चौकार, षटकारांची आतषबाजी, अटीतटीचे सामने, क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा, चीअर लीडर्स आदी रंगानी सजलेल्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलची क्रिकेटवेड्यांचा देश म्हणून परिचित असलेल्या भारतात प्रचंड क्रेझ आहे. येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग २०२२ चा १५वा हंगाम सुरू होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बेंगलोरमध्ये खेळाडूंचा मेगा लिलाव पार पडला. या लिलावात एकूण ६०० खेळाडूंवर मनसोक्त बोली लावण्यात आली. तर काही दिग्गज खेळाडू देखील होते, ज्यांना कोणीही खरिददार मिळाले नाही. आयपीएलमध्ये अपेक्षेप्रमाणे अनेक खेळाडूंवर मोठी बोली लागली. अनकॅप्ड प्लेयर्समध्ये अनेक युवा खेळाडूंना मोठी किंमत मिळाली. भारतीय संघाकडून अजून पदार्पण न केलेल्या या खेळाडूंसाठी फ्रेंचायजींनी सढळ हस्ते रक्कम खर्च केली. यात यश धुल, राजवर्धन हंगरगेकर, राज बावा, यश दलाल, आवेश खान, शाहरुख खान, यांची नाव घ्यावी लागतील. या युवा खेळाडूंची बेस प्राइस काही लाख रुपये असूनही त्यांच्यावर कोट्यवधीची बोली लागली.
इशान किशन सर्वाधिक महागडा खेळाडू
आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी झालेल्या लिलाव प्रक्रियेत भारतीय खेळाडूंचे प्रामुख्याने वर्चस्व दिसून आले. भारताचा डावखुरा फलंदाज इशान किशन यंदाच्या हंगामातील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला. २३ वर्षीय इशानला मुंबई इंडियन्सनी १५.२५ कोटी रुपयांत करारबद्ध केले. पाच वेळच्या विजेत्या मुंबईने ‘आयपीएल’च्या इतिहासात प्रथमच एखाद्या खेळाडूवर १० कोटींपेक्षा अधिक बोली लावली. इशानच्या कारकीर्दीला मुंबईतूनच दिशा लाभली. आक्रमक सलामीव्यतिरिक्त यष्टिरक्षणाची भूमिकाही तो बजावू शकतो. त्यामुळे मुंबईने भविष्याचा विचार करता इशानला संघात पुन्हा सहभागी केले आहे. त्यानंतर दीपक चाहर, श्रेयस अय्यर, आवेश खान, शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा आणि निकोलस पूरन या खेळाडूंची १० कोटीच्या घरात विक्री झाली. अष्टपैलू दीपक चहरला चेन्नई सुपर किंग्जने १४ कोटी रुपये देत संघात कायम राखण्याचा निर्णय घेतला. भारताच्या वेगवान गोलंदाजांचा प्रथमच इतकी बोली लावण्यात आली. चहर गेल्या काही महिन्यांत फलंदाजीतही सातत्याने योगदान देत असून ‘पॉवरप्ले’च्या षटकात बळी पटकावण्यात तो पटाईत आहे, त्यामुळे चहर यंदा गतविजेत्या चेन्नईसाठी सर्वाधिक मौल्यवान खेळाडू ठरू शकतो. मुंबईचा प्रतिभावान फलंदाज श्रेयस अय्यरला १२.२५ कोटी रुपयांना गतउपविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सनी करारबद्ध केले. श्रेयसला कर्णधारपद भूषवायचे असल्याने त्याने दिल्ली कॅपिटल्स संघ सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता त्याच्याकडे कोलकाताच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात येईल, असे दिसते. श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्लीने २०२०मध्ये प्रथमच ‘आयपीएल’ची अंतिम फेरी गाठली होती. यंदाच्या हंगामासाठी १०.७५ कोटींवर बोली लावण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये चौघांचा समावेश आहे. गतवर्षी सर्वाधिक बळी मिळवणारा हर्षल पटेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु), वानिंदू हसरंगा (रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु), मुंबईकर शार्दूल ठाकूर (दिल्ली कॅपिटल्स) आणि निकोलस पूरन (सनरायजर्स हैदराबाद) हे ते चार खेळाडू. हर्षल, शार्दूल यांच्या रूपात भारतीय गोलंदाजांचे लिलावातील वर्चस्व पुन्हा अधोरेखित होते. ‘आयपीएल’च्या गेल्या हंगामात सर्वाधिक बळी नावावर असणारा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने कायम ठेवले आहे. मात्र ‘आयसीसी’च्या गोलंदाजीच्या क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाने आश्चर्यकारक मुसंडी मारली. बंगळूरु संघानेच हसरंगासाठीही पटेलइतकेच पैसे खर्च केले. गतहंगामात चेन्नईचे प्रतिनिधत्व करणार्या अष्टपैलू शार्दूल ठाकूरला दिल्ली कॅपिटल्सने प्राप्त केले, तर निकोलस पूरनला सनरायजर्स हैदराबादने संघात स्थान दिले. राजस्थान रॉयल्सने अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन आश्विनसाठी ५ कोटी रुपये मोजले, तर डावखुर्या देवदत्त पडिक्कलला ७ कोटी, ७५ लाख रुपये बोलीसह प्राप्त केले. भारताच्या अनुभवी खेळाडूंपैकी सलामीवीर शिखर धवनसाठी पंजाब किंग्जने ८.२५ कोटी, तर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसाठी गुजरात टायटन्सने ६.२५ कोटी रुपये मोजले. चेन्नई सुपर किंग्जने ड्वेन ब्राव्हो (४.४० कोटी), अंबाती रायुडू (६.७५ कोटी) आणि रॉबिन उथप्पा (२ कोटी) या खेळाडूंना कायम राखले.
