शेतकर्‍यांवर पुन्हा ‘अवकाळी’ संकट

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायच अडचणीत आला आहे. उत्पन्न वाढीच्या अनुशंगाने शेतकरी वेगवेगळे प्रयोग करतात पण निसर्गाची अवकृपा सातत्याने होत असल्याने पदरी निराशाच पडत आहे. आधीच गत दीड वर्षांपासून कोरोना आणि लॉकडाऊनच्या दृष्टचक्रात भरडला जात असलेल्या शेतकर्‍यांनी खरीप हंगामात मोठ्या उत्साहात पेरणी केली. सुरुवातील झालेल्या समाधानकारक पावसामुळे संपूर्ण शेतशिवार हिरवंगार झालं होतं. मात्र त्याला न जाणो कुणाची नजर लागली! सप्टेेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी, वादळी पाऊस व पूरामुळे कापूस, सोयाबीन, उडीद, तूर, मुग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र समाधानकारक पाऊस झाला असल्याने त्याचा फायदा रब्बी हंगामात होईल, अशी अपेक्षा ठेवून शेतकर्‍यांनी रब्बी हंगामाची जोरदार तयारी केली. आता रब्बीचे पिकं तोडणीला आले असतांना अवकाळी पावसाने शेतकर्‍यांना पुन्हा एकदा रडवलं आहे. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सोमवार व मंगळवारी उत्तर मध्य महाराष्ट्राच्या गुजरात आणि मध्य प्रदेशला लागून असलेल्या प्रदेशात गारपिटीची नोंद झाली. नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांमध्ये पावसासह गारपीटही झाल्याने शेतकर्‍यांचे पुन्हा एकदा मोठ्या प्रामणात नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे शेतकर्‍यांना फटका 

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तीन दिवस तुरळक ठिकाणी वादळी वार्‍यासह हलक्या पावसाची नोंद झाली. या कालावधीत उत्तरेकडून येणार्‍या वार्‍यांचा बंगालच्या उपसागरातून येणार्‍या बाष्पयुक्त वार्‍यांशी संगम झाला. परिणामी, गारपीट झाली असून नाशिक, जळगाव, धुळे, आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये गारपीट झाली. ढगाळ हवा आणि अवकाळी पावसामुळे कांदा, द्राक्ष, केळी, मका ही पिकं संकटात आहेत. पिकांवर रोगाचं प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे. मागील काही वर्षांपासून शेतकर्‍यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे आधीच शेतीचे अर्थचक्र मोडले आहे. त्यात अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे सलग दुसर्‍या वर्षी देखील खरीप पाठोपाठ रब्बी हंगाम देखील हातातून निसटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. गुलाब चक्रीवादळामुळे सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक जिल्ह्यातील पिके पाण्याखाली गेली असून शेतकर्‍यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. काढणीला आलेले सोयाबीन, मुग, उडीद, भुईमूग आदी पिके नामशेष झाली. तर कपाशी, मका, बाजरीची पिके आडवी झाली. अतिवृष्टीमुळे कांदा, बाजरी, मका, सोयाबीन पिकांना पावसाचा फटका बसला, तर अतिपावसाने जमिनी खरवडल्या आहेत. शेतात सोंगून ठेवलेला मका, सोयाबीन भिजले. डाळिंब बागा, कांदा, भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले. शेतकर्‍यांची मागील संकटांचे मालिकाही संपता संपत नाही. आता मार्च महिन्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे शेतकर्‍यांना फटका बसत आहे. वातावरणातील बदलाचा फटका पिकांना बसला आहे. खरिपाचे तर अतोनात नुकसान झाले होते त्या संकटातून सावरून शेतकर्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली होती परंतु पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांच्या पुढे संकट आ वासून उभी आहे. याचा फटका फळबागांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. फळबागा आता अंतिम टप्प्यात असतानाच अवकाळी पावसाने आणि बदलत्या वातावरणाने त्यांच्यावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यासोबतच आता रब्बी हंगामा वरही अवकाळी पावसाचा आणि ढगाळ वातावरणाचा परिणाम होत आहे. 

शेतकर्‍यांना पुन्हा एकदा उभे करण्याची आवश्यकता 

नाशिक जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी बागलाणसह येवला, मनमाड, पेठ येथे अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, आंबा, मिरची, टोमॅटो आदी पिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील साल्हेर, अंतापूर, जायखेडासह काही भागात गारपीट झाली. दिंडोरी तालुक्यात ओझे येथे वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे अनेक द्राक्षबागा भुईसपाट झाल्या. निफाड तालुक्यात पावसाने द्राक्षबागांसह काढणीला आलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात पाचोरा, भडगाव व चाळीसगाव तालुक्यांसह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरादार हजेरी लावली. यामुळे काढणीला आलेल्या ज्वारी व मका पिकांना मोठा फटका बसला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात काढणीला आलेल्या गहू, हरभरा पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे. त्याचबरोबर पपईची तोड थांबू शकते. धुळे जिल्ह्यात कांदा आणि मका पिकांना फटका बसला आहे. अवकाळीच्या फेर्‍यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे नाशिक आणि सांगली जिल्ह्यातील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहे. द्राक्षांवर फळकूज, मणीगळ, डाऊनी व भुरा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आता याचे व्यवस्थापन केले तरी झालेले नुकसान भरुन निघणार नाही. या अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांना नुकसान सोसावे लागत असून कांदा वाचवण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. उत्पन्न वाढीच्या अपेक्षेने लाखो रुपये खर्ची करुन शेतकरी धाडस करतात पण आता काढणीच्या दरम्यानच पिकाला मोठा फटका बसला असून शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. समाधानकारक पावसामुळे यंदा रब्बी हंगाम मोठ्या जोमात बहरेल असे चित्र होते. शिवाय मुबलक प्रमाणात पाणी असल्यामुळे शेतकर्‍यांची चिंताही मिटली होती. पण आता पावसाच्या नुकसानीचे ग्रहण शेतकर्‍यांची पाठ सोडायला तयार नाही. अवकाळीमुळे हरभरा, गहू या मुख्य पिकांवर किडीचा प्रादुर्भावर वाढणार आहे. एकामागून एक सुरु असलेली ही संकटांची मालिका केंव्हा संपेल, याचेच उत्तर शेतकर्‍यांना मिळत नाहीये. अशा संकटकाळी शेतकर्‍यांना भरघोस मदत देवून त्यांना पुन्हा एकदा उभे करण्याची आवश्यकता आहे. यासाठी सर्व पक्षांनी सोईचे राजकारण बाजूला ठेवून व मदतीत आडकाठी आणणार्‍या शासकीय नियमांना बाजूला ठेवावे लागणार आहे. आता या क्षणाला शेतकर्‍यांना मदतीचा हात मिळाला नाही तर तो संकटातून उभा राहू शकणार नाही. गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे शेती व्यवसायावर आर्थिक ताण आला आहे. शहरी बाजारपेठेलाही शेती अर्थकारणाला नख लागल्याने फटका बसला आहे. अशा संकटकाळी शेतकर्‍यांना भरघोस मदत देवून त्यांना पुन्हा एकदा उभे करण्याची आवश्यकता आहे.

Post a Comment

Designed By Blogger