पुन्हा एकदा ‘सोशल स्ट्राईक’

तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. दुसरीकडे, द्वेषयुक्त भाषण, बनावट बातम्या, सार्वजनिक सुव्यवस्था आणि देशविरोधी कारवाया देखील या प्लॅटफॉर्मवर दिसतात. विविध ठिकाणी बसून सोशल मीडियावर मते व्यक्त करणार्‍यांवर नियंत्रण तरी कसे ठेवणार किंवा त्यांना शिस्त कशी लावणार, हा आज एक गंभीर प्रश्न बनला असतांना प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल केंद्राच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने २२ यूट्यूब आधारित न्यूज चॅनेल ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये चार पाकिस्तानची चॅनेल्स आहेत. गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये आयटी नियम, २०२१ च्या अधिसूचनेनंतर प्रथमच भारताकडून यूट्यूबवर प्रसारित करणार्‍या बातम्या प्रकाशकांवर कारवाई करण्यात आली आहे. यात २२ यूट्यूब चॅनेलसह तीन ट्विटर खाती, एक फेसबुक खाते आणि एक न्यूज वेबसाइट ब्लॉक करण्याचा आदेश जारी केला. 

इंटरनेटद्वारे भारतात दहशत पसरवण्याचा प्रयत्न

अनेक यूट्यूब चॅनेलचा वापर भारतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर इत्यादी विविध विषयांवरील खोट्या बातम्या देत होती. खोट्या पोस्ट करण्यासाठी त्याचा वापर केला गेला. त्यामुळे अशी चॅनेल्स ब्लॉक करण्याचा आदेश देण्यात आला आहे. यामध्ये पाकिस्तानकडून चालविण्यात येणार्‍या सोशल मीडिया खात्याचा समावेश आहे. यावर भारताविरोधात पोस्ट करण्यात आली होती. या विरोधात भारत सरकारने केलेली कारवाई स्वागतार्हच म्हणावी लागेल. आज सोशल मीडिया अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहेत. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपचा वापर हा जीवनावश्यक सवयींचा भाग बनत चालला आहे. सोशल मीडियामुळे स्वत:चे मत व्यक्त करण्यास किंवा त्यासंबंधी चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळते खरी; पण त्याचबरोबर सामाजिक सलोखा बिघडवणे, हिंसक कृत्य करण्यास चुकीचे वर्तन करण्यास प्रवृत्त करणे असे प्रकार घडतात, तसेच वैयक्तिक स्वार्थ जपण्याचा प्रयत्नही या माध्यमातून होताना दिसतो आहे. त्यामुळे ही समाजमाध्यमे फायद्यापेक्षा नुकसान करणारीच असल्याचा विचार प्रबळ होताना दिसतो आहे. खोट्या माहितीमुळे कधी दंगल होते तर काही वेळा एखाद्या समूहामध्ये भयाची भावना निर्माण होते. काही वेळा अनावधानाने दहशतवादाला खतपाणी घातले जाते. यामुळेच फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप, ट्विटर, यूट्यूब आणि इतर सोशल मीडियावरील फेक अकाउंट्स व फेक माहितीचा मुद्दा अधून मधून चर्चेत असतो. अनेकदा आपल्याही फोनवर अशा प्रकारची माहिती येत असते. फोटोशॉपचा उपयोग करुन बातमी, फोटो मॉर्फ केले जातात. ते खरे आहे असे भासवण्यासाठी हे केले जाते. कोणत्याही माहितीची शहानिशा न करता फेक माहिती तयार केली जाते. एखाद्याची बदनामी करण्यासाठी, प्रतिमा निर्माण करण्यासाठी किंवा मलिन करण्यासाठी, दोन धर्मांमधील तेढ वाढवण्यासाठी, आपसातले शत्रुत्त्व वाढवण्यासाठी, दिशाभूल करण्याच्या उद्देशाने अशी ‘फेकाफेकी’ केली जाते. दोन वर्षापूर्वी फेसबुकच्या वार्षिक अहवालामध्ये २५ कोटी अकाऊंट हे फेक असल्याच समोर आले होते. पूर्वी एखाद्या देशात अजाराजकता माजविण्यासाठी बंदुकांचा वापर होत असे मात्र आता हत्यार म्हणून बंदुकांऐवजी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जावू लागला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून भारतविरोधी अजेंडा चालवणार्‍यांवर सरकार आता कठोर भूमिका घेत आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे भारताला आतापर्यंत मोठी किंमत चुकवावी लागली आहे. पाकिस्तान भारतात दहशतवाद आणि अविश्‍वास पसरवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहे. अलीकडच्या काही वर्षांमध्ये भारतीय लष्कराने हजारो पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर आता पाकिस्तान इंटरनेटद्वारे भारतात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मोदी सरकारने या सोशल दहशतवादावर ‘स्ट्राईक’ करत पाकिस्तानला दणका दिला आहे. काही महिन्यांपूर्वी भारताने २ न्यूज वेबसाइट आणि ३५ युट्यूब चॅनेल ब्लॉक केले होते. 

