क हे २०२१ साल उजाडताच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले व आतापर्यंत ते पहिल्या क्रमांकावर कायम आहेत. त्यांची एकूण संपत्ती १८५ बिलियन डॉलरहून (१३,५७९ अब्ज रुपयांपेक्षा जास्त) अधिक झाली आहे. याआधी २०१७ सालापासून अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस हे श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानी होते. मात्र, ते स्थान आता इलॉन मस्क यांच्याकडे आहे. इलॉन मस्क हे एक प्रसिद्ध संशोधक, एक यशस्वी अभियंता आणि सर्वाधिक यशस्वी व्यावसायिक देखील आहेत. इलॉन यांच्या काही प्रमुख प्रकल्पांमध्ये मंगळावर मानवी वस्ती बनवणे, शाश्‍वत उर्जेद्वारे जागतिक तापमानवाढ कमी करणे आदींचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. इलॉन मस्क यांनी मानवजातीला भविष्यकाळात कोणते प्रश्न भेडसावतील आणि ते आपण कसे दूर करू शकू, असा प्रश्न विचारला आणि त्यातून त्यांनी भविष्याला आकार देणारे उद्योग सुरू केले. पृथ्वी माणसांना पुरणार नाही, भविष्यात पृथ्वीवर एखादा ग्रह किंवा उल्कापिंड आदळू शकते, या शक्यतेने मंगळावर वस्ती उभारण्याची योजना हाती घेतली. वाहतुकीचे प्रश्न सोडवण्यासाठी हायपरलूपचा प्रकल्प हाती घेतला. ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न सोडवण्यासाठी सोलर सिटी आणि टेस्ला एनर्जी आणि टेस्ला कारची निर्मिती केली. पेट्रोल आणि डिझेल एक ना एक दिवस संपणार आहे म्हणून त्यास पर्याय म्हणून इलॉन यांनी टेस्ला ही इलेक्ट्रिक कार बनवली. ड्रायव्हर शिवाय चालणारी कार बनवण्याचा विक्रम सुद्धा इलॉन यांच्याच नावे नोंदला गेला. एकदा अवकाशात पाठविले रॉकेट पुन्हा वापरण्याचे म्हणजे रि युजेबल रॉकेटचे तंत्रज्ञान इलॉन यांनी अमेरिकेच्या नासाच्या आधी आत्मसात केले. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानात माणूस मागे पडू नये म्हणून ‘एआय’ हा स्वयंसेवी स्वरुपाचा प्रकल्प कार्यान्वित केला. २०१६ मध्ये इलॉन मस्क यांनी सुरुवात केलेल्या न्यूरालिंक कंपनीला वायरलेस कम्प्युटर मानवी मेंदूत बसवायचा आहे जो हजारो इलेक्ट्रोड्स वापरुन तयार केलेला असेल. यामुळे मेंदू संबंधित अल्झायमर्स, डिमेंशिया व स्पानल कोर्ड इजा अशा आजारांना बरे करणे सोपे होणार आहे असे त्यांचे म्हणणे आहे. न्यूरालिंकतर्फे मानवी मेंदूत चिप बसवून त्यानुसार आज्ञांची देवाणघेवाण करण्याच्या प्रयोगावर काम सुरु आहे. या प्रयोगाच्या पहिल्या टप्प्यात डुकरांच्या मेंदूत चिप बसविण्यात आली असून येणार्‍या काळात मानवी चाचण्या देखील घेण्यात येणार आहेत. 

भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अनेक गैरप्रकार!

आता जगभरात इलॉन मस्कची चर्चा होण्याचे कारण म्हणजे, ट्विटरवर आलेली त्यांची मालकी. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी सर्वप्रथम ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्ममध्ये ९.२ टक्के हिस्सा विकत घेतला आणि काही दिवसांनी त्यांनी ट्विटर बोर्डाला पत्र लिहून कंपनी १०० टक्के खरेदी करण्याची मोठी ऑफर देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. इलॉन मस्क यांनी ट्विटर ४३ अब्ज (३.२ लाख कोटी) मध्ये विकत घेण्याची ऑफर दिली होती, त्यानंतर सोमवारी उशिरा ४४ अब्ज (३.३७ लाख कोटी) मध्ये हा करार झाला. मस्क यांच्या ऑफरनुसार, त्याला ट्विटरच्या प्रत्येक शेअरसाठी ५४.२० डॉलर (रु. ४१४८) द्यावे लागणार आहेत. या डीलमुळे ट्विटरचा मुक्त पक्षी आता इलॉन मस्क यांच्या पिंजर्‍यात कैद झाल्याने त्याचे कोणते परिणाम होतात, याचे उत्तर येणार्‍या काळात मिळेलच. आजमितीला जगभरात ट्विटरचे २१.७ कोटी सक्रिय युजर्स आहेत. त्यात २.४ कोटी भारतात आहे. ट्विटरमधील ठळक बदलांबाबत बोलायचे म्हटल्यास, आधी ट्विटर पब्लिक कंपनी होती. आतापर्यंत एखादा आक्षेपार्ह कंटेंट पोस्ट केल्यास नियमानुसार तुम्हाला हटवले जाऊ शकत होते. कारण, त्यावर अनेक समभागधारक आहेत. त्यामुळे एका मुद्द्यावर वेगवेगळी मतेही येऊ शकत होती. मात्र, आता एका व्यक्तीकडे मालकी आहे. त्यामुळे मनमानीची शक्यता आहे. मस्क यांचा जिओ-पॉलिटिकल इम्पॅक्टही आहे. त्यामुळे वैचारिक मतभेद किंवा असहमतीवर कुणालाही मनमानी पद्धतीने या प्लॅटफॉर्मवरून बाहेर काढले जाऊ शकते. आधीच भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अनेक गैरप्रकार झाले आहेत. त्यात आता ट्विटरने मोकळे रान करुन दिल्यास त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.

Post a Comment

Designed By Blogger