तिसरी आघाडी, एक अंधश्रद्धा!

भाजपविरोधात नवी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा सुरू केले आहेत. त्यांनी सर्व गैरभाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री विरोधी पक्षाच्या नेत्यांना पत्र लिहिले असून, भाजपविरोधात एकजुटीने लढा देण्याची गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे. या लढ्याची रणनीती ठरविण्यासाठी ममतांनी बैठकही बोलाविली आहे. मार्च महिन्यामध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतरही ममतांनी सर्व विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसला बाजूला ठेवून आघाडी उभी करण्याचा प्रयत्न केला होता. मुळातच तिसर्‍या आघाडीची आधीची कल्पना भाजप आणि काँग्रेस विरोधातील आघाडी अशी होती. परंतु ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांना ठाऊक आहे, की काँग्रेसला वगळले तर काहीच साध्य होणार नाही. कारण सध्यस्थितीत केवळ भाजप आणि काँग्रेस हेच दोन खरे राष्ट्रीय पातळीवरील पक्ष आहेत. काँग्रेसला वगळले तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससहित अनेकांच्या खासदारांची संख्या दोन आकड्यांपर्यंत पोहोचू शकणार नाही. अशा डझनभर पक्षांची मोट बांधली तरी आवश्यक दबाव निर्माण करता येऊ शकणार नाही.



तिसर्‍या आघाडीची चर्चा

केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आला असल्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वेध सर्वांनाच लागणे स्वाभाविक आहे. निवडणुकीचे वेध लागले की, अनेकांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागतात. शरद पवार, ममता बॅनर्जी, राहुल गांधी हे आजघडीचे पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणारे प्रमुख दावेदार असले, तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही नाव त्यांचे स्वयंघोषित चाणक्य संजय राऊत यांच्याकडून अधुनमधून स्पर्धेत ढकलले जाते. सध्या ममता बॅनर्जी यांचीही वाटचाल त्याच दिशेने सुरु झालेली दिसते, त्यामध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीही या शर्यतीत आपले घोडे दामटल्याचे दिसून येते. कारण काही दिवसांपूर्वी तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते चंद्रशेखर राव यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतरही लगेच तिसरी आघाडीची चर्चा सुरू झाली होती. आता ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा तिसर्‍या आघाडीची शंकनाद केला आहे. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा ठपका विरोधकांकडून सातत्याने केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी पुन्हा एकदा सर्वांना एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे. यावर काँग्रेसने प्रतिक्रिया देताना, ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही, असे सांगत टीका केली आहे. तिसर्‍या आघाडीची सर्वात मोठी अडचण म्हणजे, मुळात बहुतेक राज्यांमध्ये ज्या ठिकाणी प्रादेशिक पक्ष प्रबळ आहेत ते प्रादेशिक पक्ष काँग्रेस आणि भाजप या दोघांनाही आपला समान शत्रू मानत असल्याने भाजपविरोधी आघाडी उभी करत असताना हे प्रादेशिक पक्ष काँग्रेसला जवळ करणार की नाही, हाच महत्त्वाचा प्रश्‍न आहे. पश्‍चिम बंगालमध्ये प्रभावीपणे काम करणार्‍या तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी या भाजपाएवढाच काँग्रेसलाही आपला शत्रू मानतात. तिसर्‍या आघाडीतील संभाव्य पक्ष म्हणून तृणमूल काँग्रेस(पश्चिम बंगाल), राष्ट्रवादी काँग्रेस(महाराष्ट्र), बिजू जनता दल (ओरिसा), तेलंगणा राष्ट्र समिती (तेलंगण), तेलगु देसम (आंध्र प्रदेश), राष्ट्रीय जनता दल (बिहार), बहुजन समाज पक्ष (उत्तर प्रदेश), समाजवादी पक्ष (उत्तर प्रदेश) द्रमुक (तमिळनाडू) अशा वेगवेगळ्या पक्षांची नावे घेता येऊ शकतात. 

ही भाजपसाठी नव्हे, तर काँग्रेससाठी धोक्याची घंटा 

भाजपच्या विरोधात आणि काँग्रेसलाही वगळून आघाडी उभारण्यासंदर्भातील चर्चा सुरुवातीच्या काळात होत होती. अशावेळी मग काँग्रेसचे मित्रपक्ष असलेले राजदसारखे पक्ष आपोआपच आघाडीच्या बाहेर राहतात. राज्याराज्यांत काँग्रेसशी आघाडी होईल ते सर्व पक्ष या आघाडीत येऊ शकणार नाहीत. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बिहारमधील राष्ट्रीय जनता दल, तामिळनाडूमधील द्रमुक, झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा हे पक्ष काँग्रेसची साथ सोडून काही वेगळा विचार करतील, अशी शक्यता दिसत नाही. दुसरे म्हणजे, निवडणुकीआधीच्या आघाडीला तसे फारसे महत्त्व असत नाही. कारण एकास एक लढतीसाठी प्रयत्न करायचे कितीही ठरवले तरी काही ठिकाणी आघाडीतल्या पक्षांचे उमेदवार परस्परांच्या विरोधात लढतातच. आताही ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात सुरू केलेले तिसर्‍या आघाडीचे प्रयत्न ही भाजपसाठी नव्हे, तर काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे, असेच म्हणावे लागेल. हा प्रश्‍न अत्यंत जटील स्वरुपाचा आहे. भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व काँग्रेसकडे असायला पाहिजे, या काँग्रेसच्या आग्रहाला तार्किक आधार जरूर आहे. काँग्रेस हा देशपातळीवर अनेक राज्यांमध्ये आस्तित्व असलेला एकमेव पक्ष आहे. बाकी प्रादेशिक पक्ष एकेका राज्यांपुरते मर्यादित आहेत. परंतु नेतृत्व करायचे, तर त्यासाठीची इच्छाशक्ती काँग्रेसने दाखवायला हवी आणि नियोजनबद्ध प्रयत्न करायला हवेत. मात्र काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाबाबतचा संभ्रम अद्याप दूर झालेला नाही. ज्या पक्षाला स्वत:च्या पक्ष अध्यक्षाचा निर्णय घेता येत नाही तो पक्ष सर्वांना कसा घेवून चालेल? काँग्रेसला विरोधकांचे नेतृत्व करायचे असेल तर अधिक चांगली कामगिरी करावी लागेल. देशाच्या राजकारणात तिसरी आघाडीच चर्चा सुरु असतांना काही प्रादेशिक पक्षांचा आदर्श घेण्यासारखा आहे. ज्याप्रकारे गेले कित्येक वर्षे ओडिशामध्ये नवीन पटनाईक यांच्या नेतृत्वाखाली बिजू जनता दलाची सत्ता आहे हे याचे आदर्श उदाहरण मानावे लागते. कोणाशीही युती न करता हा पक्ष गेले कित्येक वर्षे सत्तेत राहिला आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलगू देसम पक्षानेही अशाच प्रकारे आपला प्रभाव कायम ठेवला होता आणि आता तशाच प्रकारचे काम तेलंगणमध्ये चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली तेलंगण राष्ट्र समिती हा पक्ष करत आहे. तमिळनाडूमध्ये द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांनाही फक्त आपल्या राज्यापुरताच इंटरेस्ट आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये जेवढ्या जागा त्या राज्यामध्ये आहेत तेवढ्या जागा निवडून येऊन भाजपला आव्हान देता येत नाही याची जाणीव आता बहुतेक राजकीय पक्षांना झाली आहे. यामुळे तिसरी आघाडी ही एक अधंश्रध्दाच आहे, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही!


Post a Comment

Designed By Blogger