उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये निवडणुकांचे सर्व टप्पे पूर्ण झाले असून पाचही राज्यांत मतमोजणी १० मार्चला होणार आहे. त्याआधी एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. त्यानुसार, उत्तर प्रदेशमध्ये भाजप पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आणि उत्तराखंडमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यात सार्वधिक लक्ष उत्तर प्रदेशकडे लागले आहे. देशाच्या राजकारणाचा म्हणजेच दिल्लीचा रस्ता उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हणतात. त्यामुळे ही निवडणूक सर्वांसाठीच महत्वाची आहे. १९८५ पासून उत्तर प्रदेशात कोणत्याही मुख्यमंत्र्यांना पुन्हा संधी मिळालेली नाही. जर योगी आदित्यनाथ हे पुन्हा मुख्यमंत्री झाले तर युपीच्या राजकारणात गेल्या ३७ वर्षांचा इतिहास बदलेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपासाठी २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने हा निकाल अत्यंत महत्वाचा आहे. कारण पाच राज्यांची ही निवडणूक आगामी लोकसभा निवडणुकीची रंगित तालिमच आहे.
पुन्हा भाजपला कौल
भाजप, समाजवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी उत्तर प्रदेशच्या सत्तेसाठी प्रयत्न केले आहेत. निवडणुकीच्या सुरुवातीला भाजपमधून अनेक बड्या नेत्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. तसेच अखिलेश यादव यांचे भाजपसमोर तगडे आव्हान आहे. त्यांनी प्रत्येक मतदारसंघ पिंजून काढला आहे. इतर लहान पक्षांचा देखील अखिलेश यांना पाठिंबा आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक कठीण होती, असे बोलले जात आहे. युपीत योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा सत्ता आणण्यासाठी चांगलाच जोर लावला आहे. अमित शाह यांच्यापासून ते पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत सर्वच नेते उत्तर प्रदेशात प्रचार करताना दिसून आले. त्याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या एक्झिट पोलमधून उत्तर प्रदेशातील जनतेने पुन्हा भाजपला कौल दिल्याचे दिसून येत आहे. यूपी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि सपा यांच्यात चुरशीची लढत झाली. एक्झिट पोल ट्रेंडमध्ये, भाजप पुन्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. तर सपा त्यांना कडवी झुंज देत आहे. दोघांमध्ये काटे की टक्कर होणार असेच एकंदरीत चित्र दिसून येत आहे. समाजवादी पक्ष दुसर्या क्रमांकावर आणि बहुजन समाज पक्ष तिसर्या क्रमांकावर आणि काँग्रेस चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र, भाजपला जागांचे मोठे नुकसान होताना दिसत असून सपा दीडशेहून अधिक जागा मिळवण्याच्या स्थितीत आहे. उत्तर प्रदेशमध्ये इंडिया टुडे-अॅक्सिसच्या सर्व्हेनुसार भाजपला २८८ ते ३२६ जागा मिळतील असा अंदाज आहे. समाजवादी पार्टीला (सपा) ७१ ते १०१ जागा मिळतील, बहुजन समाज पक्षाला (बसपा) ३ ते ९, काँग्रेसला १ ते ३ आणि इतर पक्षांना २ ते ३ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. टाईम्स नाऊच्या एक्झिट सर्व्हेनुसार, भाजपला २२५, सपाला १५१, बसपाला १४, काँग्रेसला ९ आणि इतर पक्षांना ४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इंडिया न्यूजच्या सर्व्हेनुसार, भाजपला २२२ ते २६०, सपाला १३५ ते १६५, बसपाला ४ ते ९ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. टाव्ही-९ च्या एक्झिट पोलनुसार ४०३ जागांच्या उत्तर प्रदेशात भाजपला यंदा २११ ते २२५ जागा मिळण्याचा अंदा आहे. तर सपाला १४६ ते १६० जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बसप १४ ते २४ तर तर काँग्रेसच्या खात्यात ४ ते ६ जागा येण्याची शक्यता आहे.
