देशातील शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी

राज्यात एकीकडे उन्हाचा पारा वाढत असतानाच दुसरीकडे मात्र, यावर्षी राज्यात यावर्षी चांगला पाऊस राहण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यात ८८० मिमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे याही वर्षी बळीराजा सुखावणार आहे. याआधी फेब्रुवारीमध्ये स्कायमेटने सामान्य मान्सूनचा अंदाज वर्तवला होता. तो कायम ठेवला आहे. ला निना आणि एल निनोचा प्रभाव मान्सूनवर पडणार नाही, असे देखील स्कायमेटने म्हटले आहे. याचाच अर्थ देशात यावर्षी दुष्काळ पडणार नाही. पीकपाणी समाधानकारक राहील. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटेल. शेती व शेतकरी हा देशाचा खर्‍या अर्थाने भक्कम कणा आहे, हे कोरोना काळात पुन्हा एकदा अधोरेखीत झाले. कोरोनाच्या भीषण काळातही हा देश तगून राहिला. अर्थकारणाला धक्के बसले; पण ते कोलमडले नाही. किमान दोन घासांची चिंता करावी लागली नाही, ती शेतकर्‍यांच्या बळावर. शेती व शेतकर्‍यांनी कोरोनाच्या संकटाच्या काळात देशाला तारले. बहुतांश उद्योग-व्यापार-व्यवसायाची वाढही शेतीवरच अवलंबून असते. शेती समृद्ध तर देश समृद्ध असतो आणि या शेतीची समृद्धी शेवटी पावसावरच अवलंबून असते. त्यामुळे मान्सूनची आनंदवार्ता देशाच्या समृद्धीची आस बाळगून असलेल्या लोकांसाठीही ही आनंदाची पेरणी करणारी आहे. स्कायमेटच्या या अंदाजामुळे केवळ बळीराजाच नव्हे तर देशातील उद्योग व व्यापारी जगातही आंनद पसरला आहे.यंदा सरासरीच्या ९८ टक्के पाऊस

कोरोना आणि लॉकडाऊनच्या दृष्टचक्रात संपूर्ण देश भरला गेला असला तरी भारताची अर्थव्यवस्था कोलमडली नाही. किंबहूना कोरोनाकाळानंतर भारतीय अर्थव्यवस्थेला प्रगतीचे पंख लाभले, असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. याच अनुषंगाने एक गोष्ट नमूद केली पाहिजे. सध्या रशिया-युक्रेन युध्दामुळे संपूर्ण युरोप होरपळत आहे. आयात-निर्यातीची साखळी विस्कळीत झाली आहे. त्याच बरोबर श्रीलंका देशात प्रचंड विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. या दोन आंतरराष्ट्रीय घटनांचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीत एक महत्वपूर्ण विधान केले आहे. ते म्हणजे, जर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (डब्लूटीओ)ने परवानगी दिली तर भारत संपूर्ण जगाची अन्यधान्याची गरज पूर्ण करेल. ही परिस्थिती निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे गव्हासह अनेक अन्यधान्याचे उत्पादन रशिया व युक्रेनमध्ये होते. मात्र आता युध्दामुळे ते जगाला अन्यधान्य पूरवू शकत नाही. यामुळे ही जागा आता भारत घेवू इच्छितो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण जगाला हे आश्‍वासन केवळ देशातील शेतकर्‍यांच्या भरवश्यावर दिले आहे. अशातच शेतकर्‍यांना आनंद देणारी बातमी म्हणजे स्कायमेटचा अंदाज. यंदा सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हा अंदाज १०० टक्के खरा ठरल्यास शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटू शकतो, अन्यथा लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. सरकारी यंत्रणेला आपली शक्ती पाणीपुरवठ्यासाठी लावावी लागते. उद्योगांसाठीही पाणीटंचाई निर्माण होऊन औद्योगिक उत्पादनांवरही त्याचा विपरीत परिणाम होणार असतो. त्याअर्थाने मान्सूनची वार्ता ही सगळ्याच घटकांसाठी महत्त्वाची असते. अगदी शेअर बाजारावरही या वार्तेचा परिणाम होऊ शकत असतो. अर्थात, वार्ता विश्वसनीय असावी लागते आणि आपल्याकडे सरकारी यंत्रणेकडून बातमीची पुष्टी केल्याशिवाय ती विश्वासार्ह वाटत नाही. स्कायमेट ही हवामानविषयक अंदाज व्यक्त करणारी खासगी संस्था आहे. यापूर्वी या संस्थेने वर्तवलेल्या अंदाजावरून बर्‍याच चर्चा झालेल्या आहेत. 

