राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून, पॉझिटिव्हिटी दर कमी होत असल्याने एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने कोरोनाबाबत जिल्हावार आढावा घेऊन बिगिन अगेनचा नारा दिला आहे. एप्रिल आणि मे महिन्यास संपूर्ण देशात धुमाकूळ घालणारी, कोट्यवधी जणांना बाधित करणारी आणि लाखो जणांचा बळी घेणारी कोरोना विषाणूची दुसरी लाट व डिसेंबर-जानेवारी दरम्यान ओमियोक्रॉनने पसरवलेली दहशत आता संपण्यात जमा आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस समोर आलेल्या कोरोनाच्या आकडेवारीमुळे संपूर्ण देशाला दिलासा मिळण्याची शक्यता दिसू लागली आहे. तिसरी लाट जवळजवळ संपुष्टात आल्याचे चित्र असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लावण्यात आलेले निर्बंध शिथील होणार असल्याचे संकेत मिळत असतानाच, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे असतील, असे संकेत आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांत सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. या पार्श्वभूमीवर मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत ही लाट ओसरेल असा अंदाज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. तसेच राज्यात इतक्यात मास्कमुक्ती होणार नाही असेही टोपे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
तर चौथी लाट आल्याशिवाय राहणार नाही
कोरोनाच्या दुसर्या लाटेनंतर कोरोनाचे म्यूटेशन न झाल्याने नवा व्हेरिएंटही आला नव्हता. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले जात होते. दरम्यान काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची झपाट्याने कमी होत असल्यामुळे दिवाळीपूर्वी राज्य सरकारकडून कोरोनाचे एक-एक निर्बंध शिथिल करण्यात आले. शाळा-महाविद्यालये, धार्मिक स्थळे, रेस्टॉरंट, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मुंबई लोकल, आता रेल्वेसेवा देखील पुर्ववत होण्याच्या मार्गावर आल्यामुळे देशात कोरोनापूर्व काळातील स्थिती झाली झाली होती. मात्र त्यातह ओमिक्रॉन नावाच्या नव्या व्हेरिअंटने डोकं वर काढलंच! हा व्हेरिअंट कितीतरी पटीने पसरत असल्याने देशात पुन्हा एकदा बंधने लादण्यास सुरुवात झाली. अगदी महिनाभरात कोरोना बाधितांची संख्या दुप्पट-तिप्पटीने वाढली. सुदैवाची बाब म्हणजे हा व्हेरि अंट डेल्टाप्रमाणे घातक नसल्याने आरोग्य यंत्रणेवर जास्त त्राण आला नाही. आता तिसरी लाट ओसरत आल्यामुळे हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बर्याच बाबतीत निर्बंध शिथिल होत असल्याने राज्यातील कोरोनाची लाट ोसरल्यासारखे आशादायक चित्र जरी दिसत असले, तरी अजूनही धोका टळलेला नाही. पहिली लाट व दुसरी लाट ओसरत असतांना लोकांनी मुक्त वातावरणात आपली कामे करण्यास सुरुवात केली. लोक काहींसे निर्धास्त झाल्यासारखे वागत होते. त्यांना मास्क वापरणे नकोसे वाटू लागले होते. कोरोनाच्या दोन्ही लाटा ओसरत असतांना जी चूक झाली तीच चूक आता पुन्हा व्हायला नको. मी लस घेतली आहे, आता मला कोरोनाची काय भीती? अशा आविर्भावात वावरणे निश्चितपणे धोकादायक आहे. देशात विक्रमी वेगाने लसीकरण होतेय, ही जमेची बाजू आहे. यामुळे कोरोनाविरुध्दच्या लढाईत मोठे यश मिळतांना दिसत असले तरी कोरोनाचा लढा अजून संपलेला नाही. ही लढाई दीर्घकालीन निश्चितच आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. महाराष्ट्रात खरोखरच कोरानाचा आलेख खाली येत आहेत हे निश्चितच चांगले संकेत असून रुग्णसंख्या घटविण्यासाठी या स्थितीत जिल्हा आणि राज्य पातळीवर सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. आताही आपण गाफिल राहिलो तर पुन्हा म्यूटेशनमुळे कोरोनाची चौथी लाट आल्याशिवाय राहणार नाही.
जगावर लवकरच आणखी एका महामारीचं संकट?
याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही भुमिका स्पष्ट केली आहे. कोरोना अजून संपलेला नाही. मास्क कधी काढणार, मास्कमुक्ती कधी होणार, हा प्रश्न सातत्याने विचारला जातो. पण मास्कमुक्ती नेमकी कधी होणार, याबद्दल आताच खात्रीने काहीही सांगता येत नाही. आता आपल्याला हा जो काळ मिळाला आहे, तो लसीकरण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच साथ शिखरावर असतांना लसीकरण करणे, कितपत योग्य आहे, याबद्दल डॉक्टर सांगतील. परंतु आता लाट कमी होत असतांना लसीकरण वाढवणे गरजेचे आहे. लसीकरणानंतरही करोनाची लागण होते. पण त्याची घातकता नक्कीच कमी होते. जीव वाचवण्यासाठी सुरक्षा कवच म्हणून लस महत्वाची आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, आज लगेचच महाराष्ट्र आणि देशात मास्कमुक्ती केली पाहिजे असं अजिबात नाहीये. पण यूके ने या संदर्भातील निर्णय का घेतला? त्याच्यामागचं शास्त्र काय आहे? पाश्चिमात्य देशांनी मास्क फ्री केल आहे. हे का आहे याचा अभ्यास करण्याची गरज आहे. या संदर्भातील सर्व माहिती आपण संकलित करत आहोत. इतक्या मोठ्या लोकशाही असलेल्या देशात तात्काळ मास्कमुक्ती करुन कुठलंही संकट ओढवायचं नाहीये. त्यामुळे तुर्तास मास्कमुक्ती शक्य नाहीये मात्र, निर्बंध शिथिल केले जातील. सिनेमागृह, नाट्यगृह यांच्यातील ५० टक्के क्षमतेचे निर्बंध शिथिल करण्याची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याचा पहिला टप्पा म्हणून लोकलमधून प्रवास करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक असल्याच्या निर्णयावर राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लोकल प्रवासासाठी दोन्ही डोस बंधनकारक करणारे परिपत्रक आणि एसओपी मागे घेण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचे सरकारकडून मुंबई हायकोर्टात सांगण्यात आले. त्यामुळे लवकरच आता सर्वांना लोकलप्रवास खुला होणार आहे. एका बाजूला हे एक सकारात्मक चित्र असले तरी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी जगावर लवकरच आणखी एका महामारीचं संकट येईल असा इशारा दिला आहे. गेट्स यांनी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत वेगळ्या संसर्गामुळे ही महामारी येईल असं सांगताना कोरोनाशी काही संबंध नसेल असंही म्हटलं आहे. याला एक सुचना म्हणून सगळ्यांनीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
Post a Comment