रशिया-युक्रेन युद्धामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे, त्यामुळे शेअरबाजारात गत दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चढउतार दिसून येत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झपाट्याने वाढ होत असल्याने बाजारावर दबाव आहे. याचाच परिणाम म्हणून गुरुवारी सेन्सेक्स तब्बल २७०० अंकांनी कोसळ्यामुळे गुंतवणुकदार होरपळे होते. रशिया-युक्रेनचा युध्दज्वर कमी होत नसल्याने पुढील काही दिवस शेअर बाजारात अनिश्चितता राहिल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र अपेक्षाच्या उलट शुक्रवारी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स जबरदस्त वाढीसह उघडला. सेक्सेक्स १३२८ तर निफ्टी ४१० अंकांनी उसळल्याने गुंतवणूकदारांना ८ लाख कोटी रुपयांचा फायदा झाला. रशिया-युक्रेन युध्दामुळे जगभरात निर्माण झालेली अस्थिरता, वाढलेल्या खनिज तेलाच्या किमती, जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेली अस्थिरता यामुळे भारतीय बाजार अनिश्चितेच्या लाटेवर हेलकावे खात आहे. अशा वेळेस शेअर बाजार गडगडल्यास किंवा अचानक उसळल्यास केवळ भावनांच्या जोरावर झोके घेणार्या शेअरच्या भावातील चढ-उतार पाहून कोणत्याही कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी दीर्घावधीमध्ये मिळकतीमध्ये उत्तम वाढ दर्शवू शकणार्या कंपन्यांच्या शेअरचा विचार करणे योग्य ठरू शकेल.
विश्लेषकांची ही भीती खरी तर नाही ना?
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना आणि लॉकडाऊनच्या दृष्टचक्रात संपूर्ण जग भरडले जात आहे. याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. औद्योगिक क्षेत्र तर पार कोलमडून पडले आहे. परिणामी सर्वंच देशांची अर्थव्यवस्था अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात आहे. जगभरात मंदींचे वादळ घोंगावत आहे. साधारणत: अशी परिस्थिती आली तर त्याचे विपरित परिणाम शेअर बाजारावर होतात. २००८ साली एकट्या लेहमन ब्रदर्समुळे अमेरिकेसह जगभरातील शेअर बाजार कोसळले होते. मात्र यंदा शेअर बाजाराने सर्व तज्ञ व विश्लेषकांचे अंदाज खोटे ठरवत आपली घोडदौड सुरुच ठेवली होती. शेअर बाजाराने गाठलेला हा उच्चांक म्हणजे एक कृत्रिम फुगवटा असल्याचे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. विश्लेषकांची ही भीती खरी तर नाही ना? यावर पुन्हा एकदा चर्चा सरु झाली आहे. कारण काही दिवसांपासून शेअर बाजारात सातत्याने घसरण होतांना दिसत आहे. गेल्या महिनाभरात परकीय वित्तसंस्थांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली. जानेवारी महिन्याचा विचार करता परकीय वित्तसंस्थांनी १५,५६३.७२ कोटी रुपये काढून घेतले, तर देशांतर्गत संस्थांनी ७४३०.३५ कोटी रुपये गुंतविले आहेत. त्यानंतरच्या आठवड्यात परकीय वित्तसंस्थांनी १२,६४३.६१ कोटी रुपयांचे समभाग विकले. त्याचवेळी देशांतर्गत वित्तसंस्थांनी मात्र ५०८.०४ कोटी रुपयांची भाग खरेदी केली. याचा सर्वात मोठा अध्याय गुरुवारी पहालयला मिळाला. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जगभरातील बाजारपेठांना मोठा झटका बसला आहे. या दोन देशांमधील संघर्षामुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजारातही मोठी घसरण झाली. शेअर बाजार सलग सातव्या व्यवहारी दिवशी घसरणीसह बंद झाला. केवळ गुरुवारच्या घसरणीत शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे १३.३२ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. शेअर बाजाराची घसरगुंडी अजून काही दिवस अशीच सुरु राहण्याची शक्यता असतांना शुक्रवारी सेन्सेक्स ७९२ अंकांनी वाढून ५५,३२१ वर उघडला. त्याने पहिल्या तासात ५५,७०० ची उच्च आणि ५५,२९९ ची निम्न पातळी बनवली. त्याच्या ३० शेअर्समधून २९ बढतमध्ये आहेत. घसरलेल्या स्टॉकमध्ये फक्त नेस्लेचा समावेश आहे. शुक्रवारी वाढणार्या प्रमुख शेअर्समध्ये इंडसइंड बँक ४.८६ टक्के वाढला. टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा ३ टक्के ने वाढले आहे. तर विप्रो, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस, अल्ट्राटेक, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, एचसीएल टेक, अॅक्सिस बँक, टेक महिंद्रा, एअरटेल, एनटीपीसी आणि एचडीएफसीचे स्टॉक २ ते ३ टक्के दरम्यान वाढले.
