तिसर्‍या महायुध्दाची ठिणगी!

रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव आता अधिकच चिघळला आहे. गुरुवारी रशियाने युक्रेनशी युद्ध सुरू केले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. एवढेच नाही, तर युक्रेन-रशिया युद्ध आता टाळता येणार नाही, असेही पुतीन यांनी म्हटले आहे. लष्करी कारवाईची घोषणा करत पुतिन यांनी या प्रकरणात कोणीही हस्तक्षेप करू नये, अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकीही दिली. रशियाने पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला देश म्हणून मान्यता दिल्यानंतर कोणत्याही क्षणी युध्दाची ठिणगी पडेल, अशी भीती वर्तविण्यात येत होतीच. अमेरिका आणि नाटोने रशियाला रोखणार असल्याचे आश्वासन युक्रेनला वेळोवेळी दिले होते. परंतू रशियाचे सैन्य युक्रेनमध्ये घुसले, क्षेपणास्त्रे डागली, लढाऊ विमानांनी हवाई हल्ले केले. रशियाच्या युध्द खुमखुमीमुळे संपूर्ण जग विरुध्द रशिया असे चित्र निर्माण झाले आहे. हे युक्रेनवरील हल्ला म्हणजे तिसर्‍या युध्दाची सुरुवात तर नाही ना? अशी भीतीही अनेक देशांना सतावू लागली आहे.



अनेक वर्षांपासून तणाव 

रुस आणि युक्रेन यांच्या गेल्या अनेक वर्षांपासून तणाव आहे. युक्रेन हा युरोपीयन संघाशी जवळीक असलेला देश आहे, हीच जवळीक रशियाला आवडत नाही. सन १९९१ साली युक्रेनने सोवियत संघापासून स्वातंत्र्य मिळाल्याची घोषणा केली. त्यानंतर, युरोपीयन संघासोबत युक्रेनची जवळीक वाढली. युक्रेन हा अमेरिकन नेतृत्वातील सैन्य संघटना नाटोचा सदस्य बनू इच्छित आहे. मात्र, रशियाला हे पसंत नाही. त्यामुळेच, अमेरिका आणि नाटोकडून रशियाला हा शब्द हवा आहे की, युक्रेनला नाटोचा सदस्य केले जाणार नाही. मात्र, अमेरिका आणि पाश्चात्य देश रशियाच्या मतावर सहमत नाहीत. रशियाच्या सीमेनजीक नाटोच्या सैनिकांची तुकडी पोहोचू नये, अशी रशियाची इच्छा आहे. त्यातूनच, युक्रेनवर हल्ला करण्यापूर्वी रशियाने सीमारेषेवर मोठा सैन्य फौजफाटा लावला आहे. युक्रेनमुळे अमेरिका आणि नाटोचे सदस्य असलेले देश रशियाच्या सीमारेषेजवळ तळ ठोकत असल्याचं दावा रशियाने केला आहे. २०१४ मध्ये रशियाने क्रिमियावर नियंत्रण मिळवले होते. त्यानंतर, काही महिन्यांतच युक्रेनच्या डोनत्सक आणि लुहांस्क मध्ये रुस समर्थक फुटीरतावाद्यांनी या दोन्ही प्रदेशांना स्वतंत्र घोषित केले. फ्रान्स आणि जर्मनीने या प्रदेशांना स्वतंत्र घोषित करण्यासाठी युक्रेन आणि रशिया यांच्यात करारही झाला, पण वाद कायम राहिला आहे. अमेरिका-रशिया देशांत तणाव युक्रेनच्या डोनत्सक आणि लुहांस्क या प्रदेशाला व्लादीमीर पुतीन यांच्याकडून स्वतंत्र देशाच्या मान्यता देण्यात आली. मात्र, त्यानंतर जागतिक पातळीवर तणाव अधिक निर्माण झाला. सोवियत संघांपासून स्वतंत्र झाल्यानंतर अमेरिका आणि रशिया या दोन राष्ट्रांमध्ये अधिक तणाव बनला आहे. युक्रेंनवरील संकट हे अमेरिका आणि रशियातील वर्चस्वाची लढाई असल्याचेही मानले जात आहे. युक्रेनच्या राष्ट्रपतीपदावर सन २०१९ मध्ये व्लादीमीर जेलेंस्की यांची निवड झाल्यानंतर युक्रेनला नाटोमध्ये सहभागी होण्याच्या हालचाली गतीमान झाल्या. त्यामुळे, युक्रेनच्या सीमारेषेजवळ रशियन सैन्याचा जमाव होत होता, त्यावरुन अमेरिका आणि नाटोने नाराजी व्यक्त केली होती. त्यातूनच, अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर काही निर्बंधही लादले. युध्द संपविण्यासाठी युक्रेनने आता भारताकडे धाव घेतली आहे. 

