बाबासाहेबांच्यामुळे भारत देश एकसंध

भारताचे शेजारी देश पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळसह युरोपमधील अनेक देशांमध्ये अजारकता माजली आहे. अनेक देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. प्रत्येक देशात अशी परिस्थिती ओढविण्याची कारणे देखील वेगवेगळी असली तरी यांचा पाया म्हणजे त्या त्या देशातील कमकुवत लोकशाही! सर्वत्र अशी परिस्थिती असतांना भारता महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. कारण भारताची लोकशाही भक्कम पायावर उभी आहे. हा पाया बांधला आहे, घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी. स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्याय शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ व समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. बाबासाहेबांनी दाखविलेल्या दुरदृष्टीमुळेच आज आपण सर्वजण ताठमानेने जगत आहोत. मात्र त्याचवेळी आपण खरोखरच बाबासाहेबांनी दाखविलेल्या वाटेवर चालत आहोत का? याचे प्रामाणिकपणे मुल्यमापन करण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्याची सत्तरी ओलांडल्यानंतरही आज शोषित, पीडित, मागास, वंचीत, कष्टकरी समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम झालेला नाही. भारत स्वातंत्र झाल्यानंतरही अनेक योजना येऊनही कामगार व मागास घटकांना आपले जीवनमान उंचावत आले नाही. आजही देशातील कामगार व कष्टकरी वर्गासाठी राजसत्ता गरिबी हटाव ते अच्छे दिन चे स्वप्नं साकार करू शकली नाही. हि शोकांतिका आहे. 



‘शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा’

सर्वसमावेशक विचार करत भारताच्या सर्वांगीण व समतोल विकासासाठी बहुमोल योगदान देणारे एक महान पर्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय. दलित समाजाबरोबर बहुजन समाजातील कष्टकरी लोक, स्त्री उन्नती व लोकशाहीच्या हितासाठी अहोरात्र संघर्ष करून स्वातंत्र्य, समता, बंधुता प्रस्थापित करण्यास संघर्ष केला म्हणून आधुनिकभारताच्या निर्मितीचे प्रमुख राष्ट्रीय नेते होत. बाबासाहेबांकडे प्रचंड बुद्धीमत्ता होती.  समाजासाठी असीम त्याग करणारे, दलित समाजाला हक्क मिळवून देणारे, महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, मंदिर सत्याग्रह, शेतकर्‍यांचा कैवारी गोलमेज परिषद ,पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, दलित शिक्षण संस्थेची स्थापना पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महिलांसाठी कार्य, स्वातंत्र्यलढ्यात सहभाग अशा कितीतरी गोष्टी बाबासाहेबांनी  आपल्या जीवनात केल्या. समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला. शिक्षणासाठी समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. ‘शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असा गुरुमंत्र दिला. डॉ. आंबेडकर सत्याच्या मार्गाने जाणारे, भ्रष्टाचार, अनीती, जातीभेद, अत्याचार यांना विरोध करणारे आणि तळागाळातील लोकांना गुलामगिरीतून मुक्त करणारे पथदर्शक  होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड असून ती नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही अशी त्यांची धारणा होती. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी उभे आयुष्य दिन दलित, उपेक्षित, वंचित वर्गासाठी घालवले. या वर्गासाठी बाबासाहेबांनी जे कार्य केले ते तर सर्वानाच माहीत आहे पण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महिला वर्गासाठी जे कार्य केले ते खूप कमी लोकांना माहीत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे खर्‍या  अर्थाने महिलांचे उध्दारकर्ते आहेत पण दुर्दैवाने आजही देशातील अनेक महिलांना हे माहीतही नाही. बाबासाहेबांनी महिलांसाठी जे कार्य केले ते याआधी कोणीही करू शकले नाही. आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रिया या गुलामच होत्या. स्त्रियांना गुलमाचीच वागणूक मिळत होती. अगदी उच्चवर्णीय स्त्रिया देखील गुलामीचेच जीवन जगत होत्या. डॉ बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांनंतर स्त्रियांनाच उपेक्षित मानत होते. पुरुषप्रधान संस्कृती आणि मनुवादी विचारसरणीमूळे ज्या महिलांना पुरुषांच्या पायाशी स्थान होते त्या महिला आज पुरुषांच्या बरोबरीने उभ्या राहत आहेत. 

सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनसंघर्ष विसरता कामा नये

भारतीय महिला आज जो मोकळा श्वास घेत आहेत तो केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळेच घेत आहेत. यासाठी भारतीय महिलांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना प्रातः स्मरणीय आणि वंदनीय मानले पाहिजे. नोव्हेंबर १९३८  मध्ये कुटुंब नियोजना संबंधीचे विधेयक डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नांमुळेच मुंबई विधिमंडळात आले होते. त्यांनी महिलांच्या हितासाठी व कल्याणासाठी  कुटुंब नियोजनाचा मार्ग दाखवला. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे मजूर मंत्री असताना त्यांनी महिला सक्षमीकरणाचे अनेक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली. खान कामगार महिलेला प्रसूती भत्ता, कोळसा खाणीत काम करणार्‍या महिलांना पुरुषांइतकिच मजुरी, बहूपत्नीत्वला कायद्याने बंदी, मजूर व कष्टकरी महिलांना २१ दिवस किरकोळ रजा, एका महिन्याची हक्काची रजा, दुखापत झाल्यास नुकसान भरपाई आणि वैद्यकीय रजा, २० वर्ष सेवा करुन निवृत्त झाल्यावर मरेपर्यंत निवृत्तिवेतन असे महिलांसाठी अनेक क्रांतिकारक निर्णय त्यांनी मजूर मंत्री असताना घेतले. बाबासाहेबांनी १९४७ साली कायदा मंत्री असताना हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिलाचा प्रस्ताव संसदेत मांडला. हे विधेयक क्रांतिकारी होते. हिंदू वैयक्तिक कायद्यात एकाच वेळी परस्परपूरक पुरोगामी तत्वे समाविष्ट करण्याचे हे क्रांतिकारक पाऊल होते. भारत स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर घटना निर्मितीची जबाबदारी आली अतिशय सक्षमपणे संविधान तयार करून देशाला अर्पण केले. शोषितवर्ग, स्त्रीयांसाठी स्वतंत्र भारतात अनेक कायदे केले त्यामुळे सन्मानाने जीवन जगण्यात सक्षमझाले.  डॉ. बाबासाहेबांनी १९५३ साली ‘मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम, हा कायदा आणला यात कामगार भविष्य विषयक तरतुदी मांडल्या, शिवाय १३ मार्च १९५४ ला कोळसा उत्पादन आणि स्त्री खाण कामगार या दोन्ही बाबींचा विचार मांडून कामगारांचा महागाई भत्ता, नुकसान भरपाई, असमान महागाई भत्त्याला मजूर संघटना जबाबदार, बेकारीच्या काळातील नुकसान भरपाईची पद्धत, कामगाराचा राजीनामा, खाण कामगारांचे वेतन व सवलती, मजूर खात्याचा नोकरवर्ग, कोळशाच्या उत्पादनाचा प्रश्न, स्त्री खाण कामगार आणि महिला परिषद अश्या कष्टकरी वर्गाचे जीवनमान उंचवणाररे भरीव कार्य केले. आज कारखान्यातला कामगार, व कार्पोरेट जगतातील अधिकारी सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनसंघर्ष विसरता कामा नये. 

Post a Comment

Designed By Blogger