सलग चौथ्या वर्षी भारतात चांगला मान्सून राहील

स्कायमेटने आपल्या अंदाजात म्हटले आहे की, मध्यप्रदेश-उत्तरप्रदेश आणि पंजाब, हरियाणामध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. तर गुजरातमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडेल. राजस्थान आणि गुजरातसह, ईशान्येकडील नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये संपूर्ण हंगामात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे केरळ आणि कर्नाटकातही जुलै-ऑगस्टमध्ये कमी पाऊस पाडण्याचा अंदाज आहे. अंदाजानुसार, देशभरातील पावसाळ्याचा पहिला भाग उत्तरार्धापेक्षा चांगला राहील. जूनमध्ये मान्सूनची चांगली सुरुवात अपेक्षित आहे. संपूर्ण भारतात मान्सूनच्या ४ महिन्यांत सरासरी ८८०.६ मिमी पाऊस पडतो, याला दीर्घ कालावधी सरासरी म्हणतात. म्हणजेच, ८८०.६ मिमी पाऊस १०० टक्के मानला जातो. स्कायमेटने गेल्या वर्षी ९०७ मिमी पावसाचा अंदाज वर्तवला होता. यावेळी ८६२.९ मिमी इतका आकडा देण्यात आला आहे. एजन्सीचा अंदाज खरा ठरला, तर सलग चौथ्या वर्षी भारतात चांगला मान्सून राहील. भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) या सरकारी संस्थेने अद्याप यंदाच्या मान्सूनचा अंदाज जाहीर केलेला नाही. आयएमडीचा अंदाज लवकरच येईल. बंगालच्या उपसागरात मान्सूनपूर्व पावसाच्या हालचाली सुरू झाल्याने तो वेळेवर बरसण्याची शक्यता आहे. स्कायमेटने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा एकूण पावसाळ्याच्या चार महिन्यांत सरासरीएवढा पाऊस पडण्याचा अंदाज आहे, हे खरे आहे. परंतु, त्यातील रिकाम्या जागांकडे केलेला निर्देश चकवा देऊ शकतो. पुरेसा पाऊस होणे महत्त्वाचे असतेच; परंतु तो शिस्तशीर आणि शेतीसाठीच्या आवश्यकतेनुसार दमादमाने व्हावा लागतो. व्यक्त केलेल्या अंदाजात जो धोका दिसत आहे, तो त्याच पातळीवरचा आहे. पावसात मोठे खंड पडण्याच्या शक्यतेबरोबरच अचानक आणि तीव्र पावसाचीही शक्यता आहे. याचा अर्थ एखाद्या काळात पाऊस खूप काळ ओढ देऊ शकतो आणि पिके धोक्यात येऊ शकतात. त्याचबरोबर कधीतरी अचानक अतिवृष्टी होऊ शकते. त्यामुळे पिकांचे नुकसान होऊ शकतेच शिवाय महापुराचा धोकाही निर्माण होऊ शकतो. पावसाने दिलेली ओढ किंवा अतिवृष्टी या दोन्ही गोष्टी नुकसानकारक असतात; परंतु वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार कसाही पडला, तरी पाऊस भरपूर पडण्याची गरज असते. त्यामुळे जमिनीखालील पाण्याचे स्रोत भरतात आणि त्याचा दीर्घकाळ उपयोग होऊ शकतो. 

Post a Comment

Designed By Blogger