आयपीएलची जादू ओसरली!

चौकार, षटकारांची आतषबाजी, अटीतटीचे सामने, क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा, चीअर लीडर्स आदी रंगानी सजलेल्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलची क्रिकेटवेड्यांचा देश म्हणून परिचित असलेल्या भारतात प्रचंड क्रेझ आहे. आयपीएल म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी २०-२० क्रिकेटचा थरार व बीसीसीआयसाठी सोन्याचे अंड देणारी स्पर्धा म्हणून देखील ओळखली जाते. दरवर्षीला मुख्य प्रायोजकाकडून क्रिकेट मंडळाला कोट्यावधी रुपयांचीघसघशीत कमाई होती. त्याशिवाय प्रक्षेपणाचे हक्क, जाहिराती यामधून मिळणारी रक्कम वेगळीच असते. पूर्वी इंडियन प्रीमियर लीगची चाहते आतुरतेने वाट पाहत असायचे. स्टेडियम, टीव्ही, मोबाईल, सगळीकडे मॅच पाहण्याची उत्सुकता असायची. पण आयपीएलच्या २०२२ मोसमात आतापर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) मोठा झटका बसला आहे. विशेष म्हणजे हा झटका चाहत्यांनीच दिला आहे. कारण आयपीएलच्या १५ व्या सिझनला २६ मार्च पासून सुरुवात झाली. आयपीएल सुरु झाल्याच्या पहिल्या आठवड्यात टीव्ही रेटिंगमध्ये ३३ टक्क्यांनी घट नोंदवण्यात आली आहे. सलग दुसर्‍या वर्षी रेटिंगमध्ये घट झाल्याचेही आकडेवारीवरुन समोर आले आहे. केवळ टीव्ही रेटिंग नाही तर प्रेक्षकांच्या बाबतीत देखील हीच परिस्थिती आहे. यावेळी पहिल्या आठवड्यात १४ टक्के कमी म्हणजेच २२९.०६ दशलक्ष लोकांनी (सर्व चॅनेलद्वारे) सामने पाहिले. तर गेल्या वर्षी आयपीएलचे सामने २६७.७ दशलक्ष प्रेक्षकांनी सामने पाहिले होते. यामुळे आयपीएलची जादू ओसरली तर नाही ना? असा प्रश्‍न अनेकांना पडत आहे.यामुळे प्रेक्षकदेखील यापासून दूर जावू लागले 

आयपीएलच्या १५ व्या  हंगामाबद्दल असे म्हटले जात होते की, हा आतापर्यंतचा सर्वोत्तम हंगाम असेल. स्पर्धेत संघाची संख्या वाढल्याने सामन्यांची संख्या वाढली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि अधिकृत ब्रॉडकास्टर यांना संघांची संख्या वाढल्यामुळे सामने अधिक रोमांचक होतील अशी अपेक्षा होती.  तसेच ही स्पर्धा प्रेक्षकसंख्येच्या बाबतीत सर्व विक्रम मोडेल, असे मानले जात होते, मात्र तसे काही घडले नाही. गेल्या काही हंगामाच्या तुलनेत यावेळी टीव्ही रेटिंग आणि व्ह्यूअरशिपमध्ये घट झाली आहे. दरवर्षी आयपीएल सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात टीव्ही रेटिंग आणि व्ह्यूअरशिपशी संबंधित डेटा समोर येतो. त्यामुळे पुढे स्पर्धा कशी होणार हे समजणे सोपे जाते. वारंवार प्रोमो आणि जाहिराती असूनही, यावेळी रेटिंग आणि व्ह्यूअरशिपमध्ये घट झाली आहे. आयपीएल नेहमीच टीव्ही रेटिंग आणि प्रेक्षकसंख्येमध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी करत आहे. आयपीएल दरम्यान ब्रॉडकास्टर सहसा बार्क लिस्टमध्ये शीर्षस्थानी असतात, परंतु यावेळी तसे झाले नाही. स्टार स्पोर्ट्स १ हिंदी तिसर्‍या क्रमांकावर आहे. यावरून आयपीएलची जादू पहिल्या आठवड्यात दिसली नाही हे सिद्ध होते. बीएआरसीने २६ मार्च ते १ एप्रिलपर्यंतची आकडेवारी सादर केली आहे. आयपीएल २०२२ च्या मोसमात ८ सामने झाले. आकडेवारीत दिल्याप्रमाणे ८ सामन्यांमध्ये टीव्हीचे रेटिंग २.५२ आहे. मागील हंगामाशी तुलना केल्यास,आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात टीव्ही रेटिंग ३.७५ होते. अशा परिस्थितीत, यावेळी टीव्ही रेटिंगमध्ये ३३ टक्के घट झाली आहे. यापूर्वी, २०२० सीझनच्या पहिल्या आठवड्यात, टीव्ही रेटिंग ३.८५ होते. म्हणजेच सलग दुसर्‍यांदा मानांकनात घसरण झाली आहे. आयपीएलची जादू का ओसरली? यास अनेक कारणे असू शकतात. मात्र अति क्रिकेट हे सर्वात मोठे कारण असू शकते, असे तज्ञांचे मत आहे. मुळात आता क्रिकेटपटूंचे वेळापत्रक इतके व्यस्त असते की त्यांना स्वत:साठी पुरेसा वेळ मिळत नसल्याची ओरड अधूनमधून होतच असते. त्यात आयपीएलची भर पडली आहे. यामुळे प्रेक्षकदेखील यापासून दूर जावू लागले आहेत. 