उलथापालथ केवळ शेअर बाजारापुरता मर्यादित नाही
याशिवाय टायटन, कोटक बँक, एचडीएफसी बँक, एशियन पेंट्स, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, पॉवरग्रिड, लार्सन अँड टुब्रो, सन फार्मा, हिंदुस्थान युनिलिव्हर, मारुती, नेस्ले आणि डॉ. रेड्डी यांचे शेअर्स २ टक्के पर्यंत वाढले आहेत. सेन्सेक्समधील ८७ शेअर्स अपर तर १९९ लोअर सर्किटमध्ये आहेत. याचा अर्थ त्यांच्या किमती एका दिवसात ठराविक मर्यादेपेक्षा जास्त चढ-उतार होऊ शकत नाहीत. या सर्व घडामोडी पाहता कुणालाही शेअर बाजाराचा अंदाज कुणालाही करता येत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. याचवेळी सध्या महागाई हळूहळू डोके वर काढत आहे, त्याचे एक महत्त्वाचे कारण मध्यपूर्वेतील तेलाचे उत्पादन करणार्या कंपन्यांत स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताची गरज ७० टक्के पेट्रोल व डिझेल आयात करून भागवावी लागते. भारतातील माल वाहतूक आता मोठ्या प्रमाणावर महामार्गावरून होते. रशियाने युक्रेनवर युद्ध घोषित केल्यानंतर कच्च्या तेलाची (ब्रेंट क्रूड) किंमत प्रति बॅरल १०० डॉलरच्या पुढे गेली आहे. हा त्याचा ८ वर्षांचा उच्चांक आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्याकाही दिवसांत त्याची किंमत १२० डॉलरपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल २० रुपयांपर्यंत महाग होऊ शकते. ही आर्थिक उलथापालथ केवळ शेअर बाजारापुरता मर्यादित नाही. रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यामुळे जग हादरलेले असताना हिर्यांच्या किमतीतही अचानक धक्कादायक वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात हिर्याची कॅरेटची किंमत ५२ हजारांहून थेट ७५ हजाराच्या घरात गेली. या दरवाढीमागे इंग्लंडमधील मक्तेदार कंपनीचा मोठा हात आहे. सध्या वार्षिक ७० कोटींपर्यंत असलेले हे मार्केट सतत वाढत चालले आहे. त्यामुळे हिर्यांच्या दराकडेही इथल्या बाजारपेठेचे लक्ष असते. कॅरेटमागे तब्बल ५० टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात ही वाढ असून पहिल्यांदाच इतकी वाढ झाली आहे. तर क्रिप्टोकरन्सी बाजारात देखील मोठी चढउतार पहायला मिळत आहे. ही आर्थिक अस्थिरता पाहता गुंतवणुकदारांनी तज्ञांचा योग्य सल्ला घेवूनच नियोजन करावे, ही अपेक्षा आहे.
Post a Comment