युपीत भाजपाच डंका; आपने दिल्लीची सीमा ओलांडली

लोकसभा निवडणुकीची रंगित तालीम मानल्या गेलेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले असून उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा योगी सरकारवर उत्तर प्रदेशमधील जनतेने विश्‍वास दाखविला आहे. उत्तराखंड, मणिपूर व गोवामध्येही कमल फुलले आहे मात्र पंजाबमध्ये आपच्या झाडूने सर्वांना साफ करत बाजी मारली आहे. उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा भाजपची सत्ता आली आहे. मुख्यमंत्री बनल्यानंतर योगी आदित्यनाथ इतिहास रचणार असून त्यांच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद होणार आहे. उत्तर प्रदेशात सरकार स्थापन झाल्यानंतर योगी आदित्यनाथ हे पहिले मुख्यमंत्री बनतील, जे ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पुन्हा सत्तेवर येतील. उत्तर प्रदेशच्या इतिहासात आजवर असे घडलेले नाही. उत्तर प्रदेशमध्ये अनेक मुख्यमंत्री पुन्हा सत्तेत आले आहेत, पण त्यापैकी एकानेही पहिल्या ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही. उत्तर प्रदेशच्या निकालामुळे भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. दिल्लीच्या सत्तेचा रस्ता हा उत्तर प्रदेशमधून जातो, असे नेहमी म्हटले जाते. युपी जिंकल्यामुळे भाजपाला २०२४ मध्ये होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत फायदाच होणार आहे. या निवडणुकांचे विश्‍लेषण करतांना काँग्रेसबद्दल फारसे न बोललेले बरे मात्र दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे कौतूक केलेच पाहिजे. केजरीवाल यांच्या दिल्ली मॉडेलवर शिक्कामोर्तब

गेले वर्षभर शेतकरी आंदोलन आणि काँग्रेसमधल्या अतंर्गत राजकारणाने चर्चेत असलेल्या पंजाबमध्ये यावेळी मोठा सत्ता बदल पाहिला मिळाला. आम आदमी पक्षाच्या झाडुने पंजाबमध्ये सर्व पक्षांचा सफाया केला आहे. राज्यातील मतदारांनी केजरीवाल यांच्या दिल्ली मॉडेलवर शिक्कामोर्तब केले आहे. आप पंजाबमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. त्यामुळे आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान पंजाबचे नवे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आणि अकाली दल यांच्यात दुसर्‍या क्रमांकासाठी लढत आहे, पण दोन्ही मिळून आपचा एक चतुर्थांशही आकडा गाठताना दिसत नाहीत. सध्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनाही कोणताही चमत्कार दाखवता आलेला नाही. पक्षातील अंतर्गत वादाचा फटका काँग्रेसला बसताना दिसत आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित न केल्याने ते देखील कुठेतरी नाराज होते. पण पंजाबच्या जनतेने नव्या पर्यायाला मतदान केले. काँग्रेसच्या हातात असलेले हे राज्य हातातून जाण्याची अनेक कारणे आहेत. यामध्ये महत्वाचे म्हणजे क्रिकेटर आणि मूळचे भाजपवासी नवज्योतसिंह सिद्धू यांना प्रदेश अध्यक्ष बनवले आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यापुढे आव्हान उभे केले. या दोघांमधून विस्तवही जात नसल्याने अमरिंदर सिंह यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसने लगेचच चन्नी यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. अमरिंदर सिंह यांनी स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला असून भाजपसोबत युती करून निवडणुक लढवली. ऐतिहासिक शेतकरी आंदोलनातील पंजाबचा सहभाग जास्त होता. त्यामुळे भाजपवर लोकांची नाराजी सहाजिकच होती. याचा फटका भाजपला बसला. पंजाब काँग्रेसमधला अंतर्गत वादाचा फटका काँग्रेसला बसला. याचा फायदा आपला झाल्याचे दिसून येत आहे. पंजाबमध्ये आपने मिळविलेल्या एकहाती विजयानंतर जगनमोहन रेड्डी, ममता बॅनर्जी, नवीन पटनायकसारख्या नेत्यांमध्ये अरविंद केजरीवाल यांचे नाव जोडले गेले आहे. आम आदमी पक्षाने पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. आंध्र प्रदेशात जगमोहन रेड्डी यांनी काँग्रेसचा पराभव केला. ममता बॅनर्जींनीही काँग्रेसपासून फारकत घेतल्याने पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस साफ झाली. ओडिशामध्ये नवीन पटनायक यांचा एकहाती कारभार सुरू आहे. आता पंजाबही सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या हातातून निसटले आहे. सध्या काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रीया जारी आहे. नियोजित कार्यक्रमानुसार, ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात काँग्रेस कार्यकारणी राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पार पडेल. यावेळी सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारी स्वत:कडे ठेवतील का दुसर्‍या कुणाकडे देतील हे सांगणे कठीण आहे. आता गांधी कुटुंबात प्रियंका गांधी एकमेव नेता आहे ज्यांच्यावर जी-२३ सहमत होऊ शकते. राहुल गांधींच्या निर्णय क्षमतेवर याआधी प्रश्न उभे झाले आहेत. अनेक नेते राहुल गांधींच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करत आहेत. पंजाबमध्ये प्रचाराला सुरुवात केल्यानंतर राहुल गांधी अचानक परदेशी निघून गेले होते. उत्तर प्रदेशात २०० पेक्षा जास्त रॅली घेऊन प्रियंका गांधींनी योगी आदित्यनाथ यांनाही मागे टाकले. यूपीत भलेही काँग्रेसला यश मिळाले नाही. परंतु प्रियंका गांधी काँग्रेसला जुनी ओळख देण्याचा प्रयत्न करत आहेत.

