यंदा स्वयंशिस्तीची गुढी उभारु या

हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्ता पैकी एक असलेल्या मुहूर्तावर नवीन वस्तूंच्या खरेदीसह अनेक कामांचा शुभारंभ केला जातो. गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण देशाने कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आता हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरुवात करण्यासाठी म्हणून महाराष्ट्रात गेल्या ७३६ दिवसांपासून लावण्यात आलेले कोरोनाचे निर्बंध गुढीपाडव्यापासून पूर्णपणे उठवण्यात आले आहेत. मास्कवापराची सक्तीदेखील मागे घेण्यात आली आहे. सलग दोन वर्ष नागरिकांच्या आनंदावर कोरोनाचे संकट कायम होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना निर्बंध टप्प्याटप्प्याने कमी करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली होतीच. आता उर्वरित सर्वच निर्बंधांचे आकाश मोकळे करण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या मिरवणुका, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे सर्व कार्यक्रम, मुस्लीम समाजाचा पवित्र रमजान महिना असे सर्वधर्मीय सण, उत्सव नजीक असताना हा निर्णय घेत सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सर्व प्रकारचे उत्सव आता धुमधडाक्यात साजरे करता येतील. मात्र हे करत असतांना प्रत्येकाने काळजी घेण्याची आवश्यकता आहे.



कोरोना व आर्थिक नुकसानीचे मळभ दूर

चैत्रातला गुढीपाडवा हा वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देतो. तसेच या दिवशी उत्तम आरोग्यासाठी कडुनिंबाचं महत्त्व पटवून घेणे महत्त्वाचे असते. उत्सव हे माणसाला दु:ख विसरायला लावून त्याच्या जीवनात आनंद निर्माण करतात. उत्सवाच्या निमित्ताने आप्तेष्ट, मित्रमंडळी एकत्र येतात. सुसंवाद साधला जातो. गुढीपाडव्यापासून नूतन शालिवाहन शकवर्षाचा प्रारंभ होतो. त्याबरोबरच वर्षभरातल्या सण-उत्सवांचा कालनिर्देश करणार्‍या नवीन पंचांगाचीही सुरुवात होते. हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. गोडाधोडाच्या जेवणाबरोबरच नवीन वस्तूची घरात खरेदी केली जाते. त्यामुळे पाडव्याला बाजारपेठेत लाखोंची उलाढाल होते. घरगुती वापराच्या वस्तूंपासून गाडी, सोन्या-चांदीचे दागिने खास पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी केले जातात. या खरेदीतून लाखोंची उलाढाल होते. मागील दोन वर्षे सर्व सण समारंभ कोरोना निर्बंधाच्या जोखडात अडकले होते. त्यामुळे गुढीपाडवादेखील घरगुती आणि साध्या पध्दतीनेच साजरा करण्यात आला होता. कोरोना प्रादुभाव कमी झाल्याने शासनाचे कोरोना निर्बंध हटले आहेत. त्यामुळे साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडव्याचा सण यावर्षी मोठ्या प्रमाणावर साजरा होणार आहे. कोरोना व आर्थिक नुकसानीचे मळभ दूर झाले आहे. व्यापार उद्योग सुरळीत सुरु झाल्याने बाजारपेठेतही तेजी आली असून नागरिकांमध्येही सणाचा उत्साह संचारला आहे. त्यामुळे पाडव्याच्या पार्श्वभूमीवर नवीन वास्तू, दागिने, गाडी, वस्तूंच्या बुकींगची लगबग सुरु असल्याने आर्थिक उलाढाल वाढणार आहे. गुढीपाडव्याला मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने शोभायात्रांचे आयोजन केले जाते. ते यंदा धुमधडाक्यात सुरु आहे. तीन वर्षांपूर्वी वर्षी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला. तेव्हा देशातील कोरोना विषाणूने बाधित झालेल्यांची संख्या जेमतेम पाचशेच्या घरात होती. त्यानंतर पहिली लाट, दुसरी लाट व तिसरी लाट अशा लाटांचा सामना करत कोरोनाबाधितांची संख्या चार कोटींच्या वर गेली पाच लाखांपेक्षा जास्त जणांचा यात बळी गेला. 

ही लढाई अजूनही संपलेली नाही

याकाळात देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. संपूर्ण शैक्षणिक वर्षही ऑनलाइन-ऑफलाइनच्या गोंधळात बुडून गेले. या काळाने दिलेला सर्वात मोठा धडा म्हणजे सुदृढ सार्वजनिक आरोग्य यंत्रणेची प्रकर्षाने जाणवलेली गरज. सध्या अस्तित्वात असलेल्या यंत्रणेतील त्रुटी कोरोनाच्या साथसंसर्गामुळे. ठळकपणे समोर आल्या. आता आव्हान आहे, ते या त्रुटी दूर करण्याचे. याचा शुभारंभ करण्यासाठी गुढीपाडव्यासारखा दुसरा शुभमुहूर्त नाही. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. यंदा हे वर्ष मागच्या वर्षाप्रमाणे कोरोना विषाणूच्या कहरात नसले तरी काळजी घेत व अमेरिकेसह संपूर्ण युरोपात आलेल्या चौथ्या लाटेच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गुढीपाडवा साजरा करावा लागणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेकजण नवीन वाहन खरेदी करतात किंवा घेतलेल्या नव्या घरात गृहप्रवेश करत असतात. प्रामुख्याने नव्याने घर बांधल्यानंतर त्यात गृहप्रवेशाच्या मुहूर्त गुढीपाडव्याच्या दिवशी निश्‍चित केला जातो. गत दोन वर्षांपासून कोरोनाच्या दहशतीमुळे गृहप्रवेशाच्या मुहूर्त देखील पुढे ढकलावा लागला होता. तो यंदा साधता येणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दुचाकी वाहनांसोबत सोने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळतो. काही जण नवीन उद्योग, व्यवसाय सुरू करतात. यावर्षी गत दोन वर्षांप्रमाणे कोरोनामुळे बाजारपेठेवर निर्बंध नसल्याचे बाजारपेठेत उत्साह व चैतन्य दिसून येत आहे. गत दोन वर्षात गतवर्षीही गुढी पाडवा, अक्षय तृतीयेचा मुहूर्त चुकल्याने सराफा व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले होते. वाहन विक्रेत्यांचीही हीच परिस्थिती होती. मात्र यंदा खर्‍या अर्थाने कोरोनापूर्व काळाप्रमाणे गुढीपाडव्याचा सण साजरा करता येणार आहे. मात्र हे करत असतांना यंदा गुढीपाडव्याला गुढी उभारतांना प्रत्येकाने स्वयंशिस्तीचा संकल्प करावयाचा आहे. कारण ही लढाई अजूनही संपलेली नाही. शासनाने केवळ आजची परिस्थिती पाहून सर्व निर्बंध उठविले आहेत. असे असले तरी चौथ्या लाटेचा धोका अजूनही कायम आहे. याची जणीव प्रत्येकाने ठेवली तर पुढील संभाव्य धोका टळू शकतो.

Post a Comment

Designed By Blogger