संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या वर्ल्ड हॅपिनेस इंडेंक्समध्ये फिनलंडला सलग पाचव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे, तर दुसर्या स्थानावर डेन्मार्कचा समावेश आहे. आइसलँड, स्वित्झर्लंड आणि नेदरलँड हे देश अनुक्रमे तिसर्या, चौथ्या व पाचव्या स्थानी आहे. आर्थिक महासत्ता अमेरिका या क्रमवारीत १६ व्या आणि ब्रिटन १७ व्या क्रमांकावर आहे. या यादीत भारत १३६ व्या क्रमांकावर आहे. गेल्या वेळी भारताचा क्रमांक १३९ वा होता. विशेष म्हणजे भारताचा शेजारी पाकिस्तान १२१ व्या स्थानावर आहे. या यादीत अफगाणिस्तान जगातील सर्वात दु:खी देश आहे. विशेष म्हणजे या अहवालानुसार भारताचा शेजारी पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी आहेत. या अहवालाचे इतके काय महत्व? असा विचार काहींच्या मनात येवू शकतो. मात्र जगातील अनेक समस्यांचे मुळ याच अहवालात दडलेले आहे. महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणारा भारत देश सर्वात आधी आनंदी होणे गरजेचे आहे.
१४६ देशांच्या यादीत भारताचा १३६ वा क्रमांक
संयुक्त राष्ट्रांच्या वतीने वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट तयार केला जातो. अहवालाचे हे अकरावे वर्ष आहे. यात लोकांच्या आनंदाचे, आर्थिक आणि सामाजिक, वैयक्तिक स्वातंत्र्य, त्यांचे स्वास्थ्य, भ्रष्टाचाराची पातळी आणि एकूण देशांतर्गत उत्पादन यानुसार विश्लेषण केले जाते. संयुक्त राष्ट्रांच्या सर्वांत आनंदी देशांच्या यादीत फिनलँडने सलग पाचव्यांदा पहिला क्रमांक पटकावला आहे. अफगाणिस्तान हा सर्वांत दु:खी देश आहे. त्याच्यापाठोपाठ लेबाननचा क्रमांक आहे. १४६ देशांच्या यादीत भारताचा १३६ वा क्रमांक आहे, तर पाकिस्तान १२१ व्या स्थानावर आहे. या यादीनुसार सर्बिया, बल्गेरिया आणि रोमानियातील स्थिती मोठी सुधारणा झाली आहे. लेबानन हा शेवटून दुसर्या स्थानावर आहे. व्हेनेझुएला आणि अफगाणिस्तानही या यादीत आहे. अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर तिथे मानवी समस्यांनी उग्र रूप धारण केले आहे. तो देश आधीपासूनच सर्वांत तळाशी आहे. गेल्या तीन वर्षांतील माहितीच्या आधाराने आनंदाची पातळी शून्य ते दहा अशी मोजली जाते. रशिया-युक्रेन युद्धापूर्वीची ही स्थिती आहे. आनंदी देशांच्या यादीत उत्तर युरोपातील देशांनी वरचे स्थान पटकावले आहे. यात फिनलँड प्रथम, डेन्मार्क दुसर्या आणि आइसलँड तिसर्या स्थानावर आहे. स्वित्झर्लंड आणि नेदरलँड अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. अमेरिकेने तीन पायर्या वर येत १६ वे स्थान पटकावले आहे. ब्रिटन १७, फ्रान्स २० व्या स्थानावर आहे. कोव्हिडपूर्व आणि कोव्हिडनंतर लोकांच्या भावनांचेही विश्लेषण यात आहेत. १८ देशांमधील लोकांमध्ये तणावात वाढ आणि दु:ख वाढल्याचे यात आढळले आहे. मात्र, राग येण्यात घट झाली आहे. लोकांच्या स्वास्थ्यासाठी सामाजिक पाठिंबा, एकमेकांप्रती औदार्याची भावना आणि सरकारमध्ये प्रामाणिकता हे महत्त्वाचे असल्याचे या अहवालात आढळते, असे मत अहवालाचे सहलेखक जेफ्री साश यांनी म्हटले आहे. जागतिक नेत्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. कोणत्याही