पंजाब येथे हुसैनीवाला भागात शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी जाणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी एका फ्लायओव्हरवर रोखला. तिथे मोदी यांना १५ ते २० मिनिटे अडकून पडावे लागले. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा होणे, हा अतिशय गंभीर प्रकार आहे. मुळात पंतप्रधानांसारख्या अति महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत अशा प्रकारच्या चुकांमुळे आपण स्व. लाल बहाद्दूर शास्त्री, स्व. इंदिरा गांधी व स्व. राजीव गांधी यांच्यासारख्या महान पंतप्रधानांना गमविले आहे. जेथे पंतप्रधानांचा ताफा रोखण्यात आला होता तेथून भारत-पाक सीमा काही किलोमीटर अंतरावर आहे. त्या भागात खलिस्तानवाद्यांचे अस्तित्व आहे. असे असतांना पंतप्रधानाच्या सुरक्षिततेत इतका निष्काळजीपणा होणे प्रचंड धोकादायक म्हणावे लागेल. आता त्यावरुन राजकारण पेटले आहे. यावरुन काँग्रेसचे काही नेते अकलेचे तारे तोडत असतांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतलेली भुमिका निश्चितच स्वागतार्ह आहे. पंतप्रधान कोणत्या पक्षाचे आहेत, यापेक्षा ते देशाचे पंतप्रधान आहेत, हे महत्वाचे आहे. यामुळे त्यांच्या सुरक्षिततेच निष्काळजीपणा करणार्यांची चौकशी करुन कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्र्यांना दिले आहेत.
सुरक्षा त्रुटींमुळे देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत
भारत- पाक सीमेजवळ असलेल्या फिरोजपूरच्या सभेसाठी भटिंडा येथे विमानाने पोहोचलेल्या पंतप्रधानांना त्या भागात पाऊस पडत असल्याने, हेलिकॉप्टरच्या उड्डाणासाठी हवामान प्रतिकूल असल्याने शंभर किलोमीटर रस्त्याने जावे लागले. तो रस्ता पुढे शेतकरी आंदोलकांनी रोखून धरला असल्याने सभास्थानापासून दहा किलोमीटर अंतरावर एका उड्डाणपुलावर त्यांचा ताफा पंधरा-वीस मिनिटे अडकून पडला. भटिंडा विमानतळावरून परत दिल्लीला येण्याआधी म्हणे तिथल्या अधिकार्यांकडे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांसाठी, ‘त्यांना धन्यवाद सांगा, की मी भटिंडा एअरपोर्टपर्यंत जिवंत परत येऊ शकलो’, असा निरोप ठेवला. या सुरक्षानाट्याने देशाचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पंतप्रधान मोदींनी या विषयाची सविस्तर माहिती देण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. त्यानंतर केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. या प्रकरणात घाऊक कारवाई होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी अडचणी आल्याने काँग्रेसचे नेते या घटनेचा संबंध पंजाबमध्ये होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकांशी घालत आहेत. या मुद्द्यावर केंद्रातील सत्ताधारी भाजप व पंजाबमधील सत्ताधारी काँग्रेस आमनेसामने उभी ठाकली आहे. पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्यात असलेल्या सुरक्षा त्रुटींना तेथील राज्य सरकारच जबाबदार आहे. या चुकीबद्दल काँग्रेसला कधीही माफ करता येणार नाही, असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेवरून सुरू असलेला वाद दुर्दैवी आहे. त्या पदावरील व्यक्तीच्या सुरक्षेबाबत सर्वांनी नेहमीच दक्ष राहिले पाहिजे, असे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांनी पंजाब घटनेबाबत नुकतंच एक ट्विट केले आहे. यात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान संपूर्ण देशाचे असतात. त्यांच्या सुरेक्षेबाबत कोणतीच तडजोड होता कामा नये. पंजाब दौर्यात मोदी यांच्या सुरक्षेत आढळलेल्या त्रुटी गंभीर आहेत. याच त्रुटींमुळे देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत. या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.
...अन्यथा भविष्यात मोठी किंमत चुकवावी लागू शकते
दुसरीकडे पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या जीवाला धोका होता असा खोटा प्रचार सुरू आहे. या राज्यात लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथविण्याचा हा डाव असल्याचा दावा चन्नी यांनी केला आहे. त्यांचा हा दावा हास्यास्पदच म्हणावा लागेल कारण पंजाबमध्ये सिध्दू यांच्या कार्यशैलीमुळे काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. तेथे भाजपाच्याही विरोधात वातावरण असल्याने याचा फायदा आप ला होण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधानाच्या सुरक्षिततेच चुक कुणाची? या मुद्द्यावर पंजाब सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व राज्याच्या गृहखात्याच्या प्रधान सचिवांची चौकशी समिती नेमून तीन दिवसांत अहवाल देण्यास सांगितले आहे. तर पंतप्रधानांच्या सुरक्षेतील गंभीर त्रुटींची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृह खात्याने एक समिती स्थापन केली आहे. सुरक्षा विभागाचे सचिव सुधीर सक्सेना, आयबीचे संचालक बलबीरसिंह, एसपीजीचे आयजी एस. सुरेश यांचा समावेश आहे. एकूण राजकीय ध्रुवीकरण पाहता दोन्ही अहवाल काय असतील? याचा विचार न केलेलाच बरे. मात्र आता देशातील राजकारण भलत्याच दिशेने जातांना दिसत आहे. विचारांचे ध्रुवीकरण आणि संशयकल्लोळामुळे राजकारणाचा प्रवास भलत्याच दिशेने सुरु झालेला दिसत आहे. आधीच तीन कृषी कायद्यांवरुन वर्षभर रान पेटलं होतं त्यात अनेक विदेशीशक्तींचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष समावेश असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. याचे घातक परिणाम भविष्यात निर्माण होवू शकतात. अशात आता पंजाबमध्ये घडलेला प्रकार म्हणजे भविष्यात येणार्या मोठ्या संकटांची नांदीच म्हणावी लागेल. यामुळे आगीशी सुरु असलेला खेळ तातडीने थांबण्याची आवश्यक आहे. तसेच या प्रकरणातील दोषींवर सोईच्या राजकारणापलीकडे जावून कारवाई करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा भविष्यात आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागू शकते.
Post a Comment