रस्ते अपघात, गंभीर समस्या

कोरोनाकाळात मृत्यूमुखी पडणार्‍यांच्या आकडेवारीवर खूप चर्चा झाली कारण ती संख्या निश्‍चितपणे मोठी होती. मात्र कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणार्‍यांपेक्षा रस्ते अपघाताच जास्त जणांचा बळी जातो, यावर कुणी सहजासहजी विश्‍वास ठेवणार नाही. याच विषयावर भाष्य करतांना केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना भारतात दरवर्षी जवळपास ५ लाख रस्ते दुर्घटना होतात. त्यात दीड लाख लोकांचा जीव जातो, असे म्हटले आहे. आपल्या देशात रस्ते सुरक्षेचा प्रश्न हा आज एक गंभीर मुद्दा बनला आहे. वाहन चालक व वाहनातील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोटर वाहन कायद्यांत मोठे व अनेक बदल केले जाणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. याचाच एक भाग म्हणून, कारमध्ये बसणार्‍या सर्व प्रवाशांना थ्री पॉईंट सीट बेल्ट अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे कार उत्पादन करणार्‍या कंपन्यांना सर्व प्रवाशांसाठी थ्री पॉईंट सीट बेल्ट देणे बंधनकारक असेल. गडकरींच्या या निर्णयाचे स्वागत करायलाच हवे परंतू केवळ सरकारने नियम बदलल्यांमुळे अपघात थांबणार नाही. यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.



गडकरींच्या या निर्णयाचे स्वागत करायलाच हवे

वर्धा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणारे ७ विद्यार्थी एकाच वेळी मरण पावल्याच्या घटनेनेनंतर राज्यातील सर्वच महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचावा, यासाठी तयार करण्यात आलेले हे महामार्ग प्रवाशांच्याच जिवावर उठले आहेत की काय? असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही. यासाठी मोटार वाहन कायद्यातील त्रुटींचा नव्याने फेरविचार करण्याची आवश्यकता असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. नेमके याच मुद्यावर नितिन गडकरी यांनी बोट ठेवत, काही बदल करण्याची घोषणा केली आहे. या नव्या आदेशावर त्यांनी स्वाक्षरी देखील केली असल्याने त्याची अंमलबजावणी लवकरच सुरु होईल. यात मोटर गाडीतील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट अनिवार्य, आठ आसनी वाहनापर्यंत सर्व प्रवाशांना एअर बॅग सक्तीचे राहील, सर्व वाहनांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्टार मानांकन दिले जाईल, वाहनांच्या हॉर्नच्या आवाजावर नियंत्रण आणणार, सर्व वाहनांमध्ये ब्रेकसंदर्भात एबीएस प्रणाली राहील, दिव्यांग व्यक्तींसाठी वाहनांच्या रचनेमध्ये बदल केले जातील, चालकाला डुलकी येत असल्यास वाहनातील अलार्म सुरू होईल, नियमित अपघात होणार्‍या जागेवर वाहने गेल्यानंतर तेथे चालकाला धोक्याची सूचना दिली जाईल, असे बदल करण्यात आले आहेत. यातील सर्वात महत्वाचा मुद्दा हा सीटबेल्ट आहे. कारमध्ये मागील सीटवर मध्ये बसणार्‍या व्यक्तीसाठी थ्री पॉईंट सीट बेल्टची व्यवस्था नसते. मात्र यापुढे कार निर्मिती कंपन्यांना मध्यभागी बसणार्‍या प्रवाशासाठीही थ्री पॉईंट सीट बेल्ट उपलब्ध करून द्यावा लागेल. सध्या कारमध्ये पुढच्या दोन्ही सीटवर आणि मागे असलेल्या दोन्ही सीटवर थ्री पॉईंट सीट बेल्ट उपलब्ध असतात. मागच्या सीटवर मध्ये बसलेल्या प्रवाशाला केवळ टू पॉईंट सीट बेल्ट देण्यात येतो. मात्र प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन सीट बेल्ट वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एका अहवालानुसार, जगभरात दररोज सुमारे ३००० लोक रस्ते अपघातात आपला जीव गमावतात. भारतात दरवर्षी सुमारे दीड लाख लोक रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडतात आणि आपला जीव गमावतात. रस्ते अपघातात मरण पावलेल्या लोकांपैकी जवळजवळ ५० टक्के लोक पादचारी किंवा दुचाकी आहेत. 