भाजपाची सत्ता असणार्‍या राज्यांची संख्या १८

२०२१ मध्ये मे महिन्यात पूर्वेकडे पश्चिम बंगाल, ईशान्येकडे आसाम, दक्षिणेत तमिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुडुचेरी या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर आसाम आणि पुडुचेरीमध्ये भाजपाला सत्ता मिळाली तर इतर तीन राज्यांमधील जनतेने स्थानिक पक्षांच्या पारड्यात कौल दिल्याचे पहायला मिळाले. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला पश्चिम बंगालसारख्या महत्वाच्या राज्यात एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळेच पश्चिम बंगालमधूनही काँग्रेसचा सुपडा साफ झाला. पुडुचेरीमध्येही काँग्रेस ११ वरुन थेट २ जागांपर्यंत खाली घसरल्याचे पहायला मिळाले. पुडुचेरीमध्येही भाजपा आणि मित्र पक्षांनी सरकार स्थापनेसाठी आवश्यक असणारा बहुमताचा जादुई आकडा गाठला. मागील वर्षीची पाच आणि या वर्षीची पाच अशा दहा राज्यांमधील निवडणुकानंतर काँग्रेस आता केवळ पाच राज्यांमध्ये थेट किंवा युतीमध्ये सत्ता असणारा पक्ष झाला आहे. देशात भाजपाची सत्ता असणार्‍या राज्यांची संख्या १८ इतकीच राहणार आहे. सध्यस्थितीत भाजापाची गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये एकहाती सत्ता आहे. तर युती करुन भाजपा सत्तेत असणार्‍या राज्यांमध्ये अरुणाचल प्रदेश (जेडीयू आणि एनपीपीसोबत युती), आसाम (आसाम गण परिषदसोबत युती), बिहार (जेडीयू, हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि विकासशील इन्सान पार्टीसोबत युती), हरयाणा (जननायक जनता पार्टीसोबत युती), मणिपूर (नॅशनल पिपल्स पार्टी आणि लोकजनशक्ती पार्टीसोबत युती), मेघालय (युनायटेड डेमोक्रेटीक पार्टी, नॅशनल पिपल्स पार्टी, पिपल्स डेमोक्रेटीक फ्रण्ट, हिल स्टेट पिपल्स डेमोक्रेटीक पार्टी), मिझोरम (मिझो नॅशनल फ्रण्टसोबत युती), नागालॅण्ड (नॅशनलिस्ट डेमोक्रेटीक प्रोग्रेसिव्ह पार्टी), सिक्कीम (सिक्कीम क्रांतीकारी मोर्टा, सिक्कीम डेमोक्रॅटीक फ्रण्ट (एलए) सोबत युती), त्रिपुरा (इंडिजिनियस पिपल फ्रण्ट ऑफ त्रिपुरासोबत युती), पुडुचेरी (ऑल इंडिया एन. आर. काँग्रेससोबत युती) या राज्यांचा समावेश आहे. गोवामध्ये अजून चित्र स्पष्ट झाले नसले तरी तेथे भाजपाचीच सत्ता राहिल, असे चित्र आहे. आंध्रप्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, झारखंड, महाराष्ट्र, ओदिशा व राजस्थान या राज्यांमध्ये भाजप विरोधीपक्षात आहे. काँग्रेसची केवळ राजस्थान व छत्तीसगड या दोन राज्यांमध्ये एकहाती सत्ता आहे. तर  महाराष्ट्र (शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत युती), झारखंड (झारखंड मुक्ती मोर्चा आणि मित्र पक्षांसोबत युती) व तामिळनाडू (डीएमकेसोबत युती)मध्ये स्थानिक पक्षांना पाठिंबा देवून काँग्रेस कसाबसा सत्तेत आहे. पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओदिशा व केरळ या पाच राज्यांमध्ये भाजप किंवा काँग्रेस या दोघांचीही सत्ता नाही. गुरुवारी जाहीर झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चित्र काय असेल? याची झलक पहायला मिळाली आहे.

Post a Comment

Designed By Blogger