रशियाने युक्रेनवर युद्ध लादताच जगभरातील भांडवली बाजार कोसळला. क्रूड ऑइलचे दर बदलू लागले. सोने-चांदीच्या व्यापारावर परिणाम होऊ लागला. तसेच या देशात उच्चशिक्षणासाठी गेलेल्या भारतीय मुला-मुलींच्या सुखरूपतेला धरून चिंता वाढली. युक्रेनमध्ये भारतातील हजारो मुले-मुली वैद्यकीय शिक्षणासाठी गेली आहेत. हे आता संपूर्ण देशाला माहित झाले आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान १५ हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना घरी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत आत्तापर्यंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसह ९०० हून अधिक भारतीय नागरिकांना एअर इंडियाच्या ५ विमानांनी भारतात आणले आहे. मात्र, हजारो भारतीय अजूनही मायदेशी परतण्याची वाट पाहत आहेत. यूक्रेनच्या अशा वातावरणात अडकलेल्या हजारो भारतीय विद्यार्थ्यांमुळे पालकांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत यूक्रेनमध्ये अडकलेल्या काही विद्यार्थ्यांना मायदेशी आणले असले तरी अजूनही बरेच विद्यार्थी त्याठिकाणी दहशतीच्या सावटाखाली जगत आहेत.
चार मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये जाणार
रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ला केला असून आता या युद्धाला पाच दिवस झाले आहेत. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव निर्माण झाला आहे. दुसर्या महायुद्धानंतर या युद्धात जगातील महत्त्वाचे देश प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हस्तक्षेप करत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. रशिया-युक्रेनमध्ये मागील चार दिवसांपासून युद्ध सुरू आहे. सोमवारी पाचव्या दिवशीदेखील युद्ध सुरूच आहे. रशियाने केलेल्या हल्ल्याला युक्रेनकडून जोरदार प्रतिकार सुरू आहे. रशियन सैन्यातील ४३०० हून अधिकजणांना प्राण गमवावे लागले असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. तर, रशियाच्या हल्ल्यात ११६ मुलांसह १६८४ नागरीक जखमी झाले असल्याचे युक्रेनने सांगितले. युक्रेनच्या युध्दभूमीवरुन भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. ऑपरेशन गंगा मोहीम अधिक जलदगतीने राबवण्यासाठी मोदी सरकारमधील चार मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये जाणार आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य शिंदे, किरण रिजिजू आणि जनरल व्ही.के.सिंह हे युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी समन्वय कार्यासाठी जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याने आता भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्याच्या मोहिमेला वेग येणार आहे. भारत सरकारचे रशियाशी घनिष्ठ संबंध असल्याने आणि युक्रेनविषयी तणाव नसल्याने भारतीय मुलांना सुखरूप आणण्याची मोहीम आखता आली. भारत सरकारने त्या मोहिमेस ‘ऑपरेशन गंगा’ असे नाव दिले आहे. या ऑपरेशनअंतर्गत २१९ विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे पहिले विमान शनिवारी रात्री मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. तेथील माहोल हा त्या सर्वांना पुनर्जन्म मिळाला, असा होता. रविवारी आणखी दोन विमाने विद्यार्थ्यांना घेऊन आली. अशी अनेक विमाने येत राहतील. युक्रेनमध्ये भारतीय विमानांना उतरता येत नाही.
बॉर्डरवर सुमारे तीन हजार विद्यार्थी अडकून
युक्रेनवरील आकाश बॉम्बफेक करणार्या रशियन विमानांनी व्यापून टाकले आहे. परिणामी, युक्रेनचे शेजारी रुमानिया किंवा पोलंडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना यावे लागत आहे. देशाची सीमा ओलांडणे हे दिव्य असते. युद्धजन्य परिस्थितीत तर महाकठीण असते. सुदैवाने रशियासह युक्रेनभोवतीच्या देशांशी भारताचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे रुमानिया किंवा पोलंडमध्ये विमाने उतरून आपल्या मुलांना घेऊन यावे लागले. भारतीय विमानांसाठी पाकिस्तानने देखील त्यांची हवाई सीमा खुली केली आहे. रशियाने पुकारलेल्या युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना पुन्हा परत आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, काही विद्यार्थी बॉर्डरवर आहेत. तर युक्रेनमधील विविध शहरांमध्येच अडकले आहेत. युक्रेनच्या बॉर्डरवर सुमारे तीन हजार विद्यार्थी अडकून पडले आहेत. अनेकांना जेवण व पिण्याचे पाणीही मिळत नाही. विद्यार्थी थांबलेल्या ठिकाणी रशियाने गोळीबार केला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच युक्रेनचे सैन्य भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने पालकांच्या काळजात धस्स झाले आहे. भारतचे रशियाशी घनिष्ठ संबंध आहेत. भारत जेंव्हा जेंव्हा अडचणीत आला तेंव्हा तेंव्हा रशिया भारताच्या बाजूने उभा राहिला आहे. परिणामी, संयुक्त राष्ट्रसंघात या युद्धाचा विषय आला तेव्हा भारताने तटस्थ राहणे पसंत केले. याचा राग युक्रेनच्या सैन्याला आहे. परिणामी ते भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण करत असावेत. रशिया-युक्रेन युध्दात भारताने तटस्थ राहण्याच्या भूमिकेवर पुढे युक्रेन कसा अर्थ घेणार यावर उभय देशांच्या संबंधांचा विचार होणार आहे. हे संबंध ताणले तर तेथे जाऊन उच्चशिक्षण घेणे सोपे राहणार नाही. मात्र, युक्रेन तशी काही कडक भूमिका घेईल, असे आता तरी वाटत नाही. अद्याप युद्ध सुरू आहे. याचा शेवट कसा होईल माहीत नाही. भारत सरकारने आखलेल्या ‘ऑपरेशन गंगा’ मोहिमेस अधिक वेग देऊन आपल्या मुला-मुलींना सुखरूप मायदेशी आणणे याला प्राधान्य दिले पाहिजे. गंगा ऑपरेशन यशस्वी होवो, हीच इश्वरचरणी प्रार्थना....!
Post a Comment