बीसीसीआयने ठोस निर्णय घेणे आवश्यक 

दुसरे कारण म्हणजे स्टार खेळाडूंपेक्षा नवख्या खेळाडूंना मिळणारी अवास्तव प्रसिध्दी. तिसरे महत्वाचे कारण म्हणजे आता या स्पर्धेत थ्रील राहिला नाही, असे अनेकांना वाटते. ही सर्व पार्श्‍वभूमी पाहता आयपीएलला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी याची नव्याने आखणी करण्याची आवश्यकता आहे. अर्थात बीसीसीआय आयपीएलकडे दुर्लक्ष करणार नाही, कारण बीसीसीआयला सर्वाधिक कमाई याच स्पर्धेतून होते. मात्र आता आयपीएलच्या लोकप्रियतेला ओहटी लागण्याने बीसीसीआयची डोकंदूखी वाढली आहे. कारण बीसीसीआय लवकरच २०२३-२७ सीझनपर्यंत आयपीएलचे मीडिया हक्क विकणार आहे. या हक्कांसाठी निविदा बीसीसीआयने मागवल्या आहेत. या संपूर्ण व्यावहारात तब्बल ५० हजार कोटी मिळतील, अशी अपेक्षा बीसीसीआयला आहे. यंदा या हक्कांसाठीचा लिलाव पहिल्यांदाच ऑनलाइन स्वरूपात होणार आहे. या लिलाव प्रक्रियेला १२ जूनपासून सुरुवात होणार आहे. मात्र, यावेळी टीव्ही रेटिंग आणि व्ह्यूअरशिपमध्ये घट झाल्याने प्रक्षेपणाच्या हक्कासाठी बोली लावणारे नवीन डेटा देखील विचारात घेतील आणि त्याचा परिणाम माध्यम हक्कांच्या विक्रीवर होऊ शकतो. त्यामुळे बीसीआयचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत बीसीसीआयसाठी हा मोठा धक्का असू शकतो. आतापर्यंत डिस्ने स्टार, टीव्ही१८-व्हायकॉम (स्पोर्ट्स-१८), अ‍ॅमेझॉन, झी आणि सोनी या पाच मोठ्या गटांनी निविदांसाठी डॉक्यूमेंट खरेदी केली आहेत. आयपीएलच्या जशा काही नकारात्मक बाजू आहेत तसेच काही जमेच्या देखील आहेत. आयपीएलमधून प्रत्येक वर्षी असे काही खेळाडू पुढे येतात आणि त्यातून भारतीय क्रिकेटच्या नवी पिढीची जडणघडण होऊ लागते. देवदत्त पडीक्कल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, टी. नटराजन, रियान पराग, राहुल तेवतिया यांसारखे खेळाडू पुढे आले हेच या स्पर्धेचे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल. पडीक्कल पदार्पणातच चारशेपेक्षा जास्त धावा करणारा पहिलाच फलंदाजही ठरला. सूर्यकुमारही असाच या स्पर्धेतील कामगिरीमुळे थेट भारतीय संघाचे दार ठोठावणारा फलंदाज. टी. नटराजनही एक इंडिया मटेरियल असलेला खेळाडू. इशान किशन हे नाव तर आता सगळ्यांच्यात तोंडी येऊ लागले आहे. अफाट गुणवत्ता असलेला हा फलंदाज येत्या काळात इंडिया जर्सीमध्ये दिसला तरी नवल वाटणार नाही. राहुल तेवतिया, रियान पराग व इशान किशन यांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावर संघाला अत्यंत संकटाच्या स्थितीतही विजय मिळवून दिले आहेत. यामुळे आयपीएलच्या लोकप्रियतेला उतरती कळा लागण्याआधीच बीसीसीआयने यावर ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.

Post a Comment

Designed By Blogger