सर्वांना उत्सूकता
रिपब्लिक टीव्हीच्या सर्व्हेनुसार यूपीत भाजपला २६२ ते २७७ तर सपाला ११९ ते १३४ बसपला ७ ते १५ आणि काँग्रेसला ३ ते ७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. रिपब्लिक टीव्हीच्या सर्व्हेत इतर पक्षांच्या खात्यात २ ते ६ जागा देण्यात आल्या आहेत. या एक्झिट पोलनुसार, गतवेळापेक्षा यंदा भाजपाच्या काही जागा कमी होत असल्या तरी युपीत भाजपाचीच सत्ता राहिल, असा अंदाज आहे. युपीनंतर दुसरे महत्वाचे राज्य म्हणजे पंजाब. इंडिया टुडेच्या एक्झिट पोल नुसार पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला यंदा बहुमताचा आकडा मिळेल असा अंदाज आहे. इथे ११७ पैकी आपला ७६ ते ९० जागा, काँग्रेसला १९ ते ३१ तर आकाली दलाला ७ते ११ जागा मिळण्याचा अंदाज आहे. शिवाय भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाला १ ते ४ तर इतर पक्षांच्या खात्यात एक जागा जाण्याची शक्यता आहे. रिपब्लिक टीव्ही आणि पी. मार्क यांच्यानुसार आम आदमी पार्टीला ६२ ते ७० जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला २३ ते ३१ जागा मिळू शकतात. शिरोमणी अकाली दलाला १६ ते २४ जागा मिळू शकतात तर इतर पक्षांना १ ते ३ जागा मिळतील. एबीपी न्यूज सी-व्होटर यांच्यानुसार आम आदमी पार्टीला पंजाबमध्ये ५१ ते ६१ जागा मिळतील, काँग्रेसला २२ ते २८ जागा मिळतील आणि अकाली दलाला २० ते २६ जागा मिळतील असा अंदाज आहे. भाजपला १३ जागा मिळू शकतात असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. मोदी सरकारच्या तीन शेतकरी कायद्याविरोधात दिल्ली सीमेवर एक वर्षांहुन अधिक काळ यशस्वी आंदोलन करणार्या शेतकरी संघटनेचा संयुक्त समाज मोर्चाचे या निवडणुकीत खातेही उघडणार नाही. कारण शेतकर्यांनीच या संघटनेकडे पाठ फिरविली आहे. पंजाबातील शेतकर्यांच्या बहुतांश २२ संघटना राजकीय आखाड्यात उतरल्याने तेथील शेतकरी नाराज आहेत. त्यामुळे या शेतकरी मतदारांनी संयुक्त समाज मोर्चाऐवजी आम आदमी पक्षाला पसंती दिली आहे. अकाली दलाचे मताधिक्य वाढणार असून काँग्रेसला पंजाबातही नुकसान सोसावे लागेल. पंजाबच्या राजकारणात पहिल्यांदा मोठा भाऊ या भूमिकेतून निवडणुक लढवणार्या भाजपचे मताधिक्य वाढणार आहे. गोव्यात यंदा भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर दिसून येते. सर्व मोठ्या एक्झिट पोल्समध्ये कुठल्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळताना दिसत नाही. इंडिया टुडेने भाजपला १४ ते १८, सीएनएक्सने १६ ते २२, टीव्ही -९ ने १७ ते १९ तर ग्राउंड-० ने १० ते १४ जागा त्यांच्या सर्व्हेमध्ये दिल्या आहेत. तर काँग्रेसला २-ते २५ जागा मिळण्याचा अंदाज ग्राउंड-० ने व्यक्त केला आहे. काँग्रेसला इंडिया टुडे १५ ते २०, सीएनएक्स ११ ते १७, टीव्ही-९ ११ ते १३ जागा दर्शवत आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेसला बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. तर मणिपूरमध्ये भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे आता संपूर्ण देशाला १० तारखेला निकाल काय लागतो? याची सर्वांना उत्सूकता आहे.
Post a Comment