दर्जेदार खेळ करणारे खेळाडू तयार होवोत
परदेशी खेळाडूंपैकी वेस्ट इंडिजचा अष्टपैलू जेसन होल्डरला लखनऊ सुपरजायंट्सने ८.७५ कोटी, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाला पंजाब किंग्जने ९.२५ कोटी, तर स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायरला राजस्थान रॉयल्सने ८.५ कोटींपर्यंत बोली उंचावली. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने सलामीवीर आणि कर्णधारपद हे दोन्ही प्रश्न सोडवण्याच्या इराद्यााने फॅफ डय्ूप्लेसिसला ७ कोटी रुपयांना संघात स्थान दिले, तर क्विंटन डीकॉकला (६.७५ कोटी) लखनऊने स्थान दिले. यंदाच्या लिलावात अनेक फ्रचायझींनी युवा खेळाडूंवर विश्वास दाखविला भारताने नुकताच अंडर १९ विश्वचषक जिंकला, युवा खेळाडूंनी सुरुवातीपासून अप्रतिम खेळ दाखवत ही स्पर्धा जिंकली. दरम्यान या त्यांच्या कामगिरीमुळे आगामी आयपीएलमध्ये त्यांना घेण्यासाठी संघ उत्सुकता दाखवणार हे नक्कीच होते. त्यानुसार कर्णधार यश धुलपेक्षा महाराष्ट्रातील उस्माणाबादच्या राजवर्धन हंगरगेकरवर अधिक बोली लागली. यशला दिल्ली संघाने ५० लाखांना खरेदी केलं. तर राजवर्धनवर काही संघानी चुरशीची बोली लावली, ज्यात अखेर चेन्नई सुपरकिंगने १.५० कोटी देत त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. अंडर १९ संघातील आणखी एक अष्टपैलू खेळाडू राज बावा याच्यावरही तगडी बोली लागली. राज बावावर २० लाखांची बेस प्राइस लावण्यापासून सुरुवात झाली. ज्यानंतर अखेर पंजाब किंग्सने त्याला २ कोटी रुपयांना खरेदी केले. युवा क्रिकेटपटू यश दयाल याची बेस प्राइज २० लाख होती. त्यावर तब्बल ३.२० कोटींपर्यंत बोली लागली. यात गुजरात टायटन्सने बाजी मारली. आवेश खान आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव नसलेला आतापर्यंतचा सर्वांत महागडा भारतीय क्रिकेटपटू ठरला. आयपीएलचे अजून एक महत्व म्हणजे, आयपीएलमधून प्रत्येक वर्षी असे काही खेळाडू पुढे येतात आणि त्यातून भारतीय क्रिकेटच्या नवी पिढीची जडणघडण होऊ लागते. यंदाच्या आयपीएलचे अजून एक महत्त्व म्हणजे, या स्पर्धेत सर्वच संघातील नवोदितांनी त्यांच्या प्रमुख खेळाडूंपेक्षाही जास्त भरीव कामगिरी करून आपली गुणवत्ताही सिद्ध केली आहे. ऋतुराज गायकवाड, व्यकंटेश अय्यर यांसारखे खेळाडू पुढे आले हेच या स्पर्धेचे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल. यामुळे यंदाच्या १५व्या हंगामातूनही असेच दर्जेदार खेळ करणारे खेळाडू तयार होवोत, अशी अपेक्षा!
Post a Comment