नागरिकाच्या आनंदाचा संबंध त्याच्या मुलभुत सुविधांसह रोजगार व जीवनशैलीशी असतो. जर आपण जगातील आनंदी पहिल्या पाच देशांचा अभ्यास केल्यास फिनलँड या छोट्याशा देशाचे उदाहरण मार्गदर्शक ठरु शकते. आनंदाचे उत्स्फूर्त प्रदर्शन करण्याऐवजी या देशातील नागरिक शांतता आणि एकांत पसंत करतात. फिनलंडमधील नागरिकांची जीवनशैली उत्कृष्ट असून, सुरक्षा आणि सार्वजनिक सेवांमध्येही हा देश आघाडीवर आहे. सामाजिक विषमता आणि दारिद्र्य यांचे अस्तित्व तळाला आहे. तेथील लोकांचा स्थानिक सरकार, प्रशासन, पोलीस यांच्यावर अधिक विश्वास असतो. असाचा विश्वास भारतातही निर्माण होण्याची आवश्यकता आहे. यासाठी देशात मोठ्या प्रकल्पांऐवजी मुलभुत प्रश्न व समस्यांकडे प्राधान्यांने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
भारताची स्थिती पाकिस्तान आणि नेपाळसारखी
गेल्या काही वर्षात भारतातील एकोप्याला नजर लागली आहे. अर्थात यास अनेक कारण आहे. राजकीय वर्चस्वाची लढाई, हे त्याचे प्रमुख कारण असले तरी देशातील लहानसहान मुद्यांना वादाची हवा हेवून त्याचे रुपांतर मोठ्या समस्यांमध्ये करुन देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचे प्रमाण अलीकडच्या काही वर्षांमध्ये वाढले आहे. यात परकिय शक्तिंचा हात असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण एखाद्या देशाची प्रगतीच्या दिशेने वेगाने घोडदौड सुरु असेल तर थेट युध्द पुकारण्याऐवजी त्या देशाला देशांतर्गत समस्यांमध्ये कसे गुरफटुन ठेवता येईल, याचाही प्रभावी हत्यार म्हणून केला जातो. आंतरराष्ट्रीय पातळीवर सरोगेट लॉबिंग असे देखील म्हटले जाते. तसेच काहीसा प्रकार जेएनयूमधील आंदोलन, शाहीनबाग आंदोलन, शेतकरी आंदोलन किंवा सध्या देशात गाजत असलेला हिजाब वाद यांच्याबाबतीत दिसून येतो. यासारख्या समस्यांवर देशातील सत्ताधारी पक्षाने ताठर भूमिका न घेता व विरोधीपक्षाने त्याचे राजकारण न करता, सर्वसामान्यांचे ‘सर्वसामान्य’ प्रश्न व समस्या सोडविण्यावर भर दिला पाहिजे. या समस्यांचे निराकरण झाल्यानंतरच प्रत्येक भारतीय आनंदी जीवन जगण्यास सुरुवात करु शकेल. यासाठी काही बाबींवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आनंदी जीवनाचा संबंध तपासतांना त्याच्याशी निगडीत अन्य बाबींवर देखील लक्ष द्यावे लागणार आहे. भारतात गेल्या काही वर्षांमध्ये बेरोजगारी वाढली आहे. असमानता, सांप्रदायिक तेढ वाढत आहे. यासह स्त्रियांवरील अन्यायाचे प्रमाण, गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. उपासमार, बेरोजगारी, स्थलांतरितांचे प्रश्न, असमानता यासारख्या समस्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या सर्वांचा परिणाम प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या आनंदी राहण्यावर पडतो असतोच! एका बाजूला भारत अर्थव्यवस्थेबाबत अमेरिका, चीनसारख्या मोठ्या देशांसोबत स्पर्धा करत असला तरी आनंदी देशांच्या यादीत भारताची स्थिती पाकिस्तान आणि नेपाळसारखी आहे. गेल्या अनेक वर्षापासून भारताने यात फारशी प्रगती केलेली नाही. हे कटू जरी असले तरी सत्य आहे.
Post a Comment