 पाकिस्तानमधून भारतविरोधी बनावट बातम्या

आता दुसर्‍यांचा मोदी सरकारने सोशल मीडियावरील फेकाफेकीला दणका दिला आहे. या कारवाईसह, मंत्रालयाने डिसेंबर २०२१ पासून, राष्ट्रीय सुरक्षा, सार्वभौमत्व आणि भारताची अखंडता, सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्थेला धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणास्तव ७८ यूट्यूब फेक न्यूज चॅनेल आणि इतर अनेक सोशल मीडिया खाती ब्लॉक करण्याचे निर्देश जारी केले आहेत. ब्लॉक करण्यात आलेल्या यूट्यूब चॅनेलची २६० कोटींहून अधिक प्रेक्षकसंख्या होती. मंत्रालयाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ही चॅनेल्स राष्ट्रीय सुरक्षा, भारताचे परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून संवेदनशील विषयांवर सोशल मीडियावर खोट्या बातम्या आणि चुकीची माहिती जाणीवपूर्वक पसरवत होते. दरम्यान, युक्रेनमधील सध्याच्या परिस्थितीशी संबंधित भारतीय यूट्यूब चॅनेलद्वारे मोठ्या प्रमाणात खोटी सामग्री प्रकाशित केली गेली होती आणि इतर देशांसोबतचे भारताचे परराष्ट्र संबंध धोक्यात आणण्याचा उद्देश होता, असे केंद्र सरकारकडून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, ब्लॉक केलेले भारतीय यूट्यूब चॅनेल काही टीव्ही न्यूज चॅनेलचे टेम्प्लेट आणि लोगो वापरत आहेत, ज्यात त्यांच्या न्यूज अँकरच्या प्रतिमांचा समावेश आहे. जेणेकरून प्रेक्षकांची दिशाभूल व्हावी जेणेकरून बातम्यातून संभ्रण निर्माण व्हावा. तसेच खोट्या लघुप्रतिमांचा वापर करण्यात आला होता. सोशल मीडियावर खोटे वृत्त व्हायरल वाढवण्यासाठी व्हिडिओचे शीर्षक आणि लघुप्रतिमा वारंवार बदलण्यात आल्या. काही प्रकरणांमध्ये, हे देखील निदर्शनास आले की, पद्धतशीरपणे भारतविरोधी बनावट बातम्या पाकिस्तानमधून दिल्या जात आहेत. भारत सरकार एक प्रामाणिक, विश्वासार्ह आणि सुरक्षित ऑनलाइन वृत्त माध्यम वातावरण सुनिश्चित करण्यासाठी आणि भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्था यांना हानी पोहोचवण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी वचनबद्ध आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. या कारवाईमुळे अशा प्रकारांना चाप बसेल, असे म्हणणे धाडसाचे ठरु शकते मात्र या कारवाईचे स्वागतच केले पाहिजे.

Post a Comment

Designed By Blogger