देशात अपघातांत बळी पडणार्‍यांची संख्या सर्वाधिक

भारतात, दररोज सुमारे १६ निष्पाप मुले रस्ते अपघातात आपला जीव गमावतात. जगभरातील एकूण वाहन संख्येच्या तुलनेत भारतात केवळ १ टक्के वाहने आहेत; परंतु रस्ते अपघातात ११ टक्के मृत्यू होतात; म्हणजेच भारतात प्रतिघंट्याला ५३ रस्ते अपघात होतात आणि प्रति ४ मिनिटाला एकाचा मृत्यू होतो. देशातील राष्ट्रीय महामार्गावर ३५ टक्के, तर राज्य महामार्गावर २५ टक्के अपघात झाले आहेत. हे प्रमाण जगभर थैमान घालणार्‍या कोरोनाच्या संसर्गापेक्षा अधिक आहे. या रस्ते अपघातातील हानीमुळे भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात प्रतिवर्ष ३.१४ टक्क्याने घट होते, तर वैद्यकीय व्यय, मृत्यू किंवा घायाळ झाल्याने बुडणारे उत्पन्न, वाहनांची हानी आणि अन्य प्रशासकीय व्यय लक्षात घेता प्रत्येक मृत्यूमागे लाखो रुपयांची हानी होत आहे. ही हानी टाळण्यासाठी अपघात अल्प होण्यासाठीचे प्रयत्न युद्ध पातळीवर होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात काय किंवा अन्य राज्यात काय आज जे भीषण अपघात होत आहेत त्यापैकी ८० ते ९० टक्के अपघातात ट्रक, टेम्पो, टँकर किंवा डम्पर अशा अवजड वाहनांचा समावेश असतो. या संदर्भात माल वाहतूक करणार्‍या अवजड वाहनांचे चालक, वाहनांचे मालक, वाहतूक पोलीस आणि आरटीओचे अधिकारी यांना जबाबदार धरावे लागेल. कारण वाहनांचे चालक व मालक हे सर्व प्रकारचे नियम धाब्यावर बसवून वाहने चालवत असतात. त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही हेच बहुतेक अपघातांचे मूळ दुखणे आहे. अतिवेगाने वाहन चालवणे, वाहन चालवतांना सुरक्षित अंतर न ठेवणे, भ्रमणभाषवर बोलत वाहन चालवणे, ‘ओव्हरटेक’ करणे, मद्यपान करून वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणे किंवा माल भरणे आदी अनेक कारणे अपघातांमागे आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, वाहनचालकांमध्ये जागरूकता वाढवणे, रस्ते सुरक्षा उपायांची कठोर कार्यवाही करणे, रस्ता सुरक्षेकडे सामाजिक दायित्व म्हणून बघणे आवश्यक आहे. यासह चालकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याबरोबरच अपघाताची इतर कारणेही शोधून काढायला हवीत. महामार्गावरील प्रवास आणखी सुखकर आणि भयमुक्त करण्यासाठी राज्यातील सर्वच महामार्गाचे ऑडिट करण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे. देशात अपघातांत बळी पडणार्‍यांची संख्या सर्वाधिक आहे. हे चित्र बदलण्याचे दायित्व सरकारबरोबरच सर्व समाजघटकांवर आहे. सर्वांनीच वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघातांचे प्रमाण निश्‍चितपणे कमी होईल, यात शंका नाही. 

Post a Comment

Designed By Blogger