तिसर्‍या महायुध्दाला तोंड देखील फुटू शकते

भारतातील युक्रेनचे राजदूत डॉ. इग़र पोलिखा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच आता हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. आमच्या देशात हल्ले सुरु झाले आहेत. सीमाभागात युक्रेनच्या चेकपोस्टवर रशिया हल्ले करत आहे. काही हल्ले अगदी राजधानीपर्यंत झाले आहेत. सकाळी पाच वाजता हे हल्ले सुरु झाले. आमच्या सैन्याच्या ठिकाण्यांवर हल्ले झाले आहेत. आम्ही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी शेवटपर्यंत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतू सारे फोल ठरल्याचे पोलिखा यांनी म्हटले. याबाबत भारतातील रशियाचे राजदूत रोमन बाबुश्किन यांनी सांगितले की, जागतिक शक्तीच्या रुपाने भारत एक महत्त्वाची भूमिका निभावत आहे. सध्याच्या तणावाचा भारत आणि रशिया यांच्या संबंधांवर काही परिणाम होणार नाही. पुढील महिन्यात होणार्‍या डिफेन्स एक्स्पोमध्ये रशियाची मोठी भागीदारी आहे. त्याचसोबत भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत जी भूमिका घेतली त्याचेही रशियाने स्वागत केले आहे. भारत आणि रशिया यांच्यातील ड-४०० मिसाइल डिफेन्स सिस्टम खरेदी करण्याचा व्यवहार झाला आहे. त्याची डिलिवरीही सुरु झाली आहे. मात्र पाश्चिमात्य देशांनी लावलेल्या निर्बंधाचा यावर परिणाम होईल का? त्यावर रशियाने थेट उत्तर दिले नसले तरी हा व्यवहार यापुढेही सुरु राहील असे उत्तर दिले आहे. आम्ही सुरक्षेसह सर्व मुद्द्यांवर पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांचा नकारात्मक परिणाम कितपत होईल त्यावर लक्ष ठेवून आहोत. परंतु भारताचा मुद्दा येतो तिथं आमच्याशी त्यांचे मजबूत आणि विश्वासू संबंध आहेत. आम्ही भारतासोबत नेहमी मित्र म्हणून काम करतो. आमचे प्लॅन मोठे आहेत. आमची भागीदारी अशीच सुरु राहील अशी अपेक्षा आहे असे रशियाने म्हटले आहे. असे असले तरी रशिया-युक्रेन युध्दाचा फटका भारतिय अर्थव्यवस्थेला बसू शकतो. गुरुवारी युध्दाची ठिगणी पडताच भारतिय शेअर मार्केट कोसळले. यात लाखों गुंतवणूकदार होरपळले. या युध्दामुळे पेट्रोल-डीझेलसह गॅसच्या किमती देखील वाढू शकतात. या युध्दाचा परिणाम केवळ भारतावरच नव्हे तर संपूर्ण जगावरच होण्याची दाट शक्यता आहे. या वादावर वेळीच तोडगा न निघाल्यास तिसर्‍या महायुध्दाला तोंड देखील फुटू शकते.

Post a Comment

Designed By Blogger