महाराजांना डोक्यावर नको तर डोक्यात घ्या

शिवरायांचे आठवावे रूप ।

शिवरायांचा आठवावा प्रताप। 

शिवरायांचा आठवावा साक्षेप।

भूमंडळी।

समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महारांजाचे सार्थ वर्णन केले आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले, रयतेच्या सुखासाठी त्यांनी जिवाचे राने केले. आपल्या निवडक मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी शत्रूशी दोन हात केले. आठरापगड जातीच्या लोकांना एकत्र करून समतेची बीजे रोवत एका आदर्श स्वराज्याची निर्मिती केली. महाराष्ट्राचा हा ‘जाणता राजा पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्त्रोत राहिला. महाराजांनी अखंड हिंदुस्थानात स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवून मराठी मनात स्वाभिमान व राष्ट्राभिमान जागृत केला. छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती ही मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहेच. पण आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे आणि जागतिक दर्जाचे योद्धे म्हणूनही शिवरायांची ओळख आहे. यातील आणखी एक विशेष म्हणजे शिवाजी महाराज ज्यांच्याशी लढले त्यांनीही महाराजांचे श्रेष्ठत्व मान्य केले होते. त्यांच्यातील नेता, धुरंधर सेनानी, जाणता राजा ही आणि अशा असंख्य गुणांची ओळख समाजाला पदोपदी होत होती. महाराजांचा काळ लोटून इतकी वर्षं झाली तरीही त्यांचे इतिहासातील स्थान आणि मान याला जराही धक्का लागू शकत नाही. आज सर्वत्र शिवजयंतीचा उत्सव साजरा केला जात आहे. महाराजांप्रती आदर व प्रेमाचे हे प्रतिकच म्हणावे लागेल. मात्र केवळ एक दिवस शिवजयंतीचा उत्साह काही कामाचा नाही, महाराजांचे विचार प्रत्येकाने अंगिकारणे गरजेचे आहे. तेंव्हाच महाराजांना अभिप्रेत असलेली शिवशाही खर्‍या अर्थाने अवतरेल.संघर्ष करून स्वराज्य स्थापन केले

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्राला ओळख आहे. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांचे राजकारण महाराजांचे नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. मात्र महाराजांनी दाखविलेल्या मार्गावरुन चालण्यापेक्षा आपण त्यांची जयंती तारखेला साजरी करावी का तिथीला साजरी करावी? यावरुन वाद घालतो. मागच्या शिवसेना-भाजपच्या सरकारच्या काळातही शिवसेना तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावर आग्रही होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवसेनेचे मंत्री आणि नेत्यांकडून तशी मागणीही करण्यात आली होती. मात्र शासनाने शासकीय शिवजयंती साजरी केली तरी शिवसेना तिथीनुसारच शिवजयंती साजरी करते. आता मात्र शिवसेनेच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारतर्फे शिवजयंती साजरी होणार आहे. तसे पाहिल्यास या दुर्देवी वादाचा तिढा सोडविण्याची संधी सेनेकडे चालून आली होती. आज सर्वांनी मिळून एकत्रित शिवजयंती उत्सव साजरा केला असता तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यातून खूप मोठा संदेश गेला असता. मात्र येथेही सोईस्कर राजकरण आडवे आले, याला दुर्देव्यच म्हणावे लागले. छत्रपतींच्या नावाने सर्वच पक्ष मते मागतात पण त्यांचा वारसा जपला जातोय का? याचा प्रामाणिक विचार करण्याची आवश्यकता आहे. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमवेत लाखों मावळे लढले, अनेकांनी प्राणाची आहुती देत कित्येक आक्रमणे परतवून लावली आणि स्वराज्यासाठी मोठे योगदान दिले. छत्रपती शिवरायांनी विजापूरच्या आदिलशाही आणि मुघल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून स्वराज्य स्थापन केले. या समृद्ध इतिहासाची साक्ष म्हणजेच हे गड-किल्ले. 

गडकिल्ल्यांच्या पावित्र्याचे जपणे आवश्यक

महाराष्ट्रात जवळपास ३५०हून अधिक किल्ल्यांची नोंद आहे. सर्वाधिक गड-किल्ले रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांत असून रायगड जिल्ह्याचा यात तिसरा क्रमांक लागतो. नाशिकही गड-किल्ल्यांच्या संख्येत चौथ्या क्रमांकावर असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत गड-किल्ले आहेत. सह्याद्रीच्या कुशीत वास्तव्यास असलेल्या घनदाट जंगलांची निसर्गसंपत्ती महाराष्ट्राला लाभलेली आहे. या डोंगर रांगांतील किल्ले, त्यांचे देखणे रूप, मजबूत तटबंधी शिवकालीन इतिहास आपणासमोर आजही बोलका करतात. स्वराज्य उभे राहण्यात या गड किल्ल्यांचा सिंहाचा वाटा आहे. आपला इतिहास आपण अभिमानाने मिरवतो, शिवजयंती, शिवराज्याभिशेक दिनी मराठ्यांच्या शौर्याचे आपण गुणगाण गातो, पण प्रत्यक्षात या ऐतिहासिक ठेव्याबाबत आपण असंवेदनशील व बेजबाबदारपणे वागतो. याचा विचार कुणीच करत नाही. राज्यातील अनेक गडकिल्ल्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. बहुतांश गड-किल्ल्यांत ढासळलेल्या भितींवर कोरलेली नावे व खुणा, कचर्‍याचे ढीग आढळतात. इतिहासाची साक्ष देणार्‍या गडकिल्ल्यांच्या पावित्र्याचे जपणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचा हा समृद्ध वारसा एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जात असताना, त्याला गालबोट लागू नये. शेकडो वर्षांपूर्वी बांधलेल्या व पुढील अनेक वर्षे हा ऐतिहासिक वारसा टिकून राहील याची खात्री असलेल्या या पुरातन वास्तूंचे वैभव जास्तीत जास्त काळ टिकवून ठेवण्याची आपणा सर्वाची जबाबदारी आहे. परदेशात अशा ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन संवेदनशीलतेने जोपासण्याची परंपरा आहे. किंबहुना राजस्थानमध्ये अनेक गड किल्ल्यांचे योग्य पध्दतीने संवर्धन केले जात असल्याने ते आजही सुस्थिती दिसून येतात. गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन हे खरे पाहता खर्चिक काम तसेच त्याची जबाबदारी सरकारची आहे पण कचरा न टाकणे, किल्ल्यांवर नावं न कोरणे, साफसफाई करणे, झाडे लावणे, ऐतिहासिक महत्त्व सांगणार्‍या चित्रफिती, फिल्म, परिसंवाद, पुस्तके याद्वारे प्रबोधन करणे या सहजशक्य गोष्टी वैयक्तिक पातळीवर करणे प्रत्येक शिवप्रेमीला सहज शक्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना डोक्यावर नको तर डोक्यात घ्या, असे आपण म्हणतो. त्यावर कृती करण्याची वेळ आली आहे. 

Post a Comment

